जेव्हा तुम्ही सदनिका विकत घेण्याचा विचार करत असता तेव्हा तुमच्या पुढे अनेक पर्याय असतात. तुम्ही अनेक गृहप्रकल्पांना भेट देता किंवा ऑनलाइन माहिती मिळवता. यातील अनेक गृहप्रकल्प जवळजवळ पूर्ण होत आलेले असतील किंवा काही प्रकल्प नुकतेच पायाभरणीच्या टप्प्यात असतील. आता जर तुम्ही किमतीचा विचार केला तर बांधकाम पूर्ण झालेल्या गृह प्रकल्पात तुम्ही सदनिका बुक करत असाल तर तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागतील. तर नुकतेच बांधकाम सुरू झालेल्या गृह प्रकल्पामध्ये तुलनेने तुम्हाला सदनिका स्वस्तात मिळेल. मात्र, कमी किमतीत सदनिका मिळत असली तरी तुम्हाला अनेक गोष्टींचा विचार करावा लागेल. अन्यथा फक्त किंमत कमी म्हणून सदनिका बुक करायची चूक तुमच्याकडून होऊ शकते. त्यासाठी खालील बाबी ध्यानात घ्या.
Table of contents [Show]
किंमतीचा विचार करा
रेडी टू पझेशन म्हणजेच बांधून पूर्ण झालेल्या प्रकल्पामधील प्रॉपर्टीची किंमत काम सुरू असेलल्या प्रकल्पापेक्षा 10 ते 30 टक्क्यांनी महाग असते. दोन्हींमध्ये सुविधा, एकूण फ्लॅट किंवा लोकेशनही सारखेच असले तरी हा फरक दिसतो.
कालावधी किती?
बांधून पूर्ण झालेल्या अपार्टमेंटमध्ये फ्लॅटचा ताबा तुम्हाला विना विलंब लगेच मिळतो. मात्र, बांधकाम सुरू असेलल्या प्रकल्पामध्ये ताबा मिळण्यास तुम्हाला जास्त विलंब होऊ शकतो. अनेक वेळा ठरवलेल्या तारखेला तुम्हाला ताबा मिळत नाही. त्यामागे अनेक कारणे असतात. रिअल इस्टेट रेग्युलेशन अॅक्ट (RERA) कायदा आल्यानंतर यात सुधारणा झाली. मात्र, अजूनही सर्वसामान्यपणे प्रकल्प निश्चित वेळत पूर्ण होण्यास विलंब होतो. हा धोका तुम्हाला घ्यायचा नसेल तर तुम्ही बांधकाम पूर्ण झालेल्या इमारतीतच प्रॉपर्टी विकत घ्यावी.
बांधकाम पूर्ण झालेल्या प्रकल्पामध्ये मिळणाऱ्या सुविधा जसे की, गार्डन, जीन, स्विमिंग पूल, घरातील कामात वापरलेल्या वस्तू, सुशोभीकरण हे तुम्ही पाहू शकता. त्यावरुन तुम्ही एकंदर प्रकल्पाची गुणवत्ता ठरवू शकता. मात्र, तुम्ही बांधकाम सुरू असेलल्या इमारतीमध्ये फ्लॅट बुक करत असाल तर तुम्हाला आश्वासन दिलेल्या सुविधांच्या बाबतीत बांधकाम पूर्ण झाल्यानंतर तडजोड झाल्याचे दिसू शकते. फक्त नावापुरत्याच सुविधा पाहायला मिळतील. अशा प्रकारे तुमची फसवणूक होऊ शकते. त्यामुळे अधिकृत आणि योग्य विकासकाकडेच फ्लॅट बुक करावा.
भाडे द्यायचे की हप्ता भरायचा?
बांधकाम पूर्ण झालेल्या इमारतीत तुम्ही राहायला जात असाल तर तुम्हाला दुसरीकडे भाडे भरुन राहण्याची गरज नाही. मात्र, तयार घर तुम्हाला महाग मिळेल. उलट जर बांधकाम सुरू असेलल्या प्रकल्पामध्ये तुम्ही फ्लॅट बुक केला असेल तर तुम्हाला प्रकल्प पूर्ण होईपर्यंत भाडे देऊन रहावे लागेल. काही प्रकल्प तीन चार वर्षांपेक्षाही जास्त काळ चालतात. त्यामुळे तुमची आर्थिक क्षमता पाहून निर्णय घ्या. कारण बांधकामाच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला पैसेही भरावे लागतील आणि दुसरीकडे राहण्यासाठी भाडेही भरावे लागेल.
प्रकल्प किती जुना ते तपासा
बांधकाम सुरू असेलली इमारत तर तुमच्या डोळ्यासमोर पूर्ण होईल आणि तुम्ही राहण्यास जाल. मात्र, जर रेडी टू पझेशन घर तुम्ही विकत घेत असाल तर किती दिवसांपूर्वी प्रकल्प बांधून पूर्ण झाला आहे. बऱ्याच वेळा असे होऊ शकते की, प्रकल्प आधीच पूर्ण झाला आहे. मात्र, विविध परवानग्या मिळवण्यात उशीर झाल्याने फ्लॅची विक्री थांबली आहे. अशा वेळी इमारत आणि फ्लॅटची कंडिशन कशी आहे हे तपासून पाहा.
करातून सुटका?
तुम्ही जर गृहकर्ज घेतले असेल तर तुम्हाला करातून सुटका मिळते. मात्र, घराचा ताबा मिळाल्यावरच ही रक्कम क्लेम करता येते. अन्यथा नाही. कायद्यातील 80C अंतर्गत दीड लाखांची करातून सूट मिळते तर सेक्शन 24B नुसार दोन लाखांची करातून सुटका मिळते. रेडी टू पझेशन घर घेत असाल तर ही सूट तुम्हाला लगेच मिळून जाईल. मात्र, बांधकाम सुरू असलेल्या प्रकल्पात तुम्ही घर बुक करत असाल तर ताबा मिळाल्यावरच तुम्हाला करातून सुटका मिळेल.