ई-कॉमर्स क्षेत्रातली (E Commerce) स्टार्ट अप (Startup) कंपनी फ्लिपकार्टने (Flipkart) आपला सिझन एंड सेल (Season End Sale) यशस्वी झाल्याचं म्हटलंय. ख्रिस्मस (Christmas) आणि न्यू ईयरमुळे (New Year) फॅशन (Fashion & Lifestyle) आणि लाईफस्टाईल सेंगमेंटमध्ये असलेल्या वस्तूंना मोठी मागणी होती. आणि त्याच्या जोरावर या सेलदरम्यान कंपनीने जवळ जवळ 82 लाख वस्तूंची विक्री केली. 
जवळ जवळ 2 लाख ग्राहकांनी या सेलमध्ये सहभाग घेतला. आणि वस्तूंची मागणी खासकरून बंगळुरी, नवी दिल्ली, हैदराबाद, कोलकाता, मुंबई, पुणे, चेन्नई, लखनौ, गुरगाव आणि गुवाहाटी या शहरांमधून होती. कंपनीने अलीकडेच 7 डिसेंबर ते 12 डिसेंबर दरम्यान एंड-ऑफ-सिझन सेल आयोजित केला होता.
एक पत्रक काढून कंपनीने ही माहिती दिली आहे. ‘दर मिनिटाला 14 ऑर्डर ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर येत होत्या. आणि यातले बहुतेक ग्राहक हे 25-35 वयोगटातले होते. तसंच फॅशन आणि लाईफस्टाईल सेगमेंटला मोठी मागणी होती,’ असं या पत्रकात म्हटलं आहे.
लग्नाचा हंगामही जवळ आला आहे. त्यामुळे या सेलमध्ये 38,000 च्या वर कॉकटेल ड्रेसना मागणी आली. तर साड्या, दागिने, हँडबॅग, मुलींचे लेहेंगे या वस्तूंना मागणी होती. मुलांमध्ये ब्लेझर आणि तयार सूट यांची मागणी मोठी होती.
‘भारतीय लोकांमध्ये फॅशनची आवड वाढतेय. आणि महत्त्वाचं म्हणजे तिसऱ्या दर्जाच्या म्हणजे T3 शहरांमधूनही यावेळी वस्तूंना मागणी होती. हे ऑनलाईन शॉपिंग असल्यामुळे दोन गोष्टी यातून स्पष्ट होतायत. लोकांचा खरेदीचा उत्साह आणि तंत्रज्ञान तिसऱ्या दर्जाच्या शहरांपर्यंत पोहोचल्याची खात्री,’ असं फ्लिपकार्टचे फॅशन संचालक अभिषेक मालू यांनी या पत्रकात म्हटलं आहे.
तंत्रज्ञानाची व्याप्ती वाढल्यामुळे आणखी लाखो ग्राहक ई-कॉमर्सशी जोडले गेल्याचं मालू यांनी बोलून दाखवलं.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            