अर्थसाक्षरतेबद्दल आजकाल खूप काही बोलले जात आहे. पैशाबद्दल आता कुठे लोक खुलेपणाने बोलू लागले आहेत. खरे तर ही एक चांगली सुरुवात आहे. आपण अनेकदा असे अनुभवले असेल की घरात कधीही लहान मुलांसमोर पैशाचे नियोजन, व्यवहार केले जात नाहीत. मुलांना जशी मूल्यशिक्षणाची गरज असते तशीच व्यवहारज्ञानाची देखील गरज असते हे अपान लक्षात घेतले पाहिजे. पाश्चिमात्य देशांत पाल्यांना त्यांचे पालक लहानपणापासूनच काही आर्थिक साक्षरतेच्या गोष्टी शिकवतात त्यामुळे मुले स्वतः आपले स्वतःचे आर्थिक नियोजन करण्यास सक्षम बनतात. भारतीय समाजात अशी सवय अजूनही रुळलेली नाही, परंतु येणाऱ्या काळात चित्र बदलेल अशी अनुकूल परिस्थिती सध्या आहे. मुलांना भविष्यात त्यांच्या जीवनात यशस्वी होण्याकरिता लहान वयापासूनच आर्थिक शिस्त लावणे देखील महत्त्वाचे आहे.
खरे तर आपण सगळे कष्टातून वर आलो आहोत. आपल्या बालपणी आपण पैशाची कमतरता बघितली आहे, त्यामुळे आपल्या मुलामुलींना काहीही कमी पडू नये अशी एक मानसिकता सर्वसामान्य कुटुंबात पाहायला मिळते. असे असले तरीही कधीकधी अति लाडामुळे लहान मुले बिघडतात. कुठल्याही अनावश्यक गोष्टींसाठी हट्ट धरतात. गरज आणि इच्छा या दोन गोष्टींमधील अंतर लहान वयात मुलांना समजत नसते परंतु पालक म्हणून मुलांना ते समजावून सांगणे हे आपले कर्तव्य आहे हे विसरू नका. लहानवयात लागलेल्या कुठल्याही चांगल्या-वाईट सवयी आयुष्यभर पुरतात हे लक्षात घ्या. त्यामुळे आपल्या आपल्या पाल्यांना लहानपणातच व्यवहारज्ञान आणि मूल्य शिक्षण दिले पाहिजे. जेणेकरून भविष्यात ते आर्थिकदृष्ट्या देखील सक्षम बनतील. लहान वयातच अनावश्यक खर्च करण्याची सवय लागली तर मुलांना पैशाची किंमत राहत नाही. पैसा आपल्याकडे कसा येतो, त्यासाठी काय मेहनत घ्यावी लागते हे जर मुलांना सांगितले नाही तर त्यामुळे भविष्यात मोठे प्रश्न उभे राहू शकतात हे लक्षात घेतले पाहिजे. म्हणून लहान वयातच मुलांना पैशांची किंमत समजून सांगणे फार महत्त्वाचे आहे.
Table of contents [Show]
- योग्य ठिकाणी योग्य खर्चाची सवय (A habit of spending right at the right place)
- पैशाला किंमत असते हे समजावून सांगणे (Explain that money has value)
- बचतीचा मूलमंत्र (The key to saving)
- मौजमजेसाठी पैसे खर्च करावेच लागतात असे नाही (Fun doesn't have to cost money)
- आवश्यक आणि अनावश्यक खरेदीमधला फरक समजावून सांगा (Explain the difference between necessary and unnecessary purchases)
योग्य ठिकाणी योग्य खर्चाची सवय (A habit of spending right at the right place)
आपल्या पाल्यांना लहानपणात चांगल्या सवयी लावल्या पाहिजेत हे तर सर्वांना मान्य असते. परंतु चांगल्या आर्थिक सवयी देखील लावल्या पाहिजेत यावर सहसा कुणी विचार करत नाही. लहान मुले आणि पैसा याचा काही संबंध नाही असे अनेकांचे म्हणणे असते, परंतु अशी समज ठेवणे चुकीचे आहे.आपल्या पाल्यांना लहान वयातच योग्य खर्च करण्याची सवय लावणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
जेव्हा केव्हा आपण मुलांना बाहेर कुठे फिरायला घेऊन जातो तेव्हा विक्रीसाठी असलेल्या वस्तू बघून मुले हट्ट करतात. इतरांनी घेतलेल्या वस्तू आपल्याकडे देखील असाव्यात असे बालमनाला वाटणे स्वाभाविक आहे परंतु मुलांना विश्वासात घेऊन आपण समजावून सांगितले पाहिजे. सगळ्याच गोष्टी आपण खरेदी कराव्या असे नाही. ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्याच खरेदी केल्या पाहिजेत असा नियम आपण लहान मुलांना समजावून सांगितला पाहिजे. वायफळ खर्च चुकीचा असतो हे देखील पटवून दिले पाहिजे. महागाई काय असते हे लहान मुलांना समजणार नाही परंतु पैशाचे नियोजन कसे असते हे मात्र आपण त्यांना छोट्या छोट्या उदाहरणातून समजावून सांगू शकतो. जसे घरात भरलेल्या किराण्याचे, पिण्याच्या पाण्याचे आपणा नियोजन करतो, तसेच आलेल्या पैशाचे देखील नियोजन गरजेचे आहे हे आपण त्यांना पटवून देऊ शकतो. यासाठी लहान मुलांसोबत आपला सुसंवाद असणे गरजेचे आहे.
पैशाला किंमत असते हे समजावून सांगणे (Explain that money has value)
आपल्याकडे पैसे आहेत म्हणजे ते खर्च केलेच पाहिजे असे नाही. लहान मुलांना घरी आलेले पाहुणे कधी पैसे देऊन जातात, वाढदिवसाच्या दिवशी देखील गिफ्ट म्हणून काही लोक पैसे देतात. या पैशाचे काय करायचे हा प्रश्न मुलांसमोर असतो. बहुतेकदा खाण्यापिण्याच्या वस्तू, खेळणी आदींसाठी मुले पैसे खर्च करतात. परंतु पैसे खर्च करून हवी ती वस्तू विकत घेणे हवे तसे पैसे खर्च करणे जेवढे सोपे आहे तेवढेच पैसे कमावणे अवघड आहे हे मुलांना समजावून सांगितले पाहिजे. पैसे कमविण्यासाठी माणसाला कष्ट घ्यावे लागतात, परिश्रम घ्यावे लागतात हे देखील समजावून सांगितले पाहिजे. पैशाची बचत केल्यास आवश्यक त्या वेळी आपण त्याचा चांगला उपयोग करून घेऊ शकतो हे देखील लहान मुलांना पटवून दिले पाहिजे. असे केल्यास मुलांकडे असलेल्या पैशाचे ते स्वतः नियोजन करू शकतात आणि तरुण वयात पैशांची उधळपट्टी करण्याची सवय त्यांना लागणार नाही.
बचतीचा मूलमंत्र (The key to saving)
आपल्या मुलांचा भविष्यासाठी मुलांच्या जन्मापासूनच पालक आर्थिक नियोजनास सुरुवात करत असतात. मुलांचे पालनपोषण, शिक्षण, लग्न आदी गोष्टींचा विचार फार आधीच केला जातो. याचे नियोजन करत असताना आपल्या पाल्यांना देखील याची जाणीव असली पाहिजे हे लक्षात ठेवा. पैशाची बचत ही भविष्यासाठी असते हे मुलांना पटवून देणे गरजेचे आहे. यासाठी लहानवयापासून पिगी बँकमध्ये पैसे जमा करण्याची सवय पालकांनी आपल्या मुलांना लावली पाहिजे. पिगी बँकमध्ये जमवलेल्या पैशांचा खर्च देखील कसा करावा याचे नियोजन मुलांकडून करून घेतले पाहिजे. बचत करताना आपल्यासमोर जर उद्दिष्ट असेल तर पैशाचा योग्य वापर होतो आणि वायफळ खर्च टाळता येतो. मुलांनी पिगी बँकमध्ये जमवलेले पैसे त्यांच्या गरजेच्या वस्तूंवर खर्च केल्यास मुलांना पैशाचे महत्व समजावून सांगता येऊ शकते. पैसे जमविण्यासाठी मुलांना किती कालावधी लागला हे देखील त्यांच्या निदर्शनास आणून द्यावे, जेणेकरून पैसे जमवण्यासाठी वेळ लागतो हे मुलांना कळेल.
मौजमजेसाठी पैसे खर्च करावेच लागतात असे नाही (Fun doesn't have to cost money)
मौजमजा करण्यासाठी, आनंद घेण्यासाठी पैसे असावेच लागतात आणि ते खर्च करावेच लागतात असे नाही. प्रत्येक गोष्टीसाठी आपण पैसा खर्च करू नये हे मुलांना समजावून सांगितले पाहिजे. सगळ्या महागड्या वस्तू, महागडी खेळणी आपल्याकडे असलीच पाहिजे असे नाही हे मुलांना पटवून देता यायला हवे. वायफळ खर्च करून आनंद मिळवण्यापेक्षा छोट्या छोट्या गोष्टीत आनंद कसा शोधता येईल यासाठी पालकांनी मुलांना मदत केली पाहिजे. यासाठी पालकांचा पुढाकार अधिक महत्वाचा आहे. जीवन जगण्याची कला ही मुलांना शिकवणे अतिशय महत्वाचा भाग आहे. अर्थसाक्षर होण्यासाठी ही शिकवण पहिली पायरी ठरेल.
जुने लोक म्हणत की, ‘साधी राहणी उच्च विचार’ माणसाने अंगी बाळगले पाहिजेत. हे अतिशय योग्य आहे, कारण साधी राहणी आपल्याला बचतीची सवय लावते त्याचबरोबर गरज आणि इच्छा यांतील फरक समजावून सांगण्यास उपयुक्त ठरत असते. याचा अर्थ आपण प्रत्येक वेळी काटकसर करावी, आपल्या इच्छाआकांक्षाना मुरड घालावी असे नाही. योग्य ठिकाणी योग खर्च करणे म्हणजे बचतच असते हे विसरू नका. लहान मुलांना अशा प्रकारच्या बचतीच्या सवयी लावा.
आवश्यक आणि अनावश्यक खरेदीमधला फरक समजावून सांगा (Explain the difference between necessary and unnecessary purchases)
लहान मुलांना आपण जसे घडवू तसे ते घडत असतात. मोठ्यांचे अनुकरण करण्याची सवय लहानग्यांना असते. त्यामुळे पालक जसे वागतील तसेच पाल्य देखील वागता असतात हे लक्षात ठेवा . आपल्या सवयी मुले अंगीकारत असतात. त्यामुळे आपण कर वायफळ खर्च करत असू तर मुले देखील वायफळ खर्च करू लागतील हे कायम लक्षात ठेवले पाहिजे. त्यामुळे अर्थसाक्षरतेचा चांगला आदर्श पालकांनी आपल्या मुलांसमोर ठेवणे अतिशय गरजेचे आहे. मुलांना देखील बजेट बनवण्याची सवय लावा. त्यातून आवश्यक काय आणि अनावश्यक काय हे त्यांना समजावून सांगता येईल. त्यातून मुलांना आर्थिक शिस्त तर लागेलच सोबत व्यवहारज्ञान देखील मिळेल. ब्रांडेड वस्तूंची सवय मुलांना लावू नका. त्यामुळे गरज नसतानाही मुले महागड्या वस्तूंचा हट्ट धरतात आणि त्यामुळे वायफळ खर्च देखील होतो.
थोडक्यात काय तर, आपण आपल्या मुलांना अर्थसाक्षरतेचे धडे लहानपणापासूनच द्यायला हवे. कुठल्याही शैक्षणिक अभ्यासक्रमात असे शिक्षण आणी प्रशिक्षण दिले जात नाही, ही खरे तर चिंताजनक बाब आहे. परंतु आपण पहिल्यापासून आर्थिक गोष्टींबद्दल सजग नसल्यामुळे असे घडते आहे हे लक्षात घेतले पाहिजे. तेव्हा कुठलाही विलंब न करता घरच्या घरी आपल्या पाल्यांना अर्थसाक्षर करा आणि त्यांना आर्थी शिस्त लावा. यामुळे मुलांना काटकसरीची सवय लागेल, खर्च कुठे करावा आणि कुठे करू नये याचे ज्ञान मिळेल. हीच शिकवण पुढे मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि उत्कर्षासाठी कामी येईल हे निश्चित!