एयर इंडिया (Air India) विमानात मद्यधुंद अवस्थेत 70 वर्षीय वृद्ध महिलेवर लघुशंका करणाऱ्या शंकर मिश्रा (Shankar Misra) या व्यक्तीला दिल्ली पोलिसांनी बंगळुरू (Bangalore) इथं अटक केली आहे. त्याला लवकरच दिल्लीला पुढील कारवाईसाठी आणले जाणार आहे. या दरम्यान शंकर मिश्रा काम करत असलेल्या वेल्स फर्गो बँकेने त्याला कामावरून काढून टाकले आहे.
काय काम करत होता शंकर मिश्रा?
अमेरिकेतील नामांकित अशा (Wells Fargo) बँकेचा भारतातील तो उपाध्यक्ष होता. केवळ 34 वर्षे वय असलेल्या शंकर मिश्रावर बँकेची महत्वाची जबाबदारी देण्यात आली होती. वेल्स फर्गो बँकेचे मुख्यालय अमेरिकेतील कॅलिफोर्निया (California) येथे असून ही बँक गृहकर्जासाठी उत्तम बँक म्हणून ओळखली जाते.
2021 मध्ये अमेरिकेतील सर्वात मोठ्या राष्ट्रीय बँका आणि वित्तीय सेवा पुरवठादारांपैकी एक असलेल्या वेल्स फार्गोमध्ये तो दाखल झाला होता. अपोलो नेटवर्कवर उपलब्ध त्याच्या संक्षिप्त प्रोफाइलनुसार, 2016-2021 या कालावधीत ते दुसऱ्या मोठ्या बहुराष्ट्रीय बँकेत काम करत होता. व्यावसायिकदृष्ट्या महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या लिंक्डइनवर (LinkedIn) त्याचे कोणतेही प्रोफाइल नाही. त्यामुळे त्याचे मूळ गाव, शालेय शिक्षण, पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण याबद्दल माहिती उपलब्ध नाही. Additional Box या दुसऱ्या व्यावसायिक पेजनुसार शंकर शर्मा काम करत वेल्स फर्गो बँकेत उपाध्यक्ष पदावर काम करणाऱ्या व्यक्तीला मासिक 50 लाख रुपये पगार दिला जातो.
शंकर मिश्राच्या अडचणीत वाढ
हे प्रकरण समोर आल्यापासून शंकर मिश्रा फरार झाला होता. मुंबईतील कुर्ला येथील त्याच्या राहत्या घरी देखील पोलिसांनी झाडाझडती घेतली होती. महिला आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत त्याच्यावर कारवाईचे संकेत दिले आहेत. बँगलोर येथून दिल्ली पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील कारवाईसाठी त्याला दिल्लीला नेले जाणार आहे.