पूर्व द्रुतगती महामार्गाच्या (Eastern Express Highway) देखभालीचं काम मुंबई महानगरपालिकेनं (Mumbai Municipal Corporation) MMRDA कडून आपल्या ताब्यात घेतलं. आणि त्यानंतर मुलुंड (Mulund) ते ऐरोली (Airoli) पट्ट्यात पालिकेनं काही महत्त्वाची कामं हाती घेतली आहेत. त्यामुळे या भागात पावसाचं पाणी साठणं (Water Logging), वाहतूक कोंडी (Traffic Jam) आणि रस्त्याच्या भोवती थोडी हिरवळ आणि स्वच्छता अशी कामं हाती घेण्यात आली आहेत.
खासकरून पाण्याचा निचरा करणारी कामं येणाऱ्या दिवसांमध्ये महत्त्वाची ठरणार आहेत. कारण, पावसाचं पाणी तुंबण्याचे प्रकार इथं नियमित होत होते. महानगर पालिकेच्या टी वॉर्डाचे सहाय्यक पालिकाआयुक्त चक्रपाणी अल्ले यांनी त्यासाठी पालिकेनं केलेल्या कामांची माहिती हिंदुस्तान टाईम्सला दिली आहे.
‘नाहूर, ऐरोली ते मुलुंड टोलनाका या परिसरात स्टॉर्म वॉटर ड्रेन्स (SWD) म्हणजे साचलेलं पाणी वाहून नेणारी भुयारं चांगल्या अवस्थेत नव्हती. त्यातली अनेक तर तुंबली आहेत. त्यांची स्वच्छता आणि देखभाल सगळ्यात आधी करण्यात येत आहे,’ असं अल्ले यांनी म्हटलं आहे. त्यामुळे ऐरोली पुलाच्या खाली ते मुलुंड टोल नाक्यापर्यंतचा परिसर आता स्वच्छ झाला आहे.
नाहूर सोडल्यावर येणारा मोरया तलाव परिसरही स्वच्छ करण्यात आला आहे. या भागात स्टॉर्म वॉटर ड्रेनेजची सोयच नव्हती. आणि नेमकं इथंच पाणी तुंबून वाहतूक कोंडीही होत होती. आता इथं ड्रेनेजच्या सोय पूर्ण झाली आहे. आणि या भागातला रहिवासी भाग मुख्य महामार्गापासून तोडण्यात आला आहे. त्यामुळे गर्दी कमी होईल असा पालिकेला विश्वास आहे.
आणखी एक महत्त्वाचं काम महानगरपालिकेला या भागात करायचं आहे ते म्हणजे अनधिकृतपणे उभी राहिलेली गॅरेज तोडण्याचं. कारण, या रहिवासी भागात महामार्गाला जोडून अनेक बैठी गॅरेज उभी राहिली आहेत. त्यामुळे अर्थातच, वाहनांचा वेग कमी होतो. आणि त्यांची कोंडी होते.
‘अशा सगळ्या बांधकामांची यादी महापालिकेकडे तयार आहेत. आणि त्यांना नोटीस बजावून मग ती तोडण्यात येतील,’ असं अल्ले यांनी सांगितलं आहे.
तर रस्त्याच्या सुशोभीकरणासाठी पदपथ दुरुस्त करण्यात येत आहेत. आणि दोन किलोमीटरच्या पट्टात 3 मीटर रुंदीत अनेक वृक्षही सध्या लावण्यात येत आहेत. तसंच रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पथदिवेही लावण्यात येत आहेत. रस्त्याच्या दुतर्फा भिंतींवर चित्र रंगवण्याचं कामही करण्यात येत आहे.
पूर्व द्रुतगती मार्गाप्रमाणेच पश्चिम द्रुतगती मार्गावरही दहिसर ते वांद्रे हा पट्टा मुंबई महानगरपालिकेनं देशभालीसाठी आपल्या ताब्यात घेतला आहे.