दररोज अनेक नागरिक रेल्वेने मुंबईत येत असतात. अशा वेळी आलेल्या प्रवाशांच्या मनात पहिला प्रश्न असतो राहायचं कुठे. मुंबईत जर तुमचा ओळखीचे कोणी असेल तर ठीक. पण कोणी ओळखीचे नसेल तर थांबायचे कुठे असा विचार येतो. हा प्रश्न सोडविण्यासाठी रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) रेल्वे स्थानकात एक पॉड हॉटेल उभारलं जातंय. याचं काम जवळपास पूर्ण झालं असून जून महिन्याच्या अखेरीस ते प्रवाशांसाठी खुलं करण्यात येणार आहे.
CSMT स्थानकात कुठे असेल हे पॉड हॉटेल
सीएसएमटी (CSMT) रेल्वे स्टेशनवर सध्या जी वेटिंग रूम आहे, तिच्या शेजारीच हे हॉटेल उभं राहतंय. यापूर्वी पश्चिम रेल्वे मार्गावर असणाऱ्या मुंबई सेंट्रल या रेल्वे स्थानकावर ही सोय करण्यात आली होती. 17 नोव्हेंबर 2021 या दिवशी मुंबई सेंट्रल स्टेशनवरील पॉड हॉटेल नागरिकांसाठी खुलं करण्यात आलं होतं. त्यानंतर आता मुंबईतील रेल्वे स्टेशनवरील हे दुसरं पॉड हॉटेल सुरू होत आहे.
पॉड हॉटेलमधील सोयीसुविधा
सीएसएमटी (CSMT) स्टेशनवर तयार होणाऱ्या या हॉटेलमध्ये एकाच वेळी 50 लोकांच्या राहण्याची सोय होऊ शकते. या हॉटेलमध्ये फॅमिलीसाठी 4 पॉड तयार करण्यात आले आहेत, तर 30 सिंगल पॉड आहेत. पुरुष आणि महिलांसाठी वेगवेगळ्या स्वच्छतागृहांची सोय करण्यात आली आहे. वेगवेगळे टॉयलेट्स, अंघोळीसाठी बाथरूम्स आणि साहित्य ठेवण्यासाठीही वेगळ्या खोल्या तयार करण्यात आल्या आहेत.
पॉड हॉटेलचा दर काय असेल?
सीएसएमट रेल्वे स्थानकावरील पॉडमध्ये 12 तास थांबण्यासाठी 500 रूपये द्यावे लागणार आहेत. हे दर मुंबई सेंट्रल येथील पॉडपेक्षा कमी आहेत. मध्य रेल्वेला या सेवेतून 55.68 लाख रुपयांचा महसूल मिळेल, अशी माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी माध्यमांना दिली. या हॉटेलचं काम जवळपास पूर्ण झालं आहे आणि या महिन्याच्या अखेरीस प्रवाशांसाठी ते खुलं केलं जाण्याची शक्यता आहे. शहरात हॉटेलसाठी जे दर आकारले जातात, त्या तुलनेत पॉड हॉटेलचे दर खूपच कमी असतील, अशी माहिती त्यांनी दिली. या हॉटेलमुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा या दोन्हीची बचत होणार आहे. मुंबई सेंट्रल येथे सुरु असलेले पॉड हॉटेलमध्ये 12 ते 24 तासांपर्यंत थांबण्याचे भाडं 999 रूपयांपासून ते 1999 रूपयांपर्यंत आहे.
पॉड हॉटेल म्हणजे काय?
एक बेड बसेल, एवढ्या आकाराच्या छोट्या छोट्या खोल्यांनी पॉड हॉटेल तयार होतं. या हॉटेलला ‘कॅप्सूल हॉटेल’ असंही म्हटलं जातं. काहीजण याला ‘सिंगल प्रायव्हेट रूम’ असंही म्हणतात. नागरिकांना या हॉटेलमध्ये त्यांच्या गरजेच्या मूलभूत सुविधा पुरवल्या जातात. शौचालय, स्नानगृह आणि आराम करण्यासाठी बेड अशा गोष्टी पॉड हॉटेलमध्ये असतात.
मुंबई शहरातील हॉटेल व्यवस्था महाग असल्याने मुंबईत फिरायला येणाऱ्या किंवा लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमधून प्रवास करून आलेल्या किंवा जाणाऱ्या प्रवाशांसाठी पॉड हॉटेलचा पर्याय किफायतशीर ठरू शकतो.