स्मार्टफोनप्रमाणेच आता क्रेडिट कार्डदेखील अनेकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. क्रेडिट कार्डचा वापर काळजीपूर्वक केल्यास त्याचे अनेक फायदे होतात, मात्र त्याचा चुकीचा वापर तुम्हाला थेट आयकर विभागाच्या कचाट्यात पकडून देऊ शकतो.
विशेषतः क्रेडिट कार्डद्वारे घराचे भाडे भरणाऱ्या लोकांसाठी आता धोक्याची घंटा वाजली आहे. 'कॅशबॅक' आणि 'रिवॉर्ड पॉइंट्स'च्या मोहात अनेकजण असे काही व्यवहार करत आहेत, ज्यामुळे त्यांना टॅक्स नोटीस येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
काय आहे 'मॅन्युफॅक्चर्ड स्पेंडिंग'चा प्रकार?
आयकर विभागाच्या निदर्शनास आले आहे की, अनेक युजर्स प्रत्यक्षात कोणतेही भाडे न भरता केवळ पैसे फिरवण्यासाठी क्रेडिट कार्डचा वापर करत आहेत. हे लोक घरभाडे भरण्याच्या बहाण्याने आपल्या मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर करतात आणि नंतर तेच पैसे स्वतःच्या बँक खात्यात परत घेतात.
आयकर विभागाच्या भाषेत याला 'बनावटी खर्च' किंवा 'मॅन्युफॅक्चर्ड स्पेंडिंग' असे म्हटले जाते. केवळ रिवॉर्ड पॉइंट्स मिळवण्यासाठी केलेले हे व्यवहार आता महागात पडू शकतात.
HRA क्लेम होऊ शकतो रद्द
जर तुम्ही नोकरी करत असाल आणि घराचे भाडे भरत असल्याचे दाखवून कर सवलत (HRA) मिळवत असाल, तर तुमची अडचण अधिक वाढू शकते. आयकर विभाग आता एआय (AI) आणि डेटा अॅनालिटिक्सच्या मदतीने अशा व्यवहारांवर बारीक लक्ष ठेवून आहे.
डेटा मिसमॅच: जर तुम्ही भाडे भरल्याचा दावा केला, पण ज्याच्या खात्यावर पैसे पाठवले आहेत (घरमालक), त्याने ते उत्पन्न म्हणून दाखवले नाही, तर तुमचा 'एचआरए' क्लेम रद्द केला जाऊ शकतो.
दंड: खोटा दावा केल्याचे सिद्ध झाल्यास केवळ क्लेम रद्द होत नाही, तर तुम्हाला मोठा दंड देखील भरावा लागू शकतो.
आयकर विभागाची करडी नजर
आजकल प्राप्तिकर विभागाकडे एआय आधारित प्रोफाइलिंग यंत्रणा आहे. तुमच्या 'एआयएस' (AIS) आणि 'एसएफटी' (SFT) डेटावरून तुमच्या उत्पन्नाची आणि खर्चाची तुलना केली जाते. जर तुमचे उत्पन्न कमी असेल आणि क्रेडिट कार्डवरून होणारे खर्च जास्त असतील, तर यंत्रणा त्वरित अलर्ट जारी करते. रिवॉर्ड्सच्या नादात केलेले हे बनावट व्यवहार आर्थिक गुन्ह्याच्या कक्षेत येऊ शकतात.