2023 सालच्या पहिल्या सहामाहीत केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्याचा (Dearness allowance) दर नेमका किती असेल हे या महिन्यात ठरू शकेल. 31 जानेवारी 2023 ला AICPI इन्डेक्ससाठीचा डेटा येईल. आणि त्यातून स्पष्ट होईल की, महागाई भत्ता नेमका किती असेल. AICPI इन्डेक्सची आकडेवारी प्रत्येक महिन्यासाठी काढण्यात येते. आणि ती पुढच्या महिन्याच्या शेवटच्या तारखेला प्रसिद्ध करण्यात येते. डिसेंबर 2022 साठीचे आकडे जानेवारीत आले की, 2022 सालची सगळी आकडेवारी सरकारकडे तयार असेल. आणि त्यानंतर ठरेल 2023 साठीचा महागाई भत्ता .
महागाई भत्ता नेमका किती असेल?
हा भत्ता AICPI वरून काढला जातो हे आपण बघितला. हा आकडा म्हणजे ऑल इंडिया कन्झ्युमर प्राईस इन्डेक्स. देशात वस्तू आणि सेवांच्या किमतीत किती वाढ झालीय हे पाहून श्रम मंत्रालय महागाई भत्ता ठरवत असतं.
डिसेंबर महिन्याचा महागाई दर जानेवारीच्या 31 तारखेला आला की श्रम मंत्रालयाकडे 2022 वर्षासाठीचा एकूण डेटा तयार असेल. आणि त्याचा आढावा घेऊन अर्थमंत्रालयाच्या सल्ल्याने मार्च 2023 मध्ये महागाई भत्त्याचा निश्चित आकडा काढला जाईल. डिसेंबर महिन्यात AICPI निर्देशांक 132.5 इतका होता. याचाच अर्थ महागाई भत्ता 3% पर्यंत वाढवला जाऊ शकतो.
डिसेंबर महिन्यात महागाई दर स्थिर राहिला असेल तर महागाई भत्ताही 3% इतकाच राहण्याचा अंदाज आहे. पण, डिसेंबरमध्ये महागाई वाढलेली असेल तर श्रम मंत्रालय यापेक्षा जास्त महागाई भत्त्याचा विचार करू शकतं. पण, सध्या तज्ज्ञांना ही शक्यता कमीच वाटते.
AICPI निर्देशांकाचा अंदाज आहे?
AICPI निर्देशांक हा CPI आकड्यांशी मिळताजुळताच असतो. CPI म्हणजे कन्झ्युमर प्राईस इंडेक्स. म्हणजेच काही ठरावीक वस्तू आणि सेवांमध्ये झालेल्या दरांतील बदलांची सरासरी. देशाचा CPI महागाई दर 12 जानेवारीला जाहीर झाला आहे. डिसेंबर महिन्यासाठी हा दर 5.72% इतका होता, जो नोव्हेंबरपेक्षा कमी आहे. तर किरकोळ महागाई दरही 5.88% इतका होता. कोव्हिड नंतर वाढलेला महागाई दर आता हळू हळू आटोक्यात येतोय. त्यामुळे डिसेंबर महिन्यात त्यामध्ये मोठी वाढ असेल अशी शक्यता नाही. त्यामुळे सध्या 3% महागाई भत्त्याचा अंदाज मांडण्यात आला आहे.
महागाई भत्त्याचं गणित काय आहे?
सध्या सातवा वेतन आयोग लागू होत आहे. जुलै 2022 मध्ये केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना 38% इतका महागाई भत्ता मिळालाय. आणि आयोगाच्या नियमानुसार, किमान सरकारी वेतन आहे 18,000 रुपये प्रति महिना. अपेक्षेप्रमाणे जानेवारी ते जून 2023 साठी महागाई भत्त्यात 3% वाढ झाली तर एकूण भत्ता होईल 41%. आणि 18,000 मासिक वेतन असलेल्या कर्मचाऱ्याला दर महिना 7,380 रुपये इतका महागाई भत्ता मिळेल. महागाई भत्त्यातला एकूण वाढ महिन्याला 540 रुपये इतकी असेल.