चीनमधल्या नव्या कोरोना लाटेमुळे अख्खं जगच सावध झालं आहे. नवीन लाटेच्या भीतीबरोबरच पुन्हा लॉकडाऊन, प्रवास आणि बाहेर पडण्यावर बंदी येईल का, याची भीती लोकांना आहे. यावर AIIMS रुग्णालयाचे माजी संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी भारतीयांना दिलासा दिला आहे.
भारतीयांमध्ये कोरोनाविरोधातली हाय-ब्रिड रोगप्रतिकारक शक्ती असल्यामुळे नवीन लाटेला घाबरण्याची गरज नाही, असं गुलेरिया यांनी बोलून दाखवलंय. कोरोनाचा नवा व्हेरियंट BF.7 सध्या सगळीकडे धुमाकूळ घालतोय. चीन, दक्षिण कोरिया, जपान, सिंगापूर, थायलंड या देशांमध्ये BF.7 व्हेरियंटची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे या देशातून येणाऱ्या लोकांना भारतात प्रवेश करण्यापूर्वी RTPCR चाचणी अनिवार्य करण्यात आलीय.
‘पण, आंतरराष्ट्रीय विमान प्रवास बंद करण्याची सध्या आवश्यकता नाही. शिवाय लॉकडाऊनचीही गरज पडणार नाही,’ अशा विश्वास गुलेरिया यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. याला कारण ते देतात भारतीयांमध्ये निर्माण झालेल्या हाय-ब्रिड रोगप्रतिकारक शक्तीचं.
हाय-ब्रिड रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे काय? What is Hy-Breed Immunity?
हाय-ब्रिड म्हणजे एकाच वेळी दोन कारणांनी शरीरात निर्माण झालेली रोगप्रतिकारक शक्ती. एकदा एखादा रोग होऊन गेला की, त्या रोगाविरोधातल्या अँटीबॉडीज् शरीरात निर्माण होतात. आणि त्या शरीराला नैसर्गिक प्रतिकारकशक्ती मिळवून देतात.
याशिवाय भारतीयांमध्ये लशीचे दोन्ही डोस झालेल्यांचं प्रमाण आता 90% च्यावर आहे. शिवाय काहींचा तिसरा बुस्टर डोसही झालाय. लसीकरणामुळेही जनतेमध्ये रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झाली आहे. आणि अशा दुहेरी रोगप्रतिकारक शक्तीला हाय-ब्रिड असं म्हणतात.
गुलेरिया यांच्याचसारखं मत डॉ. चंद्रकांत लेहरिया यांनीही व्यक्त केलंय. ‘भारतात यापूर्वीही ओमिक्रॉनचे 250 सब व्हेरियंट येऊन गेले आहेत. या सगळ्यांच्या विरोधातली प्रतिकारक शक्ती जनतेमध्ये आहे. त्यामुळे लॉकडाऊन सारखे उपाय करायची गरज पडेल, असं वाटत नाही.’ लेहरिया यांनी पीटीआयशी बोलताना आपलं मत सांगितलं.
चीनमधल्या परिस्थितीशी भारताची तुलना होऊ नये असं मात्र सर्वच तज्ज्ञांचं मत आहे.