Reserve Bank of India: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) चे गव्हर्नर शक्तीकांत दास (Shaktikanta Das) यांनी क्रिप्टो चलनावर (Cryptocurrency) बंदी घालण्याचा त्यांचा विचार पुन्हा एकदा बोलून दाखवला आहे. क्रिप्टो चलन हे 'जुगाराशिवाय दुसरे काहीही नाही' आणि त्यांचे कथित मूल्य केवळ एक 'भ्रम' आहे असे देखील ते म्हणाले. आरबीआयने अलीकडेच ई-रुपी (E-Rupee) स्वरूपात स्वतःचे डिजिटल चलन (Digital Currency) सुरू केले आहे. दास यांनी एका कार्यक्रमात बोलताना क्रिप्टोवर अंकुश ठेवण्याच्या गरजेचा पुनरुच्चार केला.
क्रिप्टोमध्ये अंतर्निहित मूल्य नाही असे दास म्हणाले तसेच क्रिप्टो चलनाचे समर्थक याला मालमत्ता किंवा आर्थिक उत्पादन म्हणतात, परंतु त्यात कोणतेही तथ्य नाही असेही ते म्हणाले. याचे स्पष्टीकरण देताना त्यांनी 'ट्यूलिप' फुलाचे उदाहरण दिले. गेल्या शतकाच्या सुरुवातीला ट्युलिप फुलाची मागणी खूप वाढली होती आणि त्याची किंमत गगनाला भिडली होती. लोकांना कोणत्याही किंमतीत ट्यूलिप्स मिळवायचे होते. व्यवहारात त्याचा तितकासा उपयोग मात्र नव्हता. क्रिप्टोचे देखील असेच चित्र आहे असे दास म्हणाले. क्रिप्टोच्या बाजारमूल्यात झालेली वाढ हा केवळ एक भ्रम असून अगदी स्पष्टपणे सांगायचे तर हा जुगार आहे. “आम्ही आमच्या देशात जुगार खेळण्यास परवानगी देणार नाही, आणि जर तुम्हाला जुगार खेळण्याची परवानगी हवी असेल, तर त्याला जुगारच समजा आणि जुगाराचे नियम अगोदर निर्धारित करा,पण क्रिप्टो हे आर्थिक उत्पादन नाही.”' अशा शब्दांत त्यांनी क्रिप्टो चालनावर भाष्य केले.