एअर इंडिया (Air India) ही थेट विमानसेवेत (Direct Flights) मक्तेदारी असलेली भारतीय कंपनी आहे. आणि त्यांनी या आडवड्यात मुंबई ते सॅनफ्रान्सिस्को (Mumbai To San Francisco) अशी थेट विमानसेवा सुरू केली आहे. नागरी विमान उड्डयणमंत्री ज्योतीर्आदित्य सिंदिया (Jyotiradiya Scindia) यांनी एअर इंडिया आणि टाटाचे लोगो असलेला ध्वज उंचावून या सेवेचं उद्घाटन केलं. आठवड्यातून तीन दिवस म्हणजे मुंबईहून (Mumbai) मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी दुपारी अडीच वाजता हे विमान सॅनफ्रान्सिस्कोला जायला निघेल. हा प्रवास बोईंग 777 - 200LR (Boeing 777-200LR) या विमानातून होईल. मुंबईहून सॅनफ्रान्सिस्कोला जाणाऱ्या विमानाचा क्रमांक AI 177 असा आहे. तर परतीच्या प्रवासात सॅनफ्रान्सिस्कोहून विमान गुरुवारी, शनिवारी आणि पुढच्या मंगळवारी निघेल. तिथून उड्डाणाची वेळ रात्री साडेनऊ आहे.
महाराष्ट्र, भारत आणि एअर इंडिया यांच्यासाठी हा ऐतिहासिक दिवस आहे, असं सिंदिया यावेळी बोलताना म्हणाले.
‘भारत ही जगातली तिसरी मोठी नागरी विमानसेवेची बाजारपेठ आहे. आणि अलीकडे सगळ्याच विमान कंपन्यांना सोसाव्या लागलेल्या नुकसानानंतर भारतीय कंपन्या आता कात टाकताय. आणि प्रगतीच्या नव्या क्षितिजावर उभ्या आहेत. आणि या विमान कंपन्यांचं नेतृत्व या क्षेत्रातली परंपरा, संस्कृती आणि विशाल दृष्टिकोण असलेली टाटा सारखी कंपनी करत आहे,’ असं सिंदिया यावेळी बोलताना म्हणाले.
त्यांच्याबरोबरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही या कार्यक्रमाला उपस्थित होते.
त्यांनी ट्विटरवर आपल्या भावना व्यक्त केल्या, ‘आज महाराष्ट्र आणि सॅनफ्रान्सिस्को यांच्यातलं अंतर कमी झालं असं म्हणावं लागेल. नागरी उड्डाणाच्या क्षेत्रात महाराष्ट्राला अजून खूप मजल मारायची आहे. आणि मुंबई, पुणे, नागपूरच्या बरोबरीने आंतरराष्ट्रीय दर्जाची विमानतळं आणि हेलिपॅड राज्यात उभारायची आहेत,’ असं शिंदे यावेळी म्हणाले.
भारताची औद्योगिक राजधानी आता अमेरिकेतल्या टेकशहराशी जोडली गेली आहे, अशा भावनाही एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या आहेत.
टाटा समुहासाठीही मुंबई ते सॅनफ्रान्सिस्को थेट सेवा हा महत्त्वाचा मापदंड आहे. कारण, एअर इंडिया ताब्यात घेतल्यानंतर त्यांचं लक्ष कंपनीच्या विस्ताराकडे आहे. या महिन्यात 2 डिसेंबर रोजी टाटा समुहाने बंगळुरू ते सॅनफ्रान्सिको दरम्यान थेट सेवाही सुरू केली आहे. आठवड्यातून दोनदा ही सेवा सुरू राहील. या दोन सेवांमुळे भारत ते अमेरिकेदरम्यान एअर इडिया कंपनीच्या आता आठवड्यातून तब्बल 40 फेऱ्या होतील. एअर इंडिया कंपनीनेच आपल्या प्रसिद्धीपत्रकात ही गोष्ट नमूद केली आहे.
थेट प्रवासामुळे प्रवाशांचा वेळ वाचतो. आणि ट्रान्झिटमध्ये इतर देशांमध्ये व्हिसा आणि सुरक्षा तपासणीच्या दिव्यातून जावं लागत नाही. त्यामुळे लोकांची पसंती थेट विमानसेवांना असते. पण, 24 तासांच्या थेट सेवेसाठी शेकडो लीटर पेट्रोल लागतं. ते साठवू शकणाऱ्या मोठ्या विमानांची गरज थेट सेवांसाठी असते. त्यामुळे एअर इंडियाची या क्षेत्रात मक्तेदारी मानली जाते.
भारतातून अमेरिकेतल्या थेट सेवांची यादी अशी आहे.
दिल्ली ते नेवार्क
दिल्ली ते न्यूयॉर्क
दिल्ली ते वॉशिंग्टन डीसी
दिल्ली ते सॅनफ्रान्सिस्को
दिल्ली ते शिकागो
बंगळुरी ते सॅनफ्रान्सिको
मुंबई ते नेवार्क
मुंबई ते सॅनफ्रान्सिस्को