• 04 Oct, 2022 15:42

गौतम अदानींची मोठी झेप, श्रीमंत व्यक्तींच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर!

Gautam Adani Second richest person in the world

भारतीय उद्योजक गौतम अदानी यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक नवनवीन उद्योगांमध्ये गुंतवणूक करत फोर्ब्सच्या श्रीमंत व्यक्तींच्या रिअल टाईम यादीनुसार अॅमेझॉनचे जेफ बेझॉस यांना मागे टाकत दुसरा क्रमांक पटकावला आहे.

भारतीय बिलिनिअर, उद्योजक आणि अदानी ग्रुपचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या संपत्तीत आश्चर्यकारक वाढ झाली असून ते जगातील सर्वाधिक दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. फोर्ब्सच्या रिअल टाईम बिलिनिअर यादीनुसार (Real Time Billionaires - Forbes) 16 सप्टेंबर, 2022 रोजी अदानींची एकूण संपत्ती 155.7 अब्ज डॉलर इतकी मोजली गेली. त्यांच्या संपत्तीत 5.5 अब्ज डॉलरने म्हणजेच सुमारे 4 टक्क्यांनी वाढ झाली. त्यांचा हा वेग पाहता ते लवकरच पहिल्या क्रमांकावरील इलॉन मस्क यांना मागे टाकतील, असे दिसते.

अमेझॉनचे जेफ बेझॉस यांना मागे टाकले!

भारतातील उद्योजक गौतम अदानी यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक नवनवीन उद्योगांमध्ये गुंतवणूक केली तर काही कंपन्या विकत घेतल्या. परिणामी त्यांनी भारतातील रिलायन्स उद्योग समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांना केव्हाच मागे टाकले आहे. फोर्ब्सच्या श्रीमंत व्यक्तींच्या नवीन यादीनुसार अदानी यांनी अमेझॉनचे जेफ बेझॉस यांना मागे टाकत दुसरा क्रमांक पटकावला आहे. तर 273.5 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह टेस्लाचे इलॉन मस्क हे अजूनही पहिल्या क्रमांकावर आहेत.

अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये वाढ!

अदानी समुहातील अदानी इंटरप्रायझेस, अदानी पोर्ट आणि अदानी ट्रान्समिशन या कंपन्यांच्या शेअर्सने शुक्रवारी (दि.16 सप्टेंबर) सकाळच्या सत्रात बीएसईवर (Bombay Stock Exchange-BSE) चांगली कामगिरी केल्याने अदानी समुहाचे अध्यक्ष या नात्याने गौतम अदानी यांच्या संपत्तीत वाढ झाली.

पहिल्या क्रमांकाच्या दिशेने वाटचाल!

अदानी यांच्या संपत्तीत 2022 या वर्षात आतापर्यंत 70 अब्ज डॉलर्सने वाढ झाली आहे. अदानी हे एकमेव असे उद्योजक आहेत, की जगातील 10 सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी त्यांच्याच संपत्तीत वाढ झाली. गौतम अदानी यांनी फ्रेब्रुवारी महिन्यात रियायन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना मागे टाकत आशियामध्ये सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती बनले. त्यानंतर गेल्या महिन्यात जगातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती असलेले मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स यांना मागे टाकले. अदानी यांची घौडदौड अद्याप संपलेली नाही. ते ज्या पद्धतीने एका मागोमाग प्रत्येक उद्योगात आपले हातपाय पसरवत आहेत. त्यांची ती झेप पाहता ते लवकरच पहिल्या क्रमांकावर पोहचतील.

सर्व क्षेत्रात शिरकाव

गौतम अदानी यांचे वय 60 वर्ष असून ते भारतातील सर्वांत मोठ्या पोर्ट ऑपरेटर कंपनी असलेल्या अदानी समुहाचे अध्यक्ष आहेत. अदानी यांनी पायाभूत सोयीसुविधांसह, कमॉडिटी, वीजनिर्मिती, वीज पारेषण आणि रिअल इस्टेटमध्ये आपले साम्राज्य उभे केले. मे 2022 मध्ये अदानी यांनी परदेशातील होलसिम कंपनीचा भारतातील सिमेंट उद्योग 10.5 अब्ज डॉलर्समध्ये विकत घेतला.

मार्च 2022 च्या स्टॉक एक्सचेंजमधील फायलिंगनुसार, अदानी एंटरप्रायजेस, अदानी पॉवर आणि अदानी ट्रान्समिशन्समध्ये गौतम अदानी यांची 75 टक्के भागीदारी आहे. तसेच त्यांची अदानी टोटल गॅसमध्ये मारे 37 टक्के, अदानी पोर्ट्स आणि विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) मध्ये 65 टक्के आणि अदानी ग्रीन एनर्जीमध्ये 61 टक्के मालकी आहे.