पगारदार कर्मचारी ज्यांना मासिक पगार मिळतो अशा व्यक्तींसाठी फॉर्म 16 हा महत्त्वाचा दस्तावेज आहे. या फॉर्ममध्ये कर कपातीबाबतची माहिती, कर्मचाऱ्यांना देण्यात येणारा मासिक पगार आणि वार्षिक उत्पन्न, टॅक्स डिडक्टेड सोर्स यासारखी माहिती असते. ज्या कर्मचाऱ्याच्या पगारातून टॅक्स कापण्यात आला आहे, अशा प्रत्येक कामगाराला फॉर्म 16 देण्याची कंपनीची जबाबदारी असते.
फॉर्म 16 चा उपयोग
फॉर्म 16 हा कर्मचाऱ्यांच्या पगारातून कापल्या गेलेल्या टीडीएसचा (TDS) पुरावा असतो. यावरून हे देखील लक्षात येते की, कंपनीने किंवा संस्थेने टीडीएस कापून सरकारकडे जमा केला आहे. फॉर्म 16 आयटी रिटर्न (IT Return) भरताना उपयोगी ठरतो. याचा वापर मिळकतीचा पुरावा म्हणून केला जातो. बॅंकेकडून कर्ज घेताना बॅंक फॉर्म 16 ची मागणी करते.
फॉर्म 16 कसा डाउनलोड करायचा?
- इन्कम टॅक्स विभागाच्या वेबसाइटवर जा.
- मुख्य पानावर ‘फॉर्म/डाउनलोड’ वर जा आणि ‘इन्कम टॅक्स फॉर्म’ वर क्लिक करा.
- येथे, तुम्हाला 'PDF' आणि 'Fillable Form' असे दोन्ही पर्याय दिसतील.
- तुम्हाला ते डाउनलोड करायचे असल्यास ‘PDF’ वर क्लिक करा.
- फॉर्म ऑनलाईन भरायचा असल्यास, तुम्ही इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या कोणत्याही PDF एडिटरची मदत घेऊन फॉर्म भरू शकता.
फॉर्म 16 ची प्रक्रिया
नोकरीला लागल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याला फॉर्म 16 हवा असल्यास, त्याला कंपनीकडे बचत आणि गुंतवणुकीचा तपशील द्यावा लागतो. दरवर्षी टीडीएस जमा करण्याची अंतिम तारीख 30 एप्रिल असते. त्यानुसार कंपनीकडून रिटर्न भरले जातात. आयटी विभागाने केलेल्या प्रक्रियेनुसार, कंपनीने रिटर्न फाईल केल्यानंतर टीडीएसच्या नोंदी विभागाच्या डेटाबेसमध्ये अपडेट केल्या जातात. रिटर्न भरल्यानंतर विभागाच्या डेटाबेसमध्ये टीडीएस कंपनीला दिसण्यासाठी 10 ते 15 दिवस लागतात. त्यानंतर, कंपनी कर्मचार्यांना रिटर्न भरण्यासाठी फॉर्म 16 देऊ शकते. एखाद्या कर्मचाऱ्याने एका आर्थिक वर्षात एकापेक्षा जास्त वेळा नोकरी बदलल्यास, प्रत्येक कंपनीला त्या कर्मचाऱ्याला संबंधित कालावधीचा फॉर्म 16 द्यावा लागतो.
कर्मचाऱ्यांनी काय काळजी घ्यावी?
फॉर्म 16 भरताना सर्व नोंदी अचूक भरण्याची काळजी कर्मचाऱ्यांनी घेणे गरजेचे आहे. आर्थिक वर्षाच्या सुरूवातीला कंपनीकडे जमा केलेल्या बचत व गुंतवणुकीचा तपशील आणि फॉर्म 16 मधील माहिती यात तफावत नाही ना! याची खात्री करणं गरजेचं आहे. त्यानंतर टीडीएसची रक्कम कापली गेली आहे ना व ती प्राप्तिकर खात्याकडे जमा झाली आहे ना, याची पडताळणी करणे आवश्यक आहे. इन्कम टॅक्स विभागाच्या ट्रेसेस (TRACES) या संकेतस्थळावर करदात्याला टीडीएसची कापलेली रक्कम जमा झाली की नाही ते पहाता येते.
जर तुम्ही कर भरण्यास पात्र असाल तर फॉर्म 16 खूप महत्त्वाचा आहे. तुमच्या उत्पन्नाचा पुरावा म्हणून याचा उपयोग होऊ शकतो. तसेच कोणत्याही बँकेतून कर्ज हवं असल्यास बॅंक फॉर्म 16 ची मागणी करते. त्यामुळे आपल्या कंपनीकडे फॉर्म 16 ची मागणी करण्यास आणि आयटी रिटर्न भरण्यास विसरू नका.
Image source - https://www.hrcabin.com/form-16-in-excel-format/