Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

India Coronavirus : जानेवारीचे पहिले 14 दिवस भारतासाठी महत्त्वाचे   

India Covid

India Coronavirus : देशात ख्रिस्मसचा सण कुठल्याही निर्बंधांविना साजरा झाला. पण, त्यानंतर कर्नाटक आणि आणखी काही राज्यांमध्ये सार्वजनिक ठिकाणी मास्कसक्ती सुरू झाली आहे. केंद्रसरकारने जानेवारीचे पहिले 14 दिवस कोव्हिडच्या दृष्टीने महत्त्वाचं असल्याचं म्हटलंय

चीनमधल्या नवीन कोरोना (China Covid Outbreak) लाटेमुळे भारतातही आरोग्यसेवा हाय अलर्टवर (High Alert) आहे. पण, आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याबरोबरच धोरणात्मक पातळीवर भारताला काही निर्णय घ्यावे लागणार आहेत. नुकतेच कोव्हिड निर्बंध (Covid Restriction) पूर्णपणे हटवलेले असताना पुन्हा लॉकडाऊन (Lockdown) सारखे नियम लावता येतील का आणि ते केव्हा लावायचे हा महत्त्वाचा प्रश्न आहे. गेल्या आठवड्यात आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय (Mansukh Mandviya) यांनी ‘कोव्हिड अजून पुरता गेलेला नाही’, असं ट्विट करून परिस्थितीचं गांभीर्य विषद केलं होतं.    

आता आरोग्यमंत्री देशातल्या तज्ज्ञ डॉक्टरांशी सध्याची परिस्थिती आणि कोव्हिड रोखण्यासाठी करायच्या उपाययोजना यावर चर्चा करत आहेत. या चर्चेनंतर मंत्रिमंडळाशी सल्लामसलत करून देशाचं कोव्हिडविषयक नवं धोरण ठरवण्यात येईल.    

चीनमध्ये आलेली आताची लाट हे जगातलं सगळ्यात भयानक कोव्हिड संकट मानलं जातंय. कारण, आंतरराष्ट्रीय संस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, तिथं एकाच दिवशी 3.4 कोटी इतक्या नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. आणि त्यामुळे चीनच्या बाहेर पुन्हा एकदा कोव्हिडचा प्रसार झाला तर काय करायचं हा प्रश्न इतर देशांसमोर आहे.    

आणि म्हणूनच भारतातही राष्ट्रीय आरोग्य परिषदेनं जनतेला मास्क घालणं, सॅनिटायझर वापरणं आणि सोशल डिस्टन्सिंग ही त्रिसुत्री पाळण्याचं आवाहन केलं आहे. रविवारी मन की बात या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जनतेला कोव्हिड होऊ नये यासाठी खबरदारी घ्यायला सांगितलं. ‘इतर देशांमध्ये कोरोनाचा प्रसार पुन्हा एकदा होतोय. आणि ते पाहता स्वत:ची काळजी घेणं महत्त्वाचं झालंय,’ असं पंतप्रधान म्हणाले.   

दोन दिवसांपूर्वी उत्तरप्रदेशमध्ये चीनमधून परतलेला एक व्यक्ती विमानतळावर झालेल्या रँडम चाचणीमध्ये कोव्हिड पॉझिटिव्ह आढळला होता. आग्रामध्ये या इसमाला विलगीकरणात पाठवण्यात आलं. पण, विमानतळांवर चाचण्यांचं प्रमाण आता वाढवावं लागणार आहे.    

आणि त्यामुळे भारतातही चीनमधून आलेल्या प्रत्येक प्रवाशाची चाचणी विमानतळावर होत आहे. आणि बाहेरच्या देशातून आलेल्यांची आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे.    

एक चांगली गोष्ट म्हणजे भारतात अजूनही कोव्हिडचे रुग्ण प्रमाणाबाहेर वाढताना दिसत नाहीएत. त्यामुळे जानेवारीचे पहिले 14 दिवस महत्त्वाचे असल्याची भूमिका ICMR चे अध्यक्ष डॉ. रणदीप गुलेरिया यांनी बोलून दाखवलीय. ‘घाबरुन जाण्याची गरज नाही. आणि कोव्हिड धोरण आताच कडक करण्याची गरज नाही. पण, परिस्थितीवर काटेकोर लक्ष ठेवण्याची गरज आहे,’ असं त्यांनी बोलून दाखवलं.