कोव्हिड 19 (Covid 19) चे नियम शिथील झाल्यानंतर दोन महत्त्वाचे बदल हॉटेल आणि रेस्टॉरंटसाठी लागू झाले. एकतर एकावेळी पन्नास लोकांपेक्षा जास्त लोकांना जमा करणं शक्य झालं. आणि दुसरं म्हणजे रात्री दहा वाजेपर्यंत आपलं हॉटेल किंवा रेस्टॉरंट खुलं ठेवण्याची मुभा मिळाली. या सवलतींबरोबरच दिवाळीनंतर सणांचा हंगाम देशात सुरू झाला. आणि परिणामी हॉटेलमध्ये डाईन-इनचा (Dine-In) ट्रेंड पुन्हा सुरू झालाय.
त्यामुळे महानगरांमध्ये पिझ्झा (Pizza). बर्गर (Berger), चायनीज फूड (Chinese Food), यांच्या मोठ्या ब्रँडनी आपली आऊटलेट्स (Food Outlets) वाढवायलाही सुुरवात केली आहे. डाईन-इनसाठी येणाऱ्या ग्राहकांमध्ये किमान 60% वाढ झाल्याचं इकॉनॉमिक टाईम्स या वृत्तपत्राने एका बातमीत म्हटलं आहे.
शनिवार रात्र आणि रविवार दुपार तसंच संध्याकाळच्या आगाऊ बुकिंगमध्ये (Advanced Booking) तर 70%ची वाढ झाली आहे.
‘हॉटेलमध्ये अनोळखी लोक आजूबाजूला असताना जेवण्यात कधी लोकांना असुरक्षितता वाटली नाही. पण, कोव्हिडमुळे एकमेकांबद्दल ती असुरक्षितता आली. आजारी पडण्याची भीती लोकांमध्ये निर्माण झाली. गर्दीची जागा टाळण्याकडे लोकांचा कल वाढला. पण, अशी दोन वर्षं काढल्यानंतर आता पुन्हा हॉटेलमध्ये गर्दी दिसू लागली आहे,’ असं स्नेहा सैकिया या शेफनी इकनॉमिक टाईम्सशी बोलताना सांगितलं.
रेस्टॉरंटमध्ये येऊन जेवणारे लोक असतील तर त्यामुळे सेवा चांगली देता येते. आणि धंदाही चांगला होतो असं हॉटेल व्यावसायिकांचं म्हणणं आहे. त्यामुळे डाईन-इन पूर्ववत झाल्याबद्दल त्यांनी आनंदच व्यक्त केला आहे.
बर्गर किंग (Berger King), केएफसी (KFC), डॉमिनोज् (Dominos)या कंपन्यांनी लोकांची नियमित वर्दळ सुरू झाल्यांचं सांगितलंय. नुकता संपलेला फिफा फुटबॉल वर्ल्ड कप, आगामी न्यू ईयर यामुळे डाईन-इन साठी गर्दी आणखी वाढेल असाच हॉटेल व्यावसायिकांचा अंदाज आहे.
देशात रेस्टॉरंट उद्योग हा बहुतांश असंघटित आहे. पण, वर उल्लेख केलेल्या काही चेन ऑपरेटर्सना डाईन-इन जास्त फायदा देणारा आहे.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            