Air India Airline ने शंकर मिश्राला चार महिन्यांसाठी प्रतिबंध लावला आहे. नोव्हेंबर महिन्यात सहप्रवासी महिलेवर लघुशंका केल्याचे प्रकरण समोर आले होते. न्यूयॉर्कवरून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात हा प्रकार घडला होता. या प्रकरणाची मोठ्या प्रमाणात देशभर चर्चा झाली होती. या प्रकरणामुळे शंकर मिश्रा याला आपली नोकरी देखील गमवावी लागली होती.
एअर इंडियाच्या उच्च स्तरीत बैठकीत हा निर्णय घेतला गेला. शंकर मिश्रा याच्या या कृतीचा अनेकांनी निषेध केला होता. एयर इंडियाप्रमाणे इतर विमान कंपन्या देखील मिश्रावर अशाप्रकारचे निर्बंध लावू शकतात. सुरुवातीला फक्त 30 दिवसांसाठी निर्बंध लावले होते. सोबतच त्या विमानात त्यावेळी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना कंपनीने कारणे दाखवा नोटीस दिली होती आणि त्यांची चौकशी लावली होती.
7 जानेवारीला बंगळुरू येथून दिल्ली पोलिसांनी शंकर मिश्राला अटक केली होती. घटना घडल्यानंतर सुमारे 42 दिवसांनंतर मिश्राला अटक करण्यात आली होती. हे प्रकरण समोर आल्यानंतर मिश्रा फरार झाला होता. त्याच्या विरुद्ध लूक आउट नोटीस जारी झाल्यानंतर त्याच्या मोबाईल लोकेशनने पोलिसांनी त्याला अटक केली होती.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            