औषध निर्माण क्षेत्रातील ब्ल्यू जेट हेल्थकेअर कंपनीचा 840.27 कोटींचा आयपीओ आज 25 ऑक्टोबर 2023 पासून गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे. येत्या 27 ऑक्टोबर 2023 पर्यंत यासाठी अर्ज करता येणार आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख औषध निर्माण कंपन्यांपैकी एक म्हणून ब्ल्यू जेट हेल्थकेअरची ओळख आहे. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये ब्ल्यू जेट हेल्थकेअरला 721 कोटींचा महसूल मिळाला होता. कंपनीच्या महसुलात 5.5% वाढ झाली होती. कंपनीला 160 कोटींचा नफा झाला मात्र त्यात 2021-22 च्या तुलनेत 11.87% घसरण झाली होती.
चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत कंपनीला 44.1 कोटींचा नफा झाला आहे. त्यात 58.4% वाढ झाली. महसुलात 24.2% वाढ झाली असून 179.5 कोटींचा महसूल मिळाला. ब्ल्यू जेट हेल्थकेअरचा शेअर बीएसई आणि एनएसई या दोन्ही शेअर मार्केटमध्ये सूचीबद्ध होणार आहे. शेअर लिस्टींग 6 नोव्हेंबर 2023 रोजी होण्याची शक्यता आहे.
आयपीओपूर्वीच कंपनीने 22 प्रमुख गुंतवणूकदारांकडून 252.08 कोटींचा निधी उभारला आहे. यात प्रमुख म्युच्युअल फंडांचा समावेश आहे. आयपीओमधून कंपनीचे मुख्य प्रवर्तक 2.4 कोटी शेअर्सची विक्री करणार आहेत. यात फ्रेश इश्यूचा समावेश नसल्याचे कंपनीने माहिती पत्रकात म्हटले आहे.
आयपीओसाठी ब्ल्यू जेट हेल्थकेअरने प्रती शेअर 329 ते 346 रुपयांचा किंमतपट्टा निश्चित केला आहे. वैयक्तिक गुंतवणूकदारांनी किमान 43 शेअर्ससाठी अर्ज करता येणार आहे. यासाठी 14147 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.