Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Bigbasket Sale : भारतात ‘या’ भाजीला होती वर्षभरात सर्वाधिक मागणी  

Bigbasket

Bigbasket Sale : टाटा समुहाचं ऑनलाईन किराणा मालाचं दुकान बिग बास्केटनं 2022 वर्षी त्यांच्या अ‍ॅपवर सगळ्यात जास्त मागणी कुठल्या भाजी आणि वस्तूला होती हे जाहीर केलंय. आणि या यादीत ‘या’ भाजीने कांदा आणि बटाट्यालाही मागे टाकलंय.

बिगबास्केट (Bigbasket) हे नाव आता घरा घरात पोहोचलेलं आहे. भाज्या तसंच इतर गृहोपयोगी वस्तू ऑनलाईन (Online Grocery Shop) अ‍ॅपवर मागवायच्या आणि त्या तुम्हाला घरपोच मिळण्याची सोय बिगबास्केटमुळे भारतात उपलब्ध झाली. आणि पुढे स्विगी इन्स्टा (Swiggy Instamart), अ‍ॅमेझॉन ग्रोसरी (Amazon Grocery) अशा सेवाही सुरू झाल्या.   

बिगबास्केटनं 2022 या वर्षी त्यांच्या अ‍ॅपवर सगळ्यात जास्त मागणी कुठल्या भाजी आणि वस्तूला होती तो डेटा आता उघड केलाय. यावर्षी 55 भारतीय शहरांमध्ये कंपनीने सेवा पुरवली. आणि तब्बल 16 कोटी रुपयांचा माल घरोघरी पोहोचवला. पण, बिगबास्केटवर गेल्यावर्षी सगळ्यात जास्त कुठल्या भाजीला मागणी होती तर ती टोमॅटोला या फळभाजीला . नेहमी कांदा किंवा बटाटा यांची मागणी जास्त असते. पण, यावर्षी लोकांचा कल थोडा बदललेला दिसला.  

टोमॅटोचे दर बाजाराच्या तुलनेत बिगबास्केटवर कमी असल्यामुळे हा फरक पडला असावा असंही अहवालात म्हटलं आहे. तर टोमॅटोच्या मागोमाग कुठल्या वस्तूची विक्री झाली ते पाहणंही रोचक आहे. कोथिंबीर. आणि इथेही किंमत हा भाग महत्त्वाचा ठरला. बिगबास्केटने अनेकदा आपल्या ऑफरमध्ये 100 ग्रॅम कोथिंबिरीची जुडी 2 रुपयांना देऊ केली. आणि त्यामुळे वर्षभरात तब्बल 400 किलो कोथिंबिरीची विक्री बिगबास्केटवर झाली.     

बिगबास्केटवर गेल्यावर्षी 75 कोटी उत्पादनांची विक्री झाली. आणि यातल्या बहुतेक ऑर्डर कर्नाटक राज्यातून आल्या. यातही बंगळुरू आघाडीवर होतं. आणखी एक मुद्दा या अहवालात मांडण्यात आलाय. तो म्हणजे बिगबास्केटच्या माध्यमातून लोकांना एकत्रितपणे 1,515 कोटी रुपयांची सवलत मिळाली. म्हणजे लोकांची तेवढी बचत झाली.   

याच कारणामुळे लोकांचा किराणा मालासाठीही ऑनलाईन प्लॅटफॉर्मकडे ओढा वाढलेला दिसतो. ब्लूमबर्ग या जागतिक कंपनीने अलीकडेच बिगबास्केटच्या बिझिनेस मॉडेलबद्दल सकारात्मक बातमी दिली होती. आणि 2023 मध्ये कंपनी IPO बाजारात आणू शकते असं भाष्यही केलं होतं. सध्या ऑनलाईन किराणा दुकानांच्या क्षेत्रात बिग बास्केट सगळ्यात मोठी भारतीय कंपनी असून तिचं मूल्य 3.2 अब्ज अमेरिकन डॉलर इतकं आहे. आणि येत्या 3 वर्षांत कंपनीला 75 शहरांमध्ये आपल्या सेवेचा विस्तार करायचा आहे.