एअर इंडियाच्या विमानात महिलेसोबत सहप्रवाशाने गैरवर्तन केल्याप्रकरणी डीजीसीएने एक मोठी कारवाई केली आहे . याप्रकरणी एअर इंडियाने दिलेल्या स्पष्टीकरणावर असमाधानी असलेल्या डीजीसीएने एअर इंडियाला 30 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. सोबतच, घटनेच्या वेळी विमानात उपस्थित असलेल्या पायलटचा परवाना 3 महिन्यांसाठी रद्द करण्यात आला आहे. याशिवाय एअर इंडियाच्या डायरेक्टरला (इन-फ्लाइट सर्व्हिसेस) 3 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. याआधी एअर इंडियाने या प्रकरणातील आरोपी शंकर मिश्रा (Shankar Mishra) याच्यावर कारवाई केली होती. एअर इंडियाने त्याच्यावर 4 महिन्यांची प्रवेश बंदी केली आहे.
एअर इंडियाच्या या वादप्रकरणी एअरलाइन्सकडून उत्तर मागितले गेले होते, परंतु डीजीसीए त्यांच्या उत्तराने समाधानी नव्हते. त्यानंतर आता सरळ Air India वर कारवाई करण्यात आली आहे. तसेच प्रकरणातील आरोपी शंकर मिश्रा याच्यावर सहप्रवासी महिलेवर लघवी केल्याप्रकरणी चार महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे. शंकर मिश्रा याने या बंदीवर आक्षेप घेतला असून या निर्णयाविरोधात तो अपील दाखल करणार आहे. त्याने चौकशी समितीच्या निर्णयावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
काय आहे प्रकरण?
नोव्हेंबर 2022 मध्ये न्यूयॉर्कहून नवी दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात शंकर मिश्रा याने सहप्रवासी वृद्ध महिलेवर लघवी केली होती. याबाबत महिलेने विमानातील क्रू मेंबर्सकडे तक्रार केली. तक्रार करूनही आरोपीला सोडण्यात आल्याचा आरोप महिलेने केला होता. याबाबत त्यांनी टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांना ईमेलद्वारे तक्रार केली होती. हे प्रकरण मीडियासमोर आल्यानंतर त्यावर बरीच चर्चा घडली होती. त्यानंतर शंकर मिश्रा याला पोलिसांनी बंगळुरू येथून अटक केली होती.