अचानक आलेल्या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी आपण आपल्याकडील सोनं, मालमत्ता, जमीन, बँकेतील एफडी, शेअर्स, म्युच्युअल फंड बँकेकडे किंवा वित्तीय संस्थांकडे तारण ठेऊन पैसे मिळवता येतात. यामध्ये सुरक्षित (Secured) आणि असुरक्षित (Unsecured) असे कर्जाचे दोन प्रकार आहेत. सुरक्षित कर्जामध्ये एखादी वस्तू तारण ठेऊन कर्ज घेतले जाते. जर बॅंकेचा नियोजित हप्ता वेळेत भरला नाही तर जे काही तारण ठेवले आहे, ते विकण्याचा बँकेला अधिकार असतो.
आपण जर काही तारण ठेऊन कर्ज घेत असू, तर जास्त रकमेचं आणि जास्त वेळेसाठी कर्ज मिळतं. असुरक्षित कर्जे महाग असतात. अशाप्रकारच्या कर्जासाठी बॅंकेजवळ कोणतीही वस्तू तारण ठेवावी लागत नाही. असुरक्षित कर्जामध्ये वैयक्तिक कर्ज, भांडवली कर्ज, शैक्षणिक कर्ज यांचा समावेश होतो. प्रत्येक बॅंकांचे आणि वित्तीय संस्थांचे व्याजदर आणि नियमांमध्ये फरक असू शकतो. त्यामुळे तुम्ही जर एखादी वस्तू तारण ठेवून कर्ज घेणार असाल कर्ज देणाऱ्या बॅंकेची किंवा वित्तीय संस्थेची संपूर्ण माहिती घेऊनच कर्ज घ्यावे. कोणकोणत्या गोष्टी तारण ठेऊन कर्ज मिळू शकते हे आपण पाहू.
मालमत्तेवर कर्ज (Property loan)
अडचणीच्या वेळी जर आपल्याकडे प्रॉपर्टी असेल. तर आपण घर, हॉटेल, जमीन बँकेकडे आपल्या प्रॉपर्टीचे कागदपत्रं तारण ठेवून कर्ज काढता येते. प्रॉपर्टीच्या बाजारभावानुसार 60 ते 80 टक्के रक्कम कर्ज म्हणून दिली जाते. यावर बॅंकांच्या व्याजदरानुसार प्रत्येक महिन्याला त्याचा परतावा करावा लागतो.
सोनं तारण कर्ज (Gold loan)
सोनं तारण कर्ज हे सगळ्यात सोपं आणि कमी व्याजदराने मिळणारे कर्ज आहे. कोणत्याही बँकेत माफक व्याजदराने सोनं तारण ठेऊन झटपट कर्ज मिळतं. सोनं तारण ठेऊन कर्ज देणाऱ्या अनेक वित्तीय संस्था आहेत. सोनं तारण ठेवून कर्ज देणाऱ्या प्रत्येक घटकांचे व्याजदर वेगवेगळे आहेत. बॅंका आणि वित्तीय संस्थांच्या तुलनेत सोनाराकडून घेतलेले कर्ज अधिक व्याजाने मिळू शकते.
एफडी, शेअर्स आणि एलआयसी पॉलिसी (FD, Shares & LIC Policy)
तुमच्या एखाद्या बँकेतील मुदत ठेवी (एफडी) असतीली आणि तिचा कालावधी (मॅच्युअर्ड) पूर्ण होण्यासाठी अवधी शिल्लक आहे, तर बॅंक त्या मुदत ठेवीवर कर्ज देऊ शकते. तसेच तुम्ही शेअर्स किंवा तुमचा आरोग्य विमा तारण ठेवून कर्ज मिळवू शकता.
अशाप्रकारे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू तारण ठेवून कर्ज मिळवू शकता. पण हे कर्ज मुदतीत फेडले केले नाही तर या वस्तुंचा लिलाव करण्याचा अधिकार बॅंकेला मिळतो.