आजच्या महागाईच्या काळात प्रत्येक वस्तूच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. मात्र, अनेकदा बाहेरील महागाईपेक्षा आपल्या स्वतःच्या काही सवयी आपल्याला हळूहळू गरिबीकडे ढकलत असतात. जर आपण दररोज केवळ 100 रुपयांची बचत केली, तर वर्षाच्या शेवटी मोठी रक्कम आपल्या हातात असू शकते. आपण अनेकदा लहान खर्च समजत ज्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो, तेच खर्च प्रत्यक्षात आपल्या आर्थिक नियोजनाचा पाया ढासळतात.
तुमचा खिसा रिकामा करणाऱ्या काही प्रमुख सवयी खालीलप्रमाणे आहेत:
Table of contents [Show]
१. उपयोगात नसलेले ओटीटी सब्सक्रिप्शन
अनेकांनी नेटफ्लिक्स, प्राईम व्हिडिओ, हॉटस्टार किंवा स्पॉटिफाई सारख्या ॲप्सचे सब्सक्रिप्शन घेतलेले असते. मात्र, कामाच्या व्यापात आपण महिनाभरातून केवळ १-२ वेळाच हे ॲप्स वापरतो. या ॲप्समध्ये ऑटो-डेबिट सुविधा सुरू असल्याने दरवर्षी साधारण ५,००० ते १५,००० रुपये विनाकारण खात्यातून वजा होतात.
२. बाहेरील जेवणाची चटक
ऑफिसचे लंच असो किंवा वीकेंडचे डिनर, झोमॅटो-स्विगीवरून जेवण मागवणे ही आता सवय बनली आहे. एकदा जेवण मागवल्यावर टॅक्स आणि डिलिव्हरी चार्जसह बिल ४०० रुपयांच्या घरात जाते. जर तुम्ही आठवड्यातून फक्त ३ वेळा बाहेरून जेवण मागवले, तर महिन्याला ५,००० आणि वर्षाला तब्बल ६०,००० रुपये केवळ जिभेचे चोचले पुरवण्यासाठी खर्च होतात.
३. क्रेडिट कार्डचा सापळा
क्रेडिट कार्ड वापरणे सोपे वाटत असले तरी त्यातील छुपे चार्जेस धोकादायक असतात. वेळेवर बिल न भरल्यास ५०० ते १,००० रुपयांचा दंड आणि दरमहा ३ टक्के व्याज लागते, जे वार्षिक ३६ टक्क्यांपर्यंत जाते. या सर्व दंड आणि व्याजाचा हिशोब केल्यास वर्षाला १०,००० रुपयांहून अधिक फटका बसू शकतो.
४. सेलमध्ये अनावश्यक खरेदी
'५०-७० टक्के सवलत' असे फलक पाहिले की लोक गरज नसतानाही वस्तू खरेदी करतात. केवळ स्वस्त मिळते म्हणून शॉपिंग करण्याच्या सवयीमुळे वर्षाकाठी २४,००० ते ३०,००० रुपये खर्च होतात, ज्या वस्तूंचा पुढे कधीच वापर होत नाही.