Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

मालमत्तेवर कर्ज घ्यायचे आहे? जाणून घ्या नियम व अटी

मालमत्तेवर कर्ज घ्यायचे आहे? जाणून घ्या नियम व अटी

मुलांची लग्न, परदेशातील शिक्षणाचा खर्च किंवा व्यवसायासाठी लागणाऱ्या मोठ्या रकमेसाठी मालमत्तेवरील कर्ज (Loan Against Property) हा योग्य पर्याय ठरू शकतो. यासाठीच्या अटी आणि नियमांबाबत आपण जाणून घेणार आहोत.

पैसा हा प्रत्येक गोष्टीसाठी आवश्यक असतो. आयुष्यात मोठ्या रकमेची गरज कधी लागेल हे कोणीच सांगू शकत नाही. कोणाला घर घ्यायचं असतं, मुलांना उच्चशिक्षणासाठी परदेशी पाठवायचं असतं किंवा घरात कोणी गंभीर आजारी पडतं, कोणाला व्यवसायाचा विस्तार करायचा असतो, अशा सगळ्या गोष्टींसाठी पैसा लागतो. अशा ऐनवेळी उद्भवलेल्या कारणांसाठी तुम्ही तुमच्या मालमत्तेवर कर्ज (Loan Against Property) घेऊ शकता. कर्ज घेताना संबंधित मालमत्ता (Property) ही तुमच्या नावावर असणे आवश्यक आहे. त्या घराचे बांधकाम पूर्ण झालेले पाहिजे. तसेच त्या घरात तुम्ही राहात असाल किंवा ते घर भाड्यावर दिले असेल किंवा त्या जागेत तुम्ही व्यवसाय करत असाल, तरीही त्या जागेवर तुम्हाला कर्ज मिळू शकते. विविध कारणांसाठी बॅंका मालमत्तेवर कशाप्रकारे कर्ज देतात, याविषयी आपण जाणून घेणार आहोत.

मालमत्तेवर किती कर्ज मिळतं?

एखादी मालमत्ता बॅंकेकडे गहाण ठेवून 5 लाख ते 10 कोटी रूपयांपर्यंत कर्ज मिळू शकते. गहाण ठेवण्यात येणाऱ्या मालमत्तेचे सध्याचे बाजार मूल्य आणि त्याची स्थिती यावर किती रूपयांचे कर्ज मिळू शकतं, हे बँक ठरवते.

कर्ज परतफेडीचा कालावधी किती असतो?

मालमत्तेवर घेतलेल्या कर्जाचा परतफेडीचा कालावधी हा 15 ते 20 वर्षापर्यंत असू शकतो. प्रत्येक बॅंकेच्या नियमानुसार, कर्जाची रक्कम, कर्जाची मुदत, मालमत्तेचे मूल्य आणि ग्राहकाच्या वयानुसार यात बदल होऊ शकतो.

मालमत्तेवरील कर्जाचा व्याजदर काय आहे?

मालमत्तेवर वैयक्तिक आणि व्यावसायिक कारणासाठी कर्ज घेता येते. BankBazaar.com या संकेतस्थळानुसार, बॅंका जास्तीत जास्त 20 वर्षांसाठी कर्ज देतात आणि यासाठी 7.9 टक्क्यांपासून 9.5 टक्क्यांपर्यंत व्याजदर आकारला जातो. अक्सिस बॅंक 7.9 टक्के ते 9.3 टक्के या दरम्यान 5 लाख ते 5 कोटी रूपयांपर्यंत कर्ज देते. स्टेट बॅंक ऑफ इंडिया 8.45 टक्के, एचडीएफसी बॅंक 8 टक्के, कोटक महिंद्रा बॅंक 9.5 टक्के दराने कर्ज देते.

कर्जाची प्रक्रिया कशी असते?

मालमत्तेवर कर्ज मिळवण्यासाठी कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत अर्ज केल्यानंतर तुमच्या कागदपत्रांची पडताळणी करून 7 ते 8 दिवसांत कर्ज मिळू शकते. कर्ज घेण्यापूर्वी विविध बॅंकांच्या व्याजदरांची माहिती घेऊन, तुम्हाला योग्य वाटलेल्या बॅंकेकडे मालमत्तेच्या आवश्यक कागदपत्रांसह बॅंकेकडे अर्ज करावा लागतो. या प्रक्रियेसाठी बॅंका अ‍ॅप्लिकेशन किंवा लॉगिन शुल्क आकारतात. हे शुल्क प्रत्येक बॅंकेचे वेगवेगळे असू शकते. हे शुल्क नॉन रिफडेंबल असू शकते. म्हणजे तुम्हाला काही कारणांमुळे बँकेकडून कर्ज मंजूर झाले नाही तरी हे शुल्क बँकेकडून परत मिळत नाही. बॅंकेकडून कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर कर्ज मंजूर केले जाते. कर्ज मंजूर झाल्यानंतर प्रक्रिया फी (Process Fee) भरावी लागते. ही फी प्रत्येक बँकेसाठी वेगवेगळी असू शकते.

मालमत्तेवरील कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

बॅंकेने उपलब्ध करून कर्जासाठीचा अर्ज, आधार कार्ड, पॅन कार्ड, राहात असलेल्या जागेचा पुरावा, बँकेची KYC, बँकेचे तीन महिन्यांचे स्टेंटमेंट, आयकर भरल्याचा दोन वर्षांचा पुरावा, उत्पन्नाचा पुरावा आणि ज्या मालमत्तेवर कर्ज घ्यायचे आहे त्या मालमत्तेची कागदपत्रं.

कोणाला मिळू शकते मालमत्तेवर कर्ज?

सरकारी किंवा खासगी कंपनीत काम करणारे, वकील, चार्टड अकाऊंटंट, डॉक्टर यांच्यासारखे व्यावसायिक, छोटे व्यवसायिक, मोठमोठे व्यापारी अशा कोणात्याही भारतीय नागरिकाला मालमत्तेवर कर्ज मिळू शकते. अनेक बँका 28 ते 60 वर्षे वयोमर्यादा असणाऱ्या व्यक्तींना कर्ज मंजूर करू शकतात. याबाबतीत काही बॅंकांचे नियम वेगवेगळे असू शकतात.

मालमत्तेवरील कर्जाबाबत असलेले गैरसमज

  1. मालमत्तेवर कर्ज घेतले आणि हफ्ते भरता आले नाही तर मालमत्ता जप्त होते, अशी भीती अनेकांना वाटत असते. पण सर्व प्रकारच्या कर्जामध्ये अशीच तरतूद असते. कर्जाचे हप्ते फेडले गेले नाही तर तारण ठेवलेली कोणतीही मालमत्ता किंवा वस्तू बॅंकेकडून जप्त केली जाते.
  2. एकदा मालमत्तेवर कर्ज घेतले की ती मालमत्ता तुम्हाला वापरता येत नाही असा अनेकांचा गैरसमज होतो. पण असे नसते, तुम्ही त्या मालमत्तेत राहू शकता, व्यवसाय करू शकता किंवा ती मालमत्ता भाड्याने सुद्धा देऊ शकता.
  3. बऱ्याच जणांचा असाही समज होतो की, मालमत्तेची जितकी किंमत आहे, तितके कर्ज मिळते. पण तसे नसते. बॅंकांकडून मालमत्तेच्या किमतीच्या केवळ 50 ते 80 टक्के या दरम्यान कर्ज मिळू शकते. मालमत्तेची रिसेल व्हॅल्यू (resale value) आणि कर्ज घेणाऱ्याचे उत्पन्न किती यावर ही किंमत ठरते.

मालमत्तेवरील कर्ज हे खात्रीलायक कर्ज विभागामध्ये मोडते, इथे मालमत्तेचा वापर सुरू ठेवत अप्रत्यक्ष तारण होते. त्यामुळे अनेकांसाठी मालमत्ता कर्ज हा सुलभ पर्याय ठरू शकतो. पण ते घेण्यापूर्वी सर्व गोष्टींची रीतसर माहिती  घेणे योग्य ठरेल. 

Image Source - <a href='https://www.freepik.com/photos/mortgage-loan'>Mortgage loan photo created by jcomp - www.freepik.com</a>