सध्या शेअर मार्केटमध्ये अनेक नवनवीन आयपीओ येत आहेत. या आयपीओबाबतच्या बातम्यांमुळे सर्वसामान्य लोकांनाही आयपीओची भुरळ पडू लागली आहे. काही आर्थिक तज्ज्ञांकडून त्यामध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो. एकूणच नवीन आयपीओ बाजारात आला की त्याची जोरदार चर्चा सुरू होते. पण अजूनही बऱ्याच लोकांना आयपीओमध्ये गुंतवणूक कशी करायची ते आयपीओमध्ये कशाप्रकारे गुंतवणूक करता येते, त्याचे प्रकार काय असतात, याची पुरेशी माहिती नसते. आज आपण आयपीओमधील गुंतवणूकदारांच्या प्रकारांबद्दल जाणून घेणार आहोत.
आयपीओमधील गुंतवणूकदारांचे प्रकार
आयपीओमध्ये 3 प्रकारचे गुंतवणूकदार गुंतवणूक करतात. पहिले किरकोळ गुंतवणूकदार (Retail Individual Investor - RII), दुसरे पात्र संस्थात्मक खरेदीदार (Qualified Institutional Buyer) यात बॅंका, म्युच्युअल फंड आणि वित्तीय संस्था यांचा समावेश होतो. तिसरे मोठे गुंतवणूकदार (High Net-worth Individual - HNI) या प्रत्येक श्रेणींसाठी आयपीओमध्ये आरक्षण असते.
Retail Individual Investor (RII) किरकोळ गुंतवणूकदार
शेअर मार्केट, स्टॉक एक्सचेंज किंवा म्युच्युअल फंडशी संबंधित माहिती व बातम्यांमधून तुम्ही किरकोळ गुंतवणूकदार हा शब्द नक्कीच ऐकला असेल. याचा नेमका अर्थ तुम्हाला माहीत आहे का? वास्तविक, किरकोळ गुंतवणूकदार हे पारंपरिक किंवा ऑनलाईन ब्रोकरेज फर्मद्वारे शेअर्स, कमोडिटी कॉन्ट्रॅक्ट्स किंवा एक्सचेंज ट्रेडेड फंड्स (ETFs) मध्ये गुंतवणूक करतात. अशी गुंतवणूक ते इतर प्रकारच्या गुंतवणूक खात्यांमधूनही करू शकतात.
किरकोळ गुंतवणूकदारांची व्याख्या त्यांच्या खरेदी क्षमतेच्या आधारावर सेबी (SEBI)ने कायद्यांतर्गत ठरवली आहे. SEBI ने अशा गुंतवणूकदांना किरकोळ गुंतवणूकदार म्हटले आहे. जे IPO मध्ये 2 लाख रूपयांपेक्षा अधिक पैसे गुंतवत नाहीत किंवा कोणत्याही शेअर्समध्ये यांची गुंतवणूक 2 लाख रूपयांपेक्षा कमी असते. बाजारात अशा किरकोळ गुंतवणूकदारांना ओळखण्यासाठी कोणतेही पॅरामीटर नाहीत.
किरकोळ गुंतवणूकदार त्यांच्या वैयक्तिक खात्यांमधून खरेदी-विक्रीचे व्यवहार करतात. ते म्युच्युअल फंड (Mutual Fund), पेन्शन फंड (Pension Fund) या संस्थांच्या तुलनेत खूपच कमी प्रमाणात ट्रेडिंग करतात. किरकोळ गुंतवणूकदारांची क्रयशक्ती (पर्चेसिंग पॉवर) खूपच कमी असल्याने त्यांना त्यांच्या प्रत्येक व्यवहारांसाठी त्यामानाने अधिक शुल्क द्यावे लागते. अशा किरकोळ गुंतवणूकदारांचे हित जपण्यासाठी सेबी वेळोवेळी नियम बदलत असते आणि जिथे आवश्यकता आहे तिथे नवीन नियम तयार ही करत असते. किरकोळ गुंतवणूकदारांना काही विशिष्ट प्रकारच्या सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करण्यास सेबी परवानगी देत नाही.
पात्र संस्थात्मक खरेदीदार (Qualified Institutional Buyer)
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना IPO मध्ये ही गुंतवणूक करायला आवडते. IPO मध्ये गुंतवणूक करताना बऱ्याचवेळा गुंतवणूकदार किरकोळ गुंतवणूकदार (RII) या प्रकारातून अर्ज भरतात. एखाद्या कंपनीचा IPO येतो तेव्हा त्यातील काही भाग किरकोळ गुंतवणूकदारांसोबत इतर प्रकारच्या गुंतवणूकदारांसाठी राखीव असतो. यापैकी QIB (Qualified Institutional Buyer) हा एक प्रकार आहे; ज्यांच्यासाठी IPO मधील एक भाग राखीव ठेवला जातो.
IPO मध्ये गुंतवणूक करण्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात पात्र संस्थात्मक खरेदीदार (QIB) काय आहेत आणि त्यात कोण गुंतवणूक करतं, हे अनेकांना माहिती नसते. तर आज आपण पात्र संस्थात्मक खरेदीदारांबद्दल (QIB) संपूर्ण माहिती सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. QIB गुंतवणूकदार ही अशी एक श्रेणी आहे. ज्यांच्याकडे भांडवली बाजारात गुंतवणूक करण्याचे आर्थिक पाठबळ आणि बाजाराचे मूल्यमापन करण्याचे कौशल्य असते, अशा गुंतवणूकदारांना सेबी संस्थात्मक गुंतवणूकदार म्हणते.
SEBI ने खालील गुंतवणूकदारांना पात्र संस्थात्मक खरेदीदार (QIBs) म्हणून मान्यता दिली.
- सर्व व्यावसायिक बँका (Commercial Banks)
- म्युच्युअल फंड, अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड, व्हेंचर कॅपिटल फंड
- SEBI नोंदणीकृत विदेशी उपक्रम भांडवलदार (Foreign venture capital)
- SEBI नोंदणीकृत विदेशी संस्थागत गुंतवणूकदार (Foreign Institutional Investors)
- IRDAI नोंदणीकृत कोणतीही विमा कंपनी
- बहुपक्षीय आणि द्विपक्षीय विकास वित्तीय संस्था
- कोणत्याही राज्याचा औद्योगिक विकास महामंडळाचा विभाग
- 25 कोटी रुपयांच्या किमान निधीसह भविष्य निर्वाह निधी
- 25 कोटी रुपयांच्या किमान कॉर्पससह पेन्शन फंड
- पोस्ट विभागाद्वारे चालवला जाणारा विमा निधी
- राष्ट्रीय गुंतवणूक निधी
मोठे गुंतवणूकदार (High Net-worth Individual - HNI)
IPO मध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणाऱ्या HNI गुंतवणूकदारांना रिटेल गुंतवणूकदार म्हणतात. जे IPO मध्ये 2 लाखांपेक्षा अधिक किमतीच्या शेअर्ससाठी अर्ज करतात. म्हणजेच, एचएनआय श्रेणीतील गुंतवणूक 2 लाख रुपयांपासून सुरू होते.
सर्व IPO मध्ये एचएनआय गुंतवणूकदारांसाठी एक वेगळी श्रेणी असते. ज्यामध्ये एचएनआय साठी शेअर्स राखीव असतात. आयपीओमध्ये गुंतवणूक करणारी व्यक्ती एकाचवेळी एचएनआय (HNI) आणि रिटेल (Retail) श्रेणीमध्ये एकाच वेळी गुंतवणूक करू शकत नाही. एचएनआय श्रेणीतून IPO साठी अर्ज भरताना 2 लाख रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक करावी लागते. यासाठी अनेक बँका, वित्तीय संस्था किंवा दलाल गुंतवणूक करण्यासाठी निधी किंवा कर्ज देतात. जर तुम्हाला एचएनआय श्रेणीतील IPO मध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुमच्या नेटबँकिंगमध्ये अप्लिकेशन सर्पोर्टेड बाय ब्लॉक अमाऊंट (Application Supported by Blocked Amount)ची सुविधा असणे गरजेचे आहे.