भारतात सर्वात जास्त वेगाने जर कुठले मार्केट वाढत असेल तर ते आहे रिअल इस्टेट! दिवसेंदिवस प्रॉपर्टी खरेदी करणे महाग होत चालले आहे. तुम्ही देखील प्रॉपर्टी खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि महागाईमुळे चिंतेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
बाजारभावापेक्षा सुमारे 20% कमी दरात तुम्ही मालमत्ता खरेदी करू शकता. आता तुम्ही म्हणाल की कुठल्या तरी विवादित किंवा अनधिकृत प्रॉपर्टीबद्दल आम्ही बोलत आहोत. परंतु असा काही गैरसमज करून घेण्याची अजिबात गरज नाही. कारण आम्ही ज्या प्रॉपर्टीची माहिती तुम्हाला सांगणार आहोत ती 100% अधिकृत आणि संरक्षित मालमत्ता आहे.
बँका मालमत्तेचा लिलाव का करतात?
बऱ्याचदा असं घडतं की, गृहकर्जासाठी ग्राहक अर्ज करतात. कर्ज मिळवण्यासाठी आवश्यक त्या सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या जातात. परंतु नियमित गृहकर्जाचे हफ्ते न भरल्यामुळे कर्जदाराचे घर बँक ताब्यात घेते. बँकेचे मुख्य काम असते वित्त पुरवठा करणे. जप्त केलेली मालमत्ता संभाळणे हे बँकेचे काम नाही. त्यामुळे दरवर्षी जप्त केलेल्या मालमत्ता बँका लिलावात काढतात.
लिलावात काढलेल्या मालमत्ता या तुम्हाला खरेदी करता येऊ शकतात. बाजारभावापेक्षा सुमारे 20% कमी दरात बँका मालमत्ता विक्रीस काढतात. हे लक्षात असू द्या की, कुठल्याही घराला किंवा गृहप्रकल्पाला कर्ज देताना बँक त्या जागेची कागदपत्रे, त्याची वैधता, ती जागा आणि विकासक अधिकृत आहे किंवा नाही याची शहानिशा करूनच कर्ज देते. त्यामुळे बँकांनी अधिकृतपणे लिलावात काढलेली मालमत्ता ही अवैध आणि सुरक्षित असते.
लिलावात मालमत्तेची खरेदी केल्याने खरेदीदारांची बचत होऊ शकते.तसेच गुंतवणुकीची ही एक संधीं म्हणून देखील गुंतवणुकदार याचा फायदा घेऊ शकतात. लिलावात मालमत्ता खरेदी करण्याचे काही प्रमुख फायदे येथे देत आहोत:
बाजारभावापेक्षा कमी किंमत: लिलावात मालमत्ता अनेकदा त्यांच्या बाजार मूल्यापेक्षा कमी किमतीत विकल्या जातात. याचे कारण असे की मालमत्ता लवकर विकल्या जाव्यात अशी बँकांची भूमिका असते.लिलावातून नफा कमावणे हे बँकेचे उद्दिष्ट नसते. बँकांचे अडकलेले पैसे त्यांना परत मिळवायचे असतात. परिणामी, खरेदीदार चांगला सौदा करून बाजारभावापेक्षा कमी किमतीत प्रॉपर्टी मिळवू शकतात आणि तुमचे पैसे वाचवू शकता.
पारदर्शक प्रक्रिया: लिलावाची प्रक्रिया ही पारदर्शक आणि सर्व इच्छुक खरेदीदारांसाठी खुली असते. लिलावाचे तपशील, अटी आणि शर्ती आणि बोली प्रक्रिया स्पष्टपणे मांडल्या जातात. जप्त केलेल्या मालमत्तेचे तपशील बँका वृत्तपत्रातून आणि त्यांच्या वेबसाईटवर जाहीर करतात.
गुंतवणुकीची चांगली संधी: रिअल इस्टेट पोर्टफोलिओ तयार करू पाहणाऱ्या खरेदीदारांसाठी लिलावात मालमत्ता खरेदी करणे ही गुंतवणूकीची चांगली संधी ठरू शकते. लिलावातील मालमत्ता अनेकदा त्यांच्या बाजार मूल्यापेक्षा कमी भावात विकली जाते, ज्यामुळे खरेदीदारांना त्या सवलतीत खरेदी करता येतात आणि भविष्यात नफ्याने विकता देखील येतात.
जलद प्रक्रिया: लिलाव प्रक्रिया ही जलद आणि कार्यक्षम असते. खरेदीदार लिलावात सहभागी होऊ शकतात आणि अल्प कालावधीतच मालमत्ता खरेदी करू शकतात. ज्या खरेदीदारांना मालमत्ता लवकर खरेदी करायची आहे आणि पारंपारिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या मालमत्ता व्यवहारांची लांबलचक प्रक्रिया टाळायची असेल त्यांच्यासाठी हे फायदेशीर ठरू शकते.
वित्तपुरवठा पर्याय: अनेक बँका आणि वित्तीय संस्था मालमत्ता लिलावात संपत्ती खरेदीसाठी वित्तपुरवठा उपलब्ध करून देण्याचा पर्याय देखील देतात. प्रॉपर्टी खरेदीदार लिलावातील मालमत्तेच्या खरेदीसाठी कर्ज घेऊ शकतात, ज्यामुळे प्रक्रिया अधिक परवडणारी होऊ शकते.
परंतु लिलावात मालमत्ता खरेदी करताना काही संभाव्य धोके देखील आहेत, त्याबद्दल देखील तुम्ही विचार करायला हवा. केवळ वृत्तपत्रात किंवा बँकेच्या वेबसाईटवर जाऊन मालमत्तेची माहिती घेऊ नका. प्रत्यक्ष मालमत्तेच्या जागेवर जाऊन त्याची पाहणी करा. जेणेकरून तुम्हाला प्रॉपर्टीबद्दल सविस्तर माहिती मिळेल.
खरेदीदारांना लिलावात प्रॉपर्टी खरेदीशी संबंधित अतिरिक्त खर्च करावे लागतो, जसे की कायदेशीर शुल्क, हस्तांतरण शुल्क आणि कर इत्यादी. या अतिरिक्त खर्चाचा देखील विचार आपण करायला हवा.
खरेदीदारांनी संभाव्य जोखमींबद्दल देखील जागरूक असले पाहिजे आणि खरेदी करण्यापूर्वी सर्व घटकांचा काळजीपूर्वक विचार केला पाहिजे. लिलावात भाग घेण्यापूर्वी रिअल इस्टेट व्यावसायिकांशी सल्लामसलत करणे कधीही फायद्याचे ठरू शकते.