भारतात कर नियोजन करताना केवळ गुंतवणूक महत्त्वाची नसते, तर कोणते उत्पन्न करमुक्त आहे याची माहिती असणेही तितकेच गरजेचे असते. प्राप्तिकर कायद्यातील विविध कलमांनुसार अशा ७ प्रमुख गोष्टी आहेत, ज्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर तुम्हाला कोणताही कर द्यावा लागत नाही.
Table of contents [Show]
1. सुकन्या समृद्धी योजना (SSY)
मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी असलेल्या या योजनेत सध्या 8.2% इतका सर्वाधिक व्याजदर मिळत आहे. 'EEE' श्रेणीमध्ये येत असल्याने यातील गुंतवणूक, मिळणारे व्याज आणि मॅच्युरिटीनंतर मिळणारे सर्व पैसे पूर्णपणे करमुक्त असतात. १० वर्षांखालील मुलींच्या नावे हे खाते उघडता येते.
2. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF)
सुरक्षित गुंतवणुकीसाठी पीपीएफ हा भारतीयांचा आवडता पर्याय आहे. सध्या यावर 7.1% व्याज मिळते. वार्षिक 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर टॅक्स सवलत मिळतेच, पण त्यासोबत मिळणारे वार्षिक व्याज आणि 15 वर्षांनंतर मिळणारी रक्कमही टॅक्स-फ्री असते.
3. ग्रॅच्युइटी (Gratuity)
नोकरी सोडताना किंवा निवृत्तीच्या वेळी मिळणारी ग्रॅच्युइटी ही एक मोठी रक्कम असते. खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी 20 लाख रुपयांपर्यंतची ग्रॅच्युइटी करमुक्त आहे, तर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही पूर्ण रक्कम करमुक्त असते. मात्र, यासाठी किमान 5 वर्षे सेवा पूर्ण करणे आवश्यक आहे.
4. आयुर्विमा मॅच्युरिटी (Life Insurance)
विमा पॉलिसीची मुदत संपल्यावर मिळणारे पैसे कलम 10(10D) नुसार करमुक्त असतात. मात्र, 1 एप्रिल 2023 नंतर घेतलेल्या पॉलिसींसाठी वार्षिक प्रीमियम 5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावा, अशी अट घालण्यात आली आहे.
5. शेतीतून मिळणारे उत्पन्न (Agriculture Income)
भारतात शेतीतून मिळणारे उत्पन्न कलम 10(1) नुसार पूर्णपणे करमुक्त आहे. यामध्ये पिकांची विक्री, शेतजमिनीचे भाडे आणि ग्रामीण शेतजमीन विकून मिळणारा नफा यांचा समावेश होतो.
6. शैक्षणिक शिष्यवृत्ती (Scholarship)
विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मिळणारी कोणतीही शिष्यवृत्ती टॅक्स-फ्री असते. मग ती सरकारकडून मिळालेली असो किंवा एखाद्या खासगी संस्थेकडून, यावर प्राप्तिकर विभाग कोणताही कर आकारत नाही.
7. भागीदारी संस्थेतील नफा (Partnership Profits)
एखाद्या भागीदारी व्यवसायातून मिळणारा नफ्याचा हिस्सा भागीदारासाठी करमुक्त असतो. कारण त्या नफ्यावर संबंधित कंपनीने आधीच टॅक्स भरलेला असतो. यामुळे एकाच उत्पन्नावर दोनदा टॅक्स लागत नाही.