नवीन आर्थिक वर्ष 1 एप्रिल, 2023 पासून सुरू होत आहे. तर 2022-23 हे आर्थिक वर्ष संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे तुम्ही जर टॅक्सशी संबंधित पेंडिंग राहिलेली कामे पूर्ण केली नसतील तर ती लवकरात लवकर करून घ्या. नाहीतर तुम्हाला यासाठी दंड भरावा लागेल. आज आपण अशाच 5 महत्त्वाच्या कामांबद्दल जाणून घेणार आहोत. जी तुम्ही 31 मार्चपूर्वी पूर्ण करणे आवश्यक आहे.
Table of contents [Show]
पॅनकार्ड-आधारकार्ड लिंक
इन्कम टॅक्स विभाग आणि सरकारकडून सातत्याने आधारकार्ड आणि पॅनकार्ड लिंक करण्याबाबत सांगितले जात आहे. तरीही देशातील अजून 20 टक्के पॅनकार्ड धारकांनी पॅनकार्ड-आधारकार्ड लिंक केलेले नाही. सरकारने याची वेळोवेळी मुदत वाढवून दिली आहे. 1 एप्रिल 2022 पासून आधारला पॅनकार्ड जोडण्यासाठी 500 रुपये दंड भरावा लागत होता. तो 1 जुलै 2022 पासून 1,000 रुपये केला असून 31 मार्च, 2023 पर्यंत तो लागू असणार आहे. त्यानंतर मात्र म्हणजे 1 एप्रिलपासून अशा पॅनकार्डधारकांचे पॅनकार्ड रद्द केले जाणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
31 मार्चपूर्वी संपूण प्रीमिअम भरा आणि टॅक्स सवलत मिळवा
तुम्ही इन्शुरन्स पॉलिसी काढली असेल आणि त्याचा वार्षिक प्रीमिअम हा 5 लाखांपेक्षा जास्त आहे. अशी पॉलिसी मॅच्युअर्ड झाल्यानंतर त्यावर 1 एप्रिलपासून टॅक्स सवलत मिळणार नाही. केंद्राच्या बजेटमध्ये अर्थमंत्र्यांनी जाहिर केल्याप्रमाणे, इन्शुरन्सचा प्रीमिअम वर्षाला 5 लाखापेक्षा अधिक असेल तर त्यावर आगामी आर्थिक वर्षापासून टॅक्स सवलत मिळणार नाही. त्यामुळे तुमच्या इन्शुरन्स पॉलिसीचा प्रीमिअम हा 5 लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्ही 31 मार्चपूर्वी सर्व प्रीमिअम भरून टॅक्स सवलतीचा लाभ घ्या.
अपडेटेड आयटीआर फाईल करा
असेसमेंट वर्ष 2020-21चे अपडेटेड आयटीआर (Updated ITR) फाईल करण्याची अंतिम तारीख 31 मार्च, 2023 आहे. ही तारीख जर तुम्ही चुकवली तर तुम्हाला अधिकचा टॅक्स भरावा लागू शकतो. असेसमेंट वर्ष 2021-22 आणि 2022-23 चे अपडेटेड रिटर्न फाईल 31 मार्चपर्यंतच भरता येणार आहे.
टॅक्स सेव्हिंग गुंतवणूक 31 मार्चपर्यंत पूर्ण करा
आर्थिक वर्ष 2022-23 या आर्थिक वर्षात करावयाची टॅक्स सेव्हिंग गुंतवणूक ही 31 मार्च, 2023 पर्यंत करणे अपेक्षित आहे. 31 मार्चपर्यंत तुम्ही इन्कम टॅक्स कायद्यातील सेक्शन 80C आणि 80D अंतर्गत 1.50 लाखापर्यंत कर सवलत मिळवू शकता.
ॲडव्हान्स टॅक्स भरा
ज्यांचे वार्षिक उत्पन्न कर सवलतीचे सर्व पर्याय वापरूनही ते टॅक्स भरण्यास पात्र ठरतात. अशा करदात्यांना सरकारकडून टप्प्याटप्प्याने ॲडव्हान्स टॅक्स भरण्याची सुविधा मिळते. 2022-23 या आर्थिक वर्षासाठी 100 टक्के टॅक्स भरण्याची शेवटची तारीख 15 मार्च होती. पण ज्यांनी अद्याप तो भरलेला नाही, त्यांनी 31 मार्चपर्यंत तो भरणे अपेक्षित आहे.
डिमॅट व म्युच्युअल फंडमध्ये नॉमिनी जोडा
तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असाल किंवा तुमचे डिमॅट खाते असेल, तर तुम्ही तुमच्या खात्याला नॉमिनी जोडणे बंधनकारक आहे. यासाठीची अंतिम तारीख 31 मार्च, 2023 आहे. यानंतर तुमचे डिमॅट खाते फ्रीज केले जाईल. तसेच तुम्हा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केली असेल आणि त्यात नॉमिनी नाव दिले नसेल तर ते ही तुम्हाला 31 मार्चपर्यंत द्यावे लागणार आहे.