लिंबाच्या महागाईनंतर सध्या भाजी मंडईत टोमॅटो भाव खात आहेत. सध्या टोमॅटोची बाजारात आवक कमी असल्याने टोमॅटोच्या भावाने शंभरी पार केली आहे. मुंबई आणि पुण्यामध्ये किरकोळ बाजारात टोमॅटो 120 रुपये किलोने विकला जात आहे. तसेच येत्या काही दिवसात भाजी मंडईत टोमॅटोचे भाव पुन्हा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. टोमॅटोचे नवीन पीक आल्यावर जुलैमध्ये काही प्रमाणात टोमॅटोचा भाव कमी होऊ शकेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
टोमॅटोच्या दरवाढीचा गृहिणींवर परिणाम
सततच्या वाढणाऱ्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यात टोमॅटो महाग झाल्याने गृहिणींसाठी टोमॅटो आंबट झाले आहेत. किरकोळ बाजारात चांगल्या प्रतीचे टोमॅटो 100 ते 120 रुपये किलोने तर कमी प्रतीचे टोमॅटो 80-90 रुपये किलोने मिळत आहेत. त्यामुळे जेवणातून टोमॅटो गायब होण्याच्या तयारीत आहे. अशा सततच्या वाढणाऱ्या महागाईने गृहिणींना आपले बजेट वाढवावे लागत आहे. त्यातच बँकांच्या वाढत्या व्याजदराने बचत कुठे आणि खर्च कुठे करावा असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
टोमॅटोचे भाव का वाढले?
जास्त उष्णतेमुळे उत्तर प्रदेशातील टोमॅटो उत्पादक जिल्ह्यांमध्ये यंदा उत्पादन घटलं आहे. उत्पादन घटल्यामुळे बाजारपेठेत यंदा टोमॅटोची आवक कमी आहे. याचा परिणाम म्हणून टोमॅटोच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सध्या ज्या शेतकऱ्यांकडे विक्रीसाठी टोमॅटो आहेत, त्या शेतकऱ्यांना याचा चांगलाच फायदा होताना दिसत आहे. यंदा मार्चमध्ये टोमॅटोच्या लागवडी कमी झाल्या आहेत. त्यामुळे सध्या टोमॅटोच्या दरात वाढ होत आहे. मार्च, 2022 मध्ये टोमॅटोची लागवड कमी झाली होती. त्यातच टुटा CMV किडीच्या दहशतीने दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. नवीन लागवड केलेला टोमॅटो जुलैमध्ये बाजारात येऊ शकेल. त्यानंतर दर कमी होऊ शकतील, असा अंदाज आहे.
महागाईवर सरकार कोणत्या उपाययोजना करणार
स्वयंपाकाच्या तेलापासून ते गव्हाच्या पिठापर्यंतच्या प्रत्येक गोष्टीच्या किमती देशात वाढल्या आहेत. एप्रिलमध्ये महागाई 8 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. महागाईने सर्वसान्यांचे बजेट बिघडवले आहे. गहू आणि साखरेच्या निर्यातीवर निर्बंध घालून सरकारने भाव कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. पण या टोमॅटोच्या दरवाढीवर सरकार कोणत्या उपाययोजना करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.