पैसा कमविण्यासाठी आपण सगळे मेहनत घेत असतो, कष्ट करत असतो. पैसा सहजासहजी आपल्याला मिळत नाही. कष्टाने कमविलेल्या पैशाचे नियोजन मात्र अनेकांकडून चुकते. त्याच्यामागे अनेक कारणे आहेत. परंतु मुख्य कारण आहे ते अर्थसाक्षरतेचा आभाव. येणारा पैसा कसा येतो हे माहिती असते पण तो जातो कसा याचा अंदाज अनेकांना येत नाही, गडबड नेमकी इथेच होते. अनेकदा आपण बँकेच्या बचत खात्यात आपले पैसे साठवतो. आपला भरभक्कम बँक बॅलन्स पाहायला अनेकांना आवडते, परंतु हे काही शहाणपणाचे लक्षण नाही.
आता तर ऑनलाईन पेमेंट करणे इतके स्वाभाविक झाले आहे की आपण भाजी विक्रेत्याला, रिक्षाचालकाला, दुधवाल्याला देखील डिजिटल पेमेंट करत असतो. अनेकवेळा हे डिजिटल पेमेंट आपल्या बँक सेविंग खात्यातून होत असते, त्यामुळे धडाधड खर्च करताना आपण नेमका बचतीचा विचार करत नाही. म्हणून सेविंग अकाउंटमध्ये खूप जास्त पैसे विनाकारण ठेवणे हा चुकीचा निर्णय ठरू शकतो. हा लेख वाचताना अनेकांना याची जाणीव झाली असेल.
अर्थसाक्षर असलेले लोक आधी व्याजाचा विचार करतात. आपल्या ठेवीवर किती टक्के व्याज मिळते आहे हे ते जाणून घेतात. त्यानुसारच ते आपली गुंतवणुकीची दिशा ठरवतात. अर्थसाक्षर माणसाला हे माहीत असते की सेविंग अकाउंट मध्ये पैसे साचवून त्यावर फक्त 3.5% दराने वर्षभरात व्याज मिळणार आहे. परंतु इतर ठेवींवर त्यापेक्षा अधिक व्याजदर असेल तर तसा पर्याय निवडण्यात गैर काहीच नाही.सेविंग अकाउंटमध्ये पैसे साचवून आपण आपली दीर्घकालीन उद्दिष्टे साध्य करू शकत नाही. शिक्षण, लग्न, परदेशी दौरा, घर, गाडी आदी गोष्टींसाठी आपल्याला विचार करूनच गुंतवणूक करावी लागते. परंतु हे सर्व निर्णय घेताना मार्केटचा अभ्यास करणे अत्यंत गरजेचे आहे, हे कायम लक्षात घेतले पाहिजे.
व्याजदराची माहिती करून घ्या
ज्या लोकांना सेविंग अकाउंट सोडून इतर बचतीच्या योजना माहित नसतील तर त्यांनी काय करावे? घाबरण्याचे कारण नाही. पैशाचा अभ्यास हा त्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. सेविंग अकाउंटवरून जर 3.5% दराने व्याज मिळत असेल तर हीच समान रक्कम म्युच्युअल फंडामध्ये गुंतवल्यास तुम्हांला अपेक्षित असा परतावा मिळू शकतो. म्युच्युअल फंडामध्ये योग्य कालावधीसाठी पैसे गुंतवले तर जवळपास 6% ते 8% परताव्याची अपेक्षा तुम्ही करू शकता. सध्या असे अनेक म्युच्युअल फन्ड्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत की जे तुम्हाला सेविंग अकाउंट पेक्षा जास्त चांगला परतावा देऊ शकतात.
आपण एक उदाहरण बघूया. ₹1 लाख 1 वर्षासाठी बँकेत सेविंग खात्यात ठेवले तर 3.5 % ने मिळणारा परतावा ₹ 3500 इतका होतो आणि तेच ₹1 लाख 1 वर्षांसाठी चांगल्या म्युच्युअल फंडामध्ये टाकले तर 7% ने मिळणारा परतावा ₹7000 इतका होतो. हे गणित अगदीच समजण्यासारखे आहे. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक मार्केटवर अवलंबून असते आणि तो जोखीमयुक्त असते हे देखील तुम्हाला माहिती असायला हवे. म्हणजेच म्युच्युअल फंड कायम 7% परतावा देईल असे समजण्याचे कारण नाही. त्यात चढउतार हे होत असतात. परंतु ही रक्कम सेविंग अकाउंटमध्ये साठवलेल्या पैशापेक्षा अधिकच ठरेल, हे मात्र नक्की.
अर्थसाक्षर असण्याची आणखी एक सवय म्हणजे फक्त एकच गुंतवणूक योजनेत सर्व पैसे लावू नये. काही पैसे सेविंग अकाउंटमध्ये, काही पैसे म्युच्युअल फंडात तर काही शेयर मार्केट व इतर योजनेत लावावेत. त्यामुळे होईल काय तर मार्केटच्या हिशोबाने कुठल्या एका योजनेत परतावा कमी मिळाला तर दुसऱ्या कुठल्या योजनेतून तुम्हाला जास्त परतावा मिळू शकतो. त्यामुळे तुमची गुंतवणुकीची जोखीम देखील कमी होते.
म्युच्युअल फ़ंडात गुंतवणूक करण्याचा SIP हा देखील एक चांगला पर्याय आहे.यामध्ये तुम्ही दर महिना काही पैसे ठरवून दिलेल्या तारखेला गुंतवणूक करू शकता. यात तुम्ही दरमहा किती रुपये टाकायचे आणि किती वर्षासाठी हे तुम्ही तुमच्या दीर्घकालीन ध्येयांचा विचार करून ठरवा. महागाईच्या जमान्यात आपल्या सर्व गरजा पूर्ण करायच्या असतील तर त्यासाठी वेगवगेळ्या गुंतवणूक योजनेत पैसे लावणे हा एक स्मार्ट निर्णय ठरू शकतो. अनावश्यक खर्च टाळण्याची सवय देखील तुमची बचत करू शकते. गरजेपुरत्या वस्तूंसाठी आपण खरे तर खर्च करायला हवा. आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवले नाही, खर्चाचा हिशोब ठेवला नाही तर आर्थिक संकटाला आपल्याला सामोरे जावे लागणार आहे हे लक्षात घ्या. वेळीच आपल्या गुंतवणुकीचे मार्ग निवडा आणि पैशाबद्दल काटेकोर नियोजन करा.
तुम्ही काय कराल ?
- आणीबाणीच्या काळात 6 महिन्यांच्या खर्चाइतका तुम्हाला लागणारा निधी (Emergency Fund) आधीच बाजूला ठेवा. आपल्याला पैशाची कधीही गरज लागू शकते हे ध्यानात घ्या. पैशासाठी कुणाकडे हात पसरावे लागणार नाहीत याची तजवीज आधीच करून ठेवा.
- महिन्याचे आर्थिक नियोजन आधीच करून ठेवा, लिखित स्वरूपात हे नियोजन असल्यास पैसा कुठेकुठे खर्च झाला याचा ताळेबंद लागतो.
- आवश्यक तेवढेच पैसे सेव्हिंग बँक अकाउंट मध्ये ठेवा.
- SIP द्वारे उत्तम म्युच्युअल फ़ंडात तुमचे पैसे गुंतवा.
- आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.
- आरोग्य विमा आणि जीवन विमा काढण्यास टाळाटाळ करू नका.