2022 हे वर्षं अदानी समुह (Adani Group) आणि त्याचे संस्थापक गौतम अदानी (Gautam Adani) यांच्यासाठी गौरवशाली ठरलं आहे. नवीन औद्योगिक क्षेत्रांमध्ये पदार्पण करण्याबरोबरच अदानी समुहाच्या शेअरनीही गगनभरारी घेतली. आणि त्याच्या जोरावर गौतम अदानी (Gautam Adani) जगातले दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले. आशियाई व्यक्तीला हा मान पहिल्यांदाच मिळाला.
आपल्या या प्रवासाचं काही श्रेय अलीकडे इंडिया टुडे मीडिया समुहाला दिलेल्या मुलाखतीत अदानींनी रिलायन्स समुहाचे संस्थापक धीरुभाई अंबानी यांना दिलं आहे. ‘अदानी समुह उभारताना मला धीरुभाई अंबानींची प्रेरणा होती,’ असं या मुलाखतीत गौतम अदानी म्हणाले आहेत. पुढे त्यांचं म्हणणं त्यांनी आणखी विस्ताराने मांडलंय. ते म्हणतात, ‘अगदी मध्यमवर्गीय पार्श्वभूमी असताना धीरूभाईंनी उद्योजक होण्याचं स्वप्न बघितलं. आणि ते खरंही करून दाखवलं. तिथंही एका उद्योगावर थांबले नाहीत. तर औद्योगिक साम्राज्य उभं केलं. याची प्रेरणा मी सतत त्यांच्याकडून घेत आलो आहे.’
खरंतर, गौतम अदानी यांनी असं बोलताना अप्रत्यक्षपणे आपली धीरुभाई अंबानींशी तुलनाच केली आहे. धीरुभाईंप्रमाणेच गौतम अदानी यांनी गुजरातच्या एका छोट्या शहरातून येऊन मुंबईत आपली जागा निर्माण केली. हिरे व्यापारातून सुरुवात करून त्यांनी हळू हळू आपलं प्लास्टिक उद्योग, बंदर देखभाल आणि व्यवस्थापन, विमानतळ देखभाल, अदानी एक्सपोर्ट, ऊर्जा अशा क्षेत्रांमध्ये विस्तार केला. म्हणजे अदानीही आपल्या समुहाचे संस्थापक आणि नवीन उद्योगाची मुहुर्तमेढ रोवणारे द्रष्टे. पण, आपण हे करू शकतो हा विश्वास धीरुभाईंकडून मिळाला असं गौतम अदानी या मुलाखतीत म्हणाले आहेत.
अदानींची श्रीमंतांच्या यादीत भरारी Adani Asia’s Richest Businessman
कोव्हिड नंतरच्या काळात जगभरात अनेक उद्योगांना ओहोटी लागली. आणि त्याचा परिणाम श्रीमंत उद्योजकांच्या यादीत दिग्गजांची घसरण होण्यात झाला. अगदी एकेकाळचे सगळ्यात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांनाही टेस्ला कंपनीच्या शेअरमध्ये झालेल्या घसरणीचा फटका बसला. तर अॅपल कंपनीलाही बसतो आहे.
असं नकारात्मक चित्र असताना गौतम अदानी समुह मात्र सिमेंट, मीडिया अशा नवनवीन क्षेत्रात विस्तार करून आपली मालमत्ता वाढवतो आहे. शिवाय अदानी समुहाच्या शेअरनाही मागणी वाढली आहे. याच्या जोरावर गौतम अदानी यांच्या मालमत्तेत 2022 मध्ये तब्बल 40 अब्ज अमेरिकन डॉलरची भर पडली. आणि त्यामुळे ब्लूमबर्ग रियलटाईम तसंच फोर्ब्सच्या श्रीमंतांच्या यादीतही अदानी दुसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहेत.
अंबानी आणि अदानी यांच्यातलं साम्य Enterprising Journey of Ambanis & Adani
इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत अदानी यांनी देशातल्या औद्योगिक प्रगतीचं श्रेयही धीरुभाई अंबानींना दिलं आहे. ‘उद्योजकता हा गुण आहे. त्याला श्रीमंत पार्श्वभूमीची गरज नाही, हे अंबानींनी दाखवलं. आणि म्हणून माझ्यासारख्या लाखो तरुणांना त्यातून प्रेरणा मिळाली. जागतिक दर्जाचं काम करण्याची प्रेरणा देण्याचं सामर्थ्य धीरुभाईंच्या आयुष्यात होतं,’ असं अदानी म्हणालेत.
गौतम अदानी यांच्या प्रवासात अनेक साम्य आहेत. 1980च्या दशकात गौतम अदानी मुंबईत आपलं नशीब आजमावण्यासाठी आले. तोपर्यंत धीरूभाई हे नाव उद्योग जगतात रुजलेलं होतं. रिलायन्स समुहाची स्थापनाही झालेली होती. अदानी एंटरप्राईजेसने सुरुवात करून गौतम अदानींनीही 1990 आणि 2000 च्या दशकात आपलं साम्राज्य उभं केलं. आणि या प्रवासात धीरुभाईंप्रमाणेच गौतम अदानी यांनी प्रस्थापित भारतीय उद्योजकांना मागे टाकून क्षणार्धात गगनभरारी घेतली.