Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Mamaearth IPO: आयपीओ गुंतवणूकदारांसाठी आणखी एक संधी; मॅमअर्थ कंपनीचा आयपीओ आजपासून खुला

Mamaearth IPO

Mamaearth IPO: या आठवड्यात सलग दुसऱ्या दिवशी आणखी एका मोठ्या कंपनीचा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे. सोमवारी (दि. 30 ऑक्टोबर) सेलो वर्ल्ड कंपनीचा आयपीओ ओपन झाला आहे. तर आजपासून मॅमअर्थ कंपनीचा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे.

Mamaearth IPO: मॅमअर्थ कंपनीची मूळ कंपनी Honasa Consumerचा आयपीओ आजपासून किरकोळ गुंतवणूकदारांसाठी ओपन झाला आहे. कंपनीने 308 - 324 अशी प्रति शेअरची किंमत निश्चित केली. 2 नोव्हेंबरपर्यंत यामध्ये गुंतवणूक करता येणार आहे.

या आठवड्यात सलग दुसऱ्या दिवशी आणखी एका मोठ्या कंपनीचा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे. सोमवारी (दि.  30 ऑक्टोबर) सेलो वर्ल्ड कंपनीचा आयपीओ ओपन झाला आहे. तर आजपासून मॅमअर्थ कंपनीचा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे. आयपीओमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी ही एक चांगली संधी आहे. पण आयपीओमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी आयपीओ म्हणजे काय? आणि संबंधित आयपीओ संपूर्ण माहिती जाणून घ्या.

आयपीओ म्हणजे काय?

शेअर मार्केटमध्ये नोंदणी न झालेल्या कंपन्या जेव्हा प्रथमच गुंतवणूकदारांसाठी शेअर्सची विक्री करण्याचा निर्णय घेते. तेव्हा कंपनी इनिशिअल पब्लिक ऑफर (प्रारंभिक सार्वजनिक ऑफर) म्हणजेच आयपीओ जाहीर करते. आयपीओच्या माध्यमातून कंपन्या आपल्या इक्विटी शेअर्सची विक्री करून मार्केटमधून निधी उभा करतात. या प्रक्रियेला तांत्रिक भाषेत आयपीओ (Initial Public Offering-IPO) म्हटले जाते. आयपीओ आल्यानंतर संबंधित कंपनी शेअर मार्केटमध्ये सूचीबद्ध (Listing) होते.

आजपासून करता येणार गुंतवणूक

Honasa Consumer IPOमध्ये आजपासून (31 ऑक्टोबर) गुंतवणूक करता येणार असून तो 2 नोव्हेंबरपर्यंत खुला असणार आहे. कंपनीने आयपीओच्या प्रति शेअर्सची किंमत 308-324 रुपये अशी निश्चित केली. आयपीओच्या एका लॉटमध्ये 46 शेअर्स असणार आहेत. गुंतवणूकदारांना एका लॉटसाठी 14,904 रुपये गुंतवावा लागणार आहेत. 7 नोव्हेंबरला आयपीओचे वाटप केले जाणार असून 9 नोव्हेंबरला गुंतवणूकदारांच्या डीमॅट अकाऊंटमध्ये शेअर्स जमा होतील. त्यानंतर 10 नोव्हेंबरला त्याचे मार्केटमध्ये लिस्टिंग होईल.

कंपनी या आयपीओच्या माध्यमातून 365 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स विक्रीसाठी उपलब्ध करून देणार आहे. तर 4.13 कोटी शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत उपलब्ध करून देणार आहे. Honasa Consumer कंपनी अंतर्गत मॅमर्थ, द डर्मा कंपनी, अॅक्वालॉजिका, डॉ. शेठ्, आयुगा आणि बीबल्न्ट या उपकंपन्या कार्यरत आहेत.

होनासा कन्झ्युमर कंपनी मुळची गुरुग्राम इथली असून या आयपीओमधून जमा होणाऱ्या निधीच्या माध्यमातून कंपनी मोठ्या प्रमाणात जाहिरातींवर खर्च करणार आहे. सौंदर्य प्रसाधने आणि पर्सनल केअर प्रोडक्टची जाहिरात करण्यासाठी जवळपास 182 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. तर 20 कोटी रुपये नवीन ब्रान्च सुरू करण्यासाठी खर्च केले जाणार आहेत. याशिवाय उर्वरित रक्कम व्यवसायाच्या प्रगतीसाठी आणि गुंतवणुकीसाठी वापरली जाणार आहे.

कंपनीची आर्थिक स्थिती पाहता मागील दोन वर्षात कंपनी तोट्यात आहे. पण कंपनीचे काही ब्रॅण्ड मार्केटमध्ये चांगल्या स्थितीत आहेत. त्यामुळे अल्पकालीन गुंतवणुकीसाठी यामध्ये गुंतवणूक करता येऊ शकते, असे मार्केटमधील तज्ज्ञांचे मत आहे.

(डिसक्लेमर : शेअर मार्केट आणि आयपीओमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' शेअर्स आणि आयपीओ खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)