सामाजिक संस्था किंवा धर्मादाय ट्रस्टला देणगी देणाऱ्या करदात्यांना प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80G अंतर्गत कर सवलत मिळवता येते. ही प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी प्राप्तिकर विभागाने काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे प्रसिद्ध केली आहेत. करदात्यांनी आपला प्राप्तिकर परतावा भरताना कोणती काळजी घ्यावी, याची सविस्तर माहिती यामध्ये दिली आहे.
Table of contents [Show]
देणगी आणि कर सवलत यातील फरक
अनेकदा करदात्यांमध्ये देणगी आणि वजावट बाबत संभ्रम असतो. देणगी म्हणजे तुम्ही एखाद्या संस्थेला दिलेली प्रत्यक्ष रक्कम होय. तर वजावट म्हणजे त्या देणगीच्या बदल्यात प्राप्तिकर कायद्यानुसार तुमच्या एकूण करपात्र उत्पन्नातून मिळणारा कर सवलतीचा फायदा होय. व्यक्ती, हिंदू अविभक्त कुटुंब (HUF), कंपन्या आणि संस्था ज्यांचे उत्पन्न करपात्र आहे, ते सर्वजण ही सवलत मिळवण्यासाठी पात्र आहेत.
देणगीचे चार मुख्य प्रकार आणि सवलतीची मर्यादा
कलम 80G अंतर्गत सर्वच देणग्यांवर सारखीच सवलत मिळत नाही. देणगी दिलेल्या संस्थेच्या प्रकारानुसार त्याचे चार भाग पडतात:
मर्यादेशिवाय 100% वजावट: यामध्ये तुम्ही दिलेल्या संपूर्ण रकमेवर कर सवलत मिळते. यामध्ये पंतप्रधान मदत निधीसारख्या एकूण 24 विशिष्ट निधींचा समावेश होतो.
मर्यादेशिवाय 50% वजावट: दिलेल्या रकमेच्या निम्म्या रकमेवर सवलत मिळते. उदा. पंतप्रधान दुष्काळ निवारण निधी.
मर्यादेसह 100% वजावट: कुटुंब नियोजनासाठी सरकारला किंवा स्थानिक प्राधिकरणाला दिलेल्या देणग्या यात येतात. याची कमाल मर्यादा तुमच्या एकूण उत्पन्नाच्या 10% असते.
मर्यादेसह 50% वजावट: ऐतिहासिक मंदिरे, मशीद, गुरुद्वारा किंवा चर्चच्या दुरुस्तीसाठी दिलेल्या देणग्या या श्रेणीत येतात.
पडताळणी आणि नवीन नियम
प्राप्तिकर विभाग तुम्ही दावा केलेल्या सवलतीची पडताळणी 'फॉर्म 10BD' च्या माध्यमातून करणार आहे. ज्या संस्थेला तुम्ही देणगी दिली आहे, त्या संस्थेने तुमचा पॅन नंबर, आधार, नाव आणि पत्ता यासह 'फॉर्म 10BD' भरणे बंधनकारक आहे. तुम्ही तुमच्या आयटीआरमध्ये (ITR) दिलेली माहिती आणि संस्थेने भरलेली माहिती जुळणे आवश्यक आहे, अन्यथा तुमची सवलत नाकारली जाऊ शकते.
या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा
नगद देणगीवर मर्यादा: जर तुम्ही 2,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम रोख (Cash) स्वरूपात देणगी म्हणून दिली, तर त्यावर कोणतीही कर सवलत मिळणार नाही. त्यापेक्षा जास्त रक्कम चेक, ड्राफ्ट किंवा डिजिटल माध्यमातून देणे अनिवार्य आहे.
नवीन कर व्यवस्था (New Tax Regime): जे करदाते नवीन कर व्यवस्थेचा पर्याय निवडतील, त्यांना कलम 80G अंतर्गत देणगीवर कोणतीही वजावट मिळवता येणार नाही. ही सवलत केवळ जुन्या कर व्यवस्थेत उपलब्ध आहे.
दुहेरी सवलत नाही: जर तुम्ही एका देणगीवर 80G अंतर्गत सवलत घेतली असेल, तर त्याच रकमेवर कायद्याच्या इतर कोणत्याही कलमाखाली पुन्हा सवलत घेता येणार नाही.
करदात्यांनी देणगी देण्यापूर्वी संबंधित संस्था प्राप्तिकर विभागाकडे नोंदणीकृत आहे का आणि ती कोणत्या श्रेणीत येते, याची पडताळणी अधिकृत वेबसाईटवर करणे आवश्यक आहे.