फिफा वर्ल्ड कप फायनलमध्ये विजय अर्जेंटिनाचा होवो किंवा फ्रान्सचा, भारतीय पब आणि बार रविवारच्या रात्री भरून वाहणार अशीच चिन्हं आहेत. इतकंच नाही तर अनेक मल्टीप्लेक्सही मोठ्या स्क्रीनवर मॅच लाईव्ह दाखवण्याची तयारी करत आहेत. आणि सगळ्यांना खात्री आहे हाऊसफुल्ल रविवारची !
नवी दिल्ली जवळच्या गुरग्राम इथं सायबर हब या मॉलमध्ये सामन्यांसाठी आगाऊ बुकिंग झालं आहे. DLF रिटेलच्या कार्यकारी संचालक पुष्पा बेक्टर यांनी इकॉनॉमिक टाईम्सशी बोलताना सांगितलं की, ‘मॉलमधील अँफीथिएटर, रेस्टो बार यांचं बुकिंग आधीपासून झालं आहे. फुटबॉलच्या बरोबरीनं चांगलं संगीत, तरुणांमध्ये लोकप्रिय असलेले खाद्यपदार्थ आणि मनोरंजन इथं असणार आहे.’
नवी दिल्लीतले इतर मॉलही यात मागे नाहीएत. तर मुंबई, बंगुळुरू, कोलकाता आणि केरळ या फुटबॉलची अफाट लोकप्रियता असलेल्या राज्य आणि शहरांतही मॉल्स त्या दिवशी भरून वाहतील अशी लक्षणं आहेत. आगाऊ बुकिंगबरोबरच मॉल आणि थिएटर्सनी फुटबॉल रसिकांना त्या दिवशीसाठी पॅकेज देऊ केली आहेत.
ही पॅकेज सरासरी 10,000 रुपये किंवा त्याच्या पुढची आहेत. या पैशात तुम्हाला मॅचचा आनंद लुटता येणार आहे. शिवाय बरोबर उच्च प्रतीची दारू आणि जेवणही मिळेल.
‘फुटबॉलचा अंतिम सामना भारतीय वेळेनुसार साडे आठ वाजता सुरू होणार आहे. आणि यापेक्षा योग्य वेळ सेलिब्रेशनसाठी असूच शकत नाही. एरवीही पब आणि बारसाठी याच वेळेत गर्दी वाढते. तेव्हा फुटबॉल फायनलचा थरार आमच्या धंद्यासाठी फलदायी ठरेल अशीच आशा आहे,’ असं द बिअर कॅफे चेनचे संस्थापक राहुल सिंग म्हणाले. बिअर कॅफेची आऊटलेट दिल्लीसह मुंबई, बंगळुरू या महानगरातही आहेत. आगाऊ बुकिंगच्या बरोबरीने ऐनवेळी येणाऱ्या लोकांची निराशा होऊ नये याची सोयही केल्याचं बिअर कॅफेचं म्हणणं आहे.
भारतात मेस्सीचं फॅन फॉलोइंग Messi The Super Star in India
भारतीय फुटबॉल टीम फिफा वर्ल्ड कपमध्ये खेळत नसली तरी अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लियोनेल मेस्सीचा मोठा चाहता वर्ग भारतात आहे. म्हणूनच भारतातून 20,000 च्या वर लोक फायनल बघायला कतारला गेले आहेत. मेस्सी आपला शेवटचा वर्ल्ड कप खेळत असल्याचं जवळ जवळ स्पष्ट आहे. त्यामुळे या फायनलची उत्सुकताही मोठी आहे.
शिवाय लियोनेल मेस्सी आणि फ्रान्सचा एमबापे यांच्यातलं द्वंद्वही लोकांना पाहायचं आहे.
फायनलसाठी फक्त पब आणि बार सज्ज आहेत असं नाही तर ब्रँडनीही त्यांच्याबरोबर टायअप केलं आहे. बडवायजर या बिअर कंपनीने सहा महानगरातल्या बार आणि पबबरोबर टायअप केलं आहे. काही फूड आऊटलेट्सनी अन्नपदार्थांची नावं टीमच्या नावावरून किंवा खेळाडूंच्या नावावरून ठेवली आहेत.