लॉकडाऊनच्या काळात सोने गहाण ठेवण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली होती. त्याचे कारण ही तसेच होते. लॉकडाऊनपूर्वी सोनं गहाण ठेवण्याचा कर्जाचा व्याजदरही अधिक होता. तो गेल्या 2 वर्षांत मोठ्या प्रमाणात कमी झाला असून सध्या हा दर 7.30 ते 25 टक्के यादरम्यान आहे. आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या लोकांसाठी गोल्ड लोन हा एक चांगला पर्याय आहे. यासाठी खूप साऱ्या कागदपत्रांची गरज ही लागत नाही.
आर्थिक आणीबाणी असताना सोन्यावर कर्ज काढून लहान व्यावसायिक किंवा एखाद्या कुटुंबाला संकटातून मार्ग काढण्यासाठी तात्पुरता दिलासा मिळू शकतो. ज्यांना खरंच मोठ्या आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे; ते आपली रोख रकमेची गरज पूर्ण करण्यासाठी सुवर्ण कर्ज घेऊ शकतात. सोनं विकण्याऐवजी ते गहाण ठेवून त्यावर कर्ज घेणे हे सोयिस्कर ठरू शकते. बँका आणि नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी (NBFC) यांच्याकडून सोनं कर्ज घेता येऊ शकतं. आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टी सांगणार आहोत, ज्या तुम्ही सुवर्ण कर्ज घेताना लक्षात ठेवाव्यात.
सोन्यावर कर्ज घेणं कितपत फायदेशीर आहे?
सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील काही बँकांकडून गोल्ड लोन मिळते. सोनं गहाण ठेवून तुम्ही तुमची निकडीची गरज भरून काढू शकता. तसेच यातून तुम्हाला रोख रकमेचा पर्याय मिळतो. सोन्याचे दागिने, नाणी किंवा सोन्याच्या कोणत्याही वस्तू गहाण ठेवून रोख रक्कम मिळवू शकता. पैसे भरल्यानंतर तुम्ही गहाण ठेवलेले दागिने किंवा सोने परत घेऊ शकता.
सोन्यावर कर्ज कुठून घेऊ शकतो?
तुम्ही बँका आणि नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्या (NBFC) यांच्याकडून सोनं गहाण ठेवून कर्ज घेऊ शकता. पण, या दोन्ही संस्थांमध्ये खूप फरक आहे. त्यांचे व्याजदर आणि नियम वेगवेगळे असू शकतात. नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्यांच्या तुलनेत बँका चांगला व्याजदर देऊ शकतात. पण नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्या लगेच कर्ज उपलब्ध करून देऊ शकतात. सर्व बँकांच्या शाखांमध्ये ही सुविधा असतेच असे नाही.
सोन्यावर किती कर्ज मिळतं?
सोन्यावर 10 हजारापासून 1 कोटी रूपयांपर्यंत कर्ज मिळू शकते. पण गहाण ठेवल्या जाणाऱ्या दागिन्यांवर किती कर्ज द्यायचे याचे प्रत्येक बॅंकेचे नियम वेगवेगळे असतात. साधारणत: सोन्याच्या एकूण किमतीवर 75 टक्के रकमेचे कर्ज दिले जाते. यात सोन्याच्या शुद्धतेनुसार म्हणजेच 22 कॅरेट, 24 कॅरेट सोनं यांचे दर वेगवेगळे असू शकतात.
सोन्याच्या कर्जावरील परतफेडीचे पर्याय
सोन्याच्या कर्जावर परतफेडीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या सोयीनुसार त्याची निवड करू शकता. जसे की, तुम्ही ईएमआयद्वारे (EMI) पेमेंट करू शकता किंवा फक्त कर्जाच्या काळातील व्याज भरू शकता किंवा एकदम मुद्दल रक्कम भरून पूर्ण पेमेंट करू शकता. सोन्याचे कर्ज परतफेड करताना शिस्त राखणे खूप आवश्यक आहे. कारण वेळेवर ईएमआय किंवा ठरलेली रक्कम भरली गेली नाही तर तुमच्याकडून बॅंक 2 ते 3 टक्के दंड आकारू शकते. तसेच सलग तीनपेक्षा जास्त ईएमआय न भरल्यास तुम्हाला अधिक दंड भरावा लागू शकतो.