मागच्या काही काळापासून जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती (Crude oil price) कमी झाल्या आहेत. गेल्या वर्षभरातील विक्रमी उच्चांकावरून लक्षणीयरीत्या किंमती खाली आल्या आहेत. गेल्या वर्षी जूनमध्ये कच्च्या तेलाच्या किंमती प्रति बॅरल 122 डॉलरच्या पुढे गेल्या होत्या. आता या कच्च्या तेलावरचा कर काढून टाकण्यात आला आहे. सरकारनं अधिसूचना जारी केलीय. यानुसार, कच्च्या तेलावरचा 3500 रुपये प्रति टन म्हणजेच 42.56 डॉलर विंडफॉल टॅक्स रद्द करण्यात आला आहे. आधी कच्च्या तेलावर विंडफॉल टॅक्स हा 4400 रुपये प्रति टन होता. मार्चच्या पहिल्याच आठवड्यात सरकारनं करात वाढ केली होती. दुसरा महत्त्वाचा निर्णय म्हणजे, सरकारनं एटीएफ (ATF) आणि पेट्रोलवरचं विशेष अतिरिक्त निर्यात शुल्कदेखील (SAED) काढून टाकलं आहे. ताज्या माहितीनुसार, डिझेलची किंमत SAED 50 पैसे प्रति लीटर आहे.
काय आहे विंडफॉल टॅक्स?
विंडफॉल टॅक्स हा एखाद्या विशिष्ट कंपनी किंवा उद्योगानं केलेल्या अचानक मोठ्या नफ्यावर लादलेला उच्च कर दर असतो. सरकार हा कर लावत असतं. विशिष्ट स्थितीत तत्काळ फायदा होत असेल तर त्यावेळी हा कर लावला जातो. कच्च्या तेलाच्या किंमती मागील वर्षी विशेषत: आंतरराष्ट्रीय युद्धजन्य परिस्थिती होती, त्यावेळी प्रचंड वाढल्या होत्या. तेल कंपन्यांना या परिस्थितीचा फायदा झाला. तर ओनएनजीसीसारख्या (ONGC) कंपन्यांचाही नफा वाढला होता. त्यामुळे त्यावेळी त्यांच्यावर टॅक्स लावण्यात आला. या प्रकारच्या टॅक्सलाच विंडफॉल टॅक्स म्हटलं जातं. मागच्या वर्षी रशिया-युक्रेन युद्ध ही मोठी घडामोड होती. यामुळे जगतिक स्तरावर परिणाम होऊन कच्च्या तेलाचे दर वाढले. विविध देशांना याची झळ बसत होती. तेव्हा तेल कंपन्यांना मोठा नफा मिळत होता. याच नफ्यावर अशाप्रकारचा विंडफॉल टॅक्स लावण्यात आला. भारतासह इंग्लंड, इटली आणि इतर काही देशांनीही तेल कंपन्यांवर हा कर लावला होता.
India cuts all windfall tax on crude oil
— ANI Digital (@ani_digital) April 4, 2023
Read @ANI Story | https://t.co/YlwiaNZnlo#India #WindfallTax #CrudeOil pic.twitter.com/govJT15hAr
मागच्या वर्षी लागू केला होता कर
1 जुलै 2022 रोजी पेट्रोलियम उत्पादनांवर सरकारनं विंडफॉल टॅक्स लागू करण्याची घोषणा केली होती. पेट्रोलसह डिझेल आणि एटीएफवरही त्यावेळी हा कर लावण्यात आला होता. या वर्षाच्या जानेवारीत विंडफॉल टॅक्समध्ये वाढ करण्यात आली होती. साधारणपणे एक टन कच्च्या तेलावर 1700 रुपयांऐवजी 2100 रुपये टॅक्स द्यावा लागत होता. काही काळानंतर म्हणजेच एकूण आढावा घेतल्यानंतर पेट्रोल त्याच्या कक्षेतून बाहेर काढण्यात आलं. आता नवे दर 4 एप्रिलपासून लागू झाले आहेत. सध्या जागतिक स्तरावर तेलाची किंमत प्रति बॅरल 85 डॉलरच्या आसपास आहे. या परिस्थितीत देशांतर्गत उत्पादित कच्च्या तेलाच्या विक्रीवरचा विंडफॉल कर रद्द करण्यात आला आहे. साधारणपणे 30 दशलक्ष टन एवढ्या कच्च्या तेलाचं उत्पादन देशात दरवर्षी होतं. देशातल्या पेट्रोल आणि पेट्रोलियम पदार्थांच्या किंमती नियंत्रणात ठेवण्याच्या हेतूनं मागच्या वर्षी हा कर लागू करण्यात आला होता.