आर्थिक दृष्ट्या साक्षर असणे ही खरे तर काळाची गरज आहे. पैशाचे नीट व्यवस्थापन न केल्यास आपल्या बचतीच्या पैशांची व्यवस्थित गुंतवणूक होणार नाही आणि अपेक्षित फायदा देखील मिळणार नाही. त्यामुळे येणारे प्रत्येक पैसा आपण काळजीपूर्वक जपला पाहिजे आणि वाढवला पाहिजे. लवकरात लवकर गुंतवणूक म्हणजे कमी वेळेत मोठा परतावा असे मानले जाते. परंतु त्यासाठी योग्य वेळी योग्य काळजी घेणे देखील महत्त्वाचे आहे.
अनेकदा आपल्याकडे पैसे येतात पण आपण ते कुणाच्या तरी सांगण्यावरून, सल्ल्यानुसार कुठेतरी गुंतवतो परंतु आवश्यक तो फायदा आपल्याला होत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे स्वतः पैशाचा अभ्यास न करणे! या सगळ्या गोष्टी लक्षात घेता जेव्हा केव्हा तुम्ही गुंतवणूकीबाबत निर्णय घ्याल तेव्हा खलील गोष्टींचा विचार होणे अत्यंत आवश्यक आहे.
Table of contents [Show]
1) गुंतवणूकी संदर्भात पुरेपूर माहिती करून घ्या
कुठलीही गुंतवणूक करताना आपल्याला त्याचे पूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे. ज्या योजनेत आपण आपले पैसे टाकणार आहोत त्या योजनेची छोट्यात छोटी माहिती करून घ्या. गुंतवणुकीत जोखीम काय? व्याज, चक्रवाढ किती हे जाणून घ्या. आवश्यकते नुसार पैसे काढण्याची सुविधा आहे किंवा नाही हे देखील तपासून घ्या. तुमचे प्रश्न कितीही बालिश वाटले तरीही ते विचाराच! कारण तुम्ही तुमच्या कमाईचे पैसे गुंतवत आहात, त्याबाबतीत माहिती घेणे हा तुमचा अधिकार आणि कर्तव्य आहे.
2) आर्थिक ध्येय ठरवा
कुठलीही गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही ती का करत आहात याची तुम्हांला जाणीव असलीच पाहिजे. येणारा पैसा कसा जाईल याची खात्री आपल्याला नसेल तर बचत करून देखील फायदा नाही, कारण विना उद्दिष्ट केलेली बचत वायफळ खर्चात जाण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे गुंतवणूक करताना त्याची धोरणे आगोदरच ठरवा. शिक्षण, घर, गाडी, पेंशन,लग्न आदी मुद्दे लक्षात घेऊन गुंतवणूक केल्यास वेळेचे आणि पैशाचे पद्धतशीर नियोजन करता येते.
यामुळे कुठल्या योजनेत, किती कालावधीसाठी गुंतवणूक करावी हे आपल्याला समजते आणि संभाव्य नुकसान टळू शकते.
3) गुंतवणूक करण्यास विलंब नको!
मराठी परिवारात पैशाची चर्चा होत नाही. अनेकदा आपण आपले व्यवहार कुणालाही सांगत नाही. त्यामुळे एकमेकांच्या चुका दुरुस्त करण्याची देखील जागा आपल्याला सापडत नाही.पैशाबद्दल फार कमी लोक बोलतात त्यामुळे गुंतवणूक काय असते हे कळायला बराच कालावधी लागतो. विसरू नका, वेळ म्हणजे देखील पैसाच आहे. वेळेत बचतीला आणि गुंतवणुकीला सुरुवात म्हणजे मोठा आर्थिक लाभ हे विसरू नका.
जेवढ्या लवकर तुम्ही गुंतवणूक करण्यास सुरुवात करा तेवढेच तुमच्या आर्थिक भविष्य साठी ते फायदेशीर आहे.
4) झटपट नफा मिळवण्याच्या भानगडीत पडू नका
झटपट नफा कुणाला हवा नसतो? परंतु योग्य निर्णय न घेतल्यास आहे ते पैसे गमावण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे मार्केटचा जोवर पूर्ण अभ्यास होत नाही तोवर गुंतवणूक करणे टाळा. म्हणजेच लवकरात लवकर मार्केटचा अभ्यास सुरू करा आणि आपली प्राथमिकता लक्षात घेऊन त्यावर गुंतवणूकीचा विचार करा.आपली गुंतवणूक ही भविष्यासाठी असते हे लक्षात ठेवा. त्यामुळे योग्य वेळेत केलेली बचत जर दीर्घ मुदतीची नसेल तर त्यावर परतावा अधिक मिळणार नाही हे गणित लक्षात घ्या.
सगळ्यांनाच हवा असतो व त्यासाठी झटपट व जास्तीत जास्त नफा कसा मिळवता येईल याच्या मागे लागले जाते परंतु हे धोकादायक ठरू शकते.
आपल्या चांगल्या सुरक्षित आर्थिक भविष्यासाठी गुंतवणूक करणे महत्त्वाचे आहे हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे त्यामुळे झटपट नफा देणाऱ्या गुंतवणुकीपेक्षा दीर्घकालीन नफा मिळणाऱ्या गुंतवणुकीकडे लक्ष दिले पाहिजे.
5) आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेतलाच पाहिजे
अनेकदा सोशल मीडियावरचे मेसेज बघून, मित्राने सांगितले म्हणून आपण गुंतवणुकीचे पर्याय निवडतो. या निर्णयामागे कुठलाही विचार नसतो. असे निर्णय आपल्यासाठी धोकादायक असतात. मार्केटचा किंवा गुंतवणुकीचा कसलाही अभ्यास न करता पैसे गुंतवणे म्हणजे जुगार खेळण्यासारखे आहे. लक्षात ठेवा आपण आपल्या मेहनतीचा पैसा कुठेतरी गुंतवणार आहोत, तेव्हा योग्य व्यक्तींचा, जाणकारांचा सल्ला घेण्यात कुठलेही कमीपण नाही.
या पाच गोष्टींचा गंभीरपणे विचार केल्यास तुम्ही तुमची गुंतवणूक, बचत योग्य पद्धतीने करू शकता आणि जास्तीत जास्त परतावा मिळवू शकता. प्रत्येक गोष्टीत शिस्त असली म्हणजे कामे व्यवस्थित होतात हे लक्षात घ्या. आर्थिक शिस्त पाळण्याचा पुरेपूर प्रयत्न करा.