आजच्या काळात गुणवत्तापूर्ण आणि चांगले शिक्षण घ्यायचे असेल तर ते आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. पण प्रत्येक पालकांना असे वाटत असते की, आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळायला हवे. यासाठी ते स्वत: आतोनात कष्ट घेतात. मुले ही यासाठी अधिकची मेहनत घेत असतात. पण या सगळ्यात पैशांचे सोंग मात्र कोणालाही घेता येत नाही. यासाठी शैक्षणिक कर्ज घेणे हा एक चांगला पर्याय असल्याचे दिसून येते. उच्च शिक्षण किंवा बाहेरच्या देशात जाऊन शिक्षण घेण्यासाठी पैसे कमी पडत असतील तर बॅंका शैक्षणिक कर्ज देतात. आज आपण हे कर्ज कसे मिळते, कोणाला मिळते त्याच्यासाठी कागदपत्रे काय लागतात, याची माहिती घेणार आहोत.
ज्या विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी पैशांची आवश्यकता असते, असे विद्यार्थी शिक्षण पूर्ण करण्यासाठी बॅंकेकडून शिक्षण पूर्ण करण्यासाठी विशिष्ट मुदतीचे कर्ज घेतात. त्याला शैक्षणिक कर्ज म्हणतात. शैक्षणिक कर्जाचे ढोबळमानाने 2 प्रकार पडतात, एक देशांतर्गत शैक्षणिक कर्ज (Domestic Education Loan) आणि दुसरे परदेशी शैक्षणिक कर्ज (Overseas Education Loan).
देशांतर्गत शिक्षण कर्ज
भारतात राहून शिक्षण घेऊ इच्छिणारे विद्यार्थी या प्रकारच्या कर्जासाठी अर्ज करू शकतात. अर्जदाराने भारतीय शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेतल्यास आणि कर्जासाठी आवश्यक असणारे सर्व निकष पूर्ण केले तर बॅंकेकडून कर्ज मिळते.
परदेशी शिक्षण कर्ज
बाहेरच्या देशांमधील विद्यापीठांमध्ये शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना अशाप्रकारच्या कर्जाची मदत होते. सदर विद्यार्थ्याने कर्जाशी संबंधित पात्रता निकष पूर्ण केल्यावर विद्यार्थ्यांचे परदेशात जाण्यासाठीचे विमान भाडे, राहण्याची व्यवस्था आणि एज्युकेशनल फी साठी कर्ज मंजूर केले जाते. भारतातील अनेक बँका आणि नॉन बॅंकिंग फायनानशिअल कंपन्या (NBFC) अशा होतकरू विद्यार्थ्यांना कमी व्याजदराने शैक्षणिक कर्ज देतात.
अभ्यासक्रमाची निवड करताना लक्षात घेण्यासारख्या गोष्टी
परदेशातील मोठमोठ्या विद्यापीठांची आणि कॉलेजेसची फक्त नावे ऐकून अभ्यासक्रमाची निवड करू नका.
शिकण्याच्या बहाण्याने परदेशात जाण्यासाठी मिळेल म्हणून कोणताही कोर्स निवडू नका.
परदेशात शिकण्याची तुमची इच्छा असेल तरच परदेशात जा. पालकांच्या किंवा कोणाच्याही आग्रहासाठी परदेशात शिकण्यासाठी जाऊ नका.
परदेशात जाऊन शिकण्याच्या निर्णयावर ठाम असाल तर योग्य कोर्स निवडा आणि शैक्षणिक कर्जासाठी अर्ज करा.
ज्या विद्यापीठात शिकण्यासाठी जाणार आहात तिथल्या प्लेसमेंट धोरणांची संपूर्ण माहिती घ्या.
शैक्षणिक कर्जासाठी बॅंकेत अर्ज करताना अभ्यासक्रमावर आधारित बॅंका कर्जाची प्रकार, रक्कम आणि मुदत ठरवतात. यात प्रामुख्याने पदवीपर्यंतचे शिक्षण (Undergraduate Loans), पदव्युत्तर शिक्षण (Postgraduate Loans) आणि व्यावसायिक अभ्यासक्रम (Career development Loans) असे कर्जाचे प्रकार असतात.
शैक्षणिक कर्जाची वैशिष्ट्ये आणि फायदे
शैक्षणिक कर्जा अंतर्गत परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 1 कोटी तर देशांतर्गत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 50 लाखांपर्यंतचे कर्ज मिळते.
हे कर्ज काही अटींसह 100 टक्के दिले जाते.
यात विद्यार्थ्यांच्या प्रवास खर्चासोबतच शैक्षणिक साहित्य, फी इत्यादींचा समावेश असतो.
अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर आणि नोकरी लागल्यानंतर सहा महिन्यानंतर कर्ज फेडता येते.
शैक्षणिक कर्जाअंतर्गत समाविष्ट होणारे खर्च
शैक्षणिक शुल्क
परीक्षा/लायब्ररी/प्रयोगशाळा शुल्क
परदेशातील प्रवासाचा आणि अभ्यासाचा खर्च
परदेशात राहताना विमा काढला असल्यास त्याचा प्रीमियमचा खर्च
पुस्तके/उपकरणे/वाद्ये/गणवेश खरेदी इत्यादींचा एकूण खर्च कर्जाच्या 20 टक्क्यापेक्षा जास्त नसावा.
अभ्यासक्रमासाठी आवश्यक असणारा लॅपटॉपचा खर्च, हा खर्च एकूण कर्जाच्या 20% पेक्षा जास्त नसावा.
आवश्यक कागदपत्रे
अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाल्याचे प्रमाणपत्र
परदेशात जात असल्यास तिथल्या विद्यापीठाचे पत्र
व्हिसाशी संबंधित कागदपत्रे
शैक्षणिक कागदपत्रे
बॅंकेचा अर्ज
अभ्यासक्रमाची फी रचना
काही प्रकरणांमध्ये उत्पन्नाचा पुरावा, सहअर्जदाराची केवायसी आवश्यक आणि अतिरिक्त कागदपत्रांची मागणी केली जाऊ शकते.
कर्जाची परतफेड कशी करता येते
अभ्यासक्रम संपल्यानंतर एक वर्षानंतर किंवा नोकरी मिळाल्यानंतर सहा महिन्यांनंतर कर्जाची परतफेड सुरू होते. विद्यार्थ्यांना कर्ज फेडण्यासाठी अनेक सवलती मिळतात.
ईएमआय कमी करण्यासाठी कोर्स चालू असताना काही प्रमाणात रक्कम भरू शकता. या कालावधीत तुम्ही व्याज दिले, तर ईएमआय मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो.
कित्येक बँका स्थगिती कालावधीत व्याज भरणार्यांना एक टक्का व्याज सवलतही देतात. कर्ज परतफेड करण्याची क्षमता पाहून काही बँका कर्ज वाढवून ही देतात.