या आर्थिक वर्षात 10 जानेवारीपर्यंत देशाच्या एकूण प्रत्यक्ष कर संकलनात (Tax Collection) 24.58 टक्क्यांनी वाढ झाली असून ती 14.71 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. या वाढीमध्ये वैयक्तिक आयकराचा मोठा वाटा होता. सरकारने काल बुधवारी (11 January 2023) ही आकडेवारी जाहीर केली. या कालावधीत निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन 12.31 लाख कोटी रुपये इतके जमा झाले, जे मागील वर्षीच्या याच कालावधीतील निव्वळ संकलनापेक्षा 19.55 टक्के जास्त आहे, असे आयकर विभागाने म्हटले आहे. हे आयकर संकलन चालू आर्थिक वर्षातील प्रत्यक्ष करांच्या एकूण अंदाजपत्रकाच्या 86.68 टक्के आहे. अर्थसंकल्पात या आर्थिक वर्षात 14.20 लाख कोटी रुपये प्रत्यक्ष कर संकलनाचा अंदाज होता. या कालावधीत, कॉर्पोरेट आयकर (CIT) कडून मिळणाऱ्या संकलनात 19.72 टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर वैयक्तिक आयकर (PIT) मधून 30.46 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
CBDT ची माहिती
सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) ने एका निवेदनात म्हटले आहे की, ‘10 जानेवारी 2023 पर्यंतच्या प्रत्यक्ष कर संकलनाची आकडेवारी स्थिर वाढ दर्शवते आहे. या कालावधीत प्रत्यक्ष कर संकलन 14.71लाख कोटी रुपये इतके होते, जे 10 जानेवारी 2023 च्या तुलनेत जास्त आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत झालेल्या कर संकलनापेक्षा ही वाढ 24.58 टक्के अधिक आहे.’
2.40 लाख कोटी रुपयांचा परतावा जारी
1 एप्रिल 2022 ते 10 जानेवारी 2023 दरम्यान 2.40 लाख कोटी रुपयांचा परतावा जारी करण्यात आला असून, तो मागील वर्षी याच कालावधीत जारी केलेल्या परताव्याच्या तुलनेत 58.74 टक्के जास्त आहे, अशी माहिती सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने दिली आहे. आयकर परतावा समायोजित केल्यानंतर. कार्पोरेट आयकर (CIT) संकलनातील निव्वळ वाढ 18.33 टक्के आहे तर वैयक्तिक आयकर संकलनातील (PIT) निव्वळ वाढ (सुरक्षा व्यवहार करासह) 20.97 टक्के इतकी नोंदवली गेली आहे.