Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

India Covid Rules : भारतात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी ‘हे’ नियम बदलले   

Covid Rules

India Covid Rules : बदल्या कोव्हिड परिस्थितीची दखल घेत परदेशातून भारतात येणाऱ्या लोकांसाठी कोव्हिडविषयक नियम बदलण्यात आले आहेत. आणि त्यांची अंमलबजावणी रविवारी 1 जानेवारीपासून सुरू झाली आहे.

कोव्हिडच्या (Covid 19) नवीन लाटेची भीती लक्षात घेऊन केंद्रीय नागरी विमान उड्डयण मंत्रालयाने (Ministry of Civil Aviation) परदेशातून भारतात येणाऱ्या विमान प्रवाशांसाठी नवीन नियमावली लागू केली आहे. 1 जानेवारीपासून ही नियमावली लागूही झाली आहे. सहा देशांतून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी RT-PCR चाचणी अनिवार्य असेल. हे सहा देश आहेत - चीन, सिंगापूर, हाँग काँग, दक्षिण कोरिया, थायलंड आणि जपान. ही चाचणी भारतात येण्यापूर्वी केलेली असली पाहिजे. विस्तारा एअरलाईन्सने (Vistara Airlines) हे नवीन नियम आपल्या ट्विटर हँडलवर ठळकपणे दिले आहेत. प्रवास सुरू करण्या आधी 72 तासात ही चाचणी केलेली असली पाहिजे असंही यात म्हटलं आहे.   

त्याचबरोबर एअरसुविधा (Air Suvidha) या पोर्टलवर आपली प्रवासाविषयी आणि खाजगी माहिती उघड करणंही अनिवार्य असेल.    

याशिवाय परदेशातून आलेल्या लोकांपैकी 2% लोकांची विमानतळावर आरटीपीसीआर चाचणी करण्याचे निर्देशही विमानतळ प्रशासनाला देण्यात आले आहेत.   

जागतिक आरोग्य संघटनेचे सरसंचालक टेड्रोस अ‍ॅधनम घेब्रेयेसुस यांनीही चीनमध्ये उद्भवलेल्या नवीन कोरोना लाटेबद्दल काळजी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर चीनने कोरोना रुग्णांचा आकडा जगाच्या माहितीसाठी रोज उघड करावा असं आवाहनही केलं आहे. चीनला कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक ती मदत करू असंही घेब्रेयेसुस यांनी म्हटलंय.   

भारतात नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी 243 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. आणि सध्या देशातले सक्रिय रुग्ण 3,609 इतके आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.