प्रत्येक आर्थिक वर्षात इन्कम टॅक्स रिटर्न (ITR Filing) फॉर्म भरण्यासाठी करदात्यांना फॉर्म 16 हा सर्वांत महत्त्वाचा आहे. कारण कर्मचाऱ्यांच्या पगारातून कंपनीद्वारे पगार कापला गेल्यास कंपनी त्या कर्मचाऱ्याला फॉर्म 16 देते. या फॉर्ममध्ये TDS/TCS व्यवहारांचे तपशील असतात. त्यामुळे हा फॉर्म करदात्यांना देणं बंधनकारक आहे. त्यानुसार, इन्कम टॅक्स विभाग प्रत्येक आर्थिक वर्षासाठी सर्व कंपन्यांना आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना फॉर्म 16 देण्याची अंतिम तारीख जाहीर करत असते.
एकापेक्षा अधिक फॉर्म 16 सह फाईल कसे करायचे?
नियमाप्रमाणे प्रत्येक कर्मचाऱ्याला कंपनीकडून फॉर्म 16 (Form 16) जारी केला जातो. पण तुम्ही जर नोकरी बदलली असेल किंवा एका वर्षांत अनेक कंपन्यांसोबत काम केले असेल, तर तुम्हाला एकापेक्षा जास्त फॉर्म 16 सह इन्कम टॅक्स रिटर्न भरावा लागेल. आता अनेक फॉर्म 16 सह रिटर्न नेमकं कसा भरायचा हे एका उदाहरणामधून समजून घेऊ.
समजा, सुरेशने 1 एप्रिल ते 31 जुलै, 2020 पर्यंत ABC कंपनीत काम केले आणि त्यानंतर XYZ प्रायव्हेट कंपनीत तो गेला. तिथे त्याने 31 मार्च, 2021 पर्यंत काम केले. तर आता सुरेशला 2020-2021 या आर्थिक वर्षाचे रिटर्न भरण्यासाठी दोन्ही कंपन्यांचे फॉर्म 16 लागणार आहे.
एकापेक्षा जास्त फॉर्म 16 असतील तर ITR भरण्याची प्रक्रिया बदलते का?
होय आणि नाही. कारण एकापेक्षा जास्त कंपन्यांकडून मिळालेल्या फॉर्म 16 मधून मिळालेल्या उत्पन्नाची आणि कापलेल्या टीडीएसची जुळवाजुळव करावी लागते. या स्टेप व्यतिरिक्त बाकीची प्रक्रिया समानच राहते.
जर एखाद्याने एका आर्थिक वर्षात किमान दोन वेळा नोकरी बदलली असेल, तर त्याला दोन फॉर्म 16 वापरणं बंधनकारक आहे. आता आपण एकापेक्षा जास्त फॉर्म 16 असतील तर रिटर्न फाईल कसं करायचं ते पाहुया.
1. सर्वप्रथम तुम्हाला लागू होणारा ITR फॉर्म निवडा. कारण बरेच जण रिटर्न फाईल करताना चुकून ITR-1 फॉर्म दाखल करतात; जो वैयक्तिक करदात्यांनी भरायचा असतो.
2. पुढे तुम्ही तुमचे नाव, पत्ता आणि इतर माहिती भरा.
3. त्यानंतर तुम्हाला एका आर्थिक वर्षात किती उत्पन्न मिळाले. ते आयटीआर फॉर्ममध्ये टाकावे लागेल. यासाठी वेगवेगळ्या फॉर्म 16 मधून उत्पन्न एकत्रित करावे लागेल.
4. पुढील टप्प्यात पगारातून टीडीएस रूपात कापल्या जाणाऱ्या गोष्टी, जसे की, घर भाडे भत्ता, प्रवास भत्ता इत्यादी गोष्टी नमूद कराव्या लागतील. तसेच कलम 80C किंवा 80D, 80G अंतर्गत केलेली गुंतवणूक दाखवून तुम्ही तुमचा करपात्र उत्पन्न कमी करू शकता.
5. सर्वात शेवटी तुम्हाला लागू असलेला टॅक्स मोजला जाईल. टॅक्स भरल्यानंतर कर्मचारी त्याचे इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करू शकतो.
एखादा कर्मचारी पूर्वीच्या कंपनीतील उत्पन्न आणि गुंतवणुकीची माहिती नवीन कंपनीला फॉर्म 12B द्वारे देऊ शकतो.
पूर्वीच्या कंपनीमधून फॉर्म 16 जारी न केल्यास काय करावे?
जर तुम्ही मागील कंपनीतून फॉर्म 16 घेतला नसेल किंवा ती कंपनी दिवाळखोरीत निघाली तरच तुम्हाला फॉर्म 16 मिळू शकणार नाही. अशावेळी तुम्ही आयटीआर फाईल करण्यासाठी खालील टप्प्यांचा वापर करू शकता.
1. पूर्वीच्या कंपनीतील पगाराच्या स्लिपचा वापर करून पगारचे ब्रेक-अप आणि टॅक्स कपात करा.
2. आता सर्व उत्पन्न एकत्रित करा आणि त्यातून घर भत्ता, प्रवास भत्ता त्यातून वजा करा.
3. कलम 80C ते 80U अंतर्गत गुंतवणूक केल्यास, त्या वजावटीवर दावा करा.
4. शेवटी टॅक्स दायित्वाची गणना करा आणि दोन्ही कंपन्यांच्या फॉर्म 16 मधून टीडीएस वजा करा.
5. आणि तरीही टॅक्स लागत असेल तर तुम्हाला तो भरावा लागेल. टॅक्स कपात तपासण्यासाठी तुम्ही फॉर्म 26AS चा वापर करा.
ITR कसा फाईल करायचा?
1. आयटीआर फाईल करताना पगाराची स्लिप, फॉर्म 16, गुंतवणुकीची कागदपत्रे आदी सर्व आवश्यक कागदपत्रे गोळा करा.
2. फॉर्म 26AS मधून तुमचा टॅक्स वजा करा. त्यात काही त्रुटी असतील तर दुरूस्त करा.
3. आयटीआर फाईल करत असलेल्या आर्थिक वर्षातील एकूण उत्पन्नाची नोंद करा.
4. एकूण उत्पन्नाची नोंद केल्यानंतर, तुमच्या इन्कम टॅक्स स्लॅबनुसार टॅक्स दायित्वाची (Tax Liability) नोंद करा.
5. आता शेवटी लागू होणाऱ्या टॅक्सची नोंद करा.
6. आता सर्व टॅक्स भरले की, तुम्हाला तुमचा रिफंड मिळवण्यासाठी तुम्ही ITR दाखल करू शकता.
7. शेवटचा टप्पा म्हणजे ITR व्हेरिफाय करायचं. हे व्हेरिफिकेशन तुम्ही इलेक्ट्रॉनिक पद्धतीने करू शकता.
8. आयटीआर व्हेरिफाय झाल्यानंतर इन्कम टॅक्स विभाग तुमच्या रिफंडवर प्रक्रिया सुरू करतो.