भारत सरकारने शुक्रवारी क्रूड ऑईल आणि पेट्रोलियम पदार्थांवरील विंडफॉल टॅक्समध्ये (Windfall Tax) बदल केले आहेत. हे बदल 4 मार्च 2023 पासून म्हणजेच आजपासून लागू झाले आहे. एकीकडे सरकारने देशातील पेट्रोलियम कंपन्यांना दिलासा दिला आहे, तर दुसरीकडे फटकाही दिला आहे. सरकारने क्रूड ऑईल, डिझेल आणि विमान इंधनावरील (ATF) विंडफॉल टॅक्स आजपासून बदलला आहे. क्रूड ऑईलवरील विंडफॉल टॅक्स वाढवला असून डिझेल आणि विमान इंधनाच्या (ATF) निर्यातीवरील अतिरिक्त शुल्कात कपात केली आहे. चला तर याबद्दल जाणून घेऊयात.
विंडफॉल टॅक्समध्ये किती बदल झाला आहे?
क्रूड ऑईलवरील विंडफॉल टॅक्स किरकोळ वाढवण्यात आला असून तो प्रति टन 4359 रुपयावरून 4400 रुपये प्रति टन झाला आहे. त्याच वेळी, डिझेलचे निर्यात शुल्क 2.5 रुपये प्रति लिटरवरून 0.5 रुपये प्रति लीटर करण्यात आले आहे. याशिवाय विमान इंधनाच्या निर्यातीवरील टॅक्स रद्द करण्यात आला आहे. हे सर्व टॅक्स आजपासून म्हणजेच 4 मार्च 2022 पासून लागू झाले आहेत.
विंडफॉल टॅक्स म्हणजे काय?
विंडफॉल टॅक्स विशेषत: अशा कंपन्यांवर लावला जातो, ज्या त्यांच्या विशेष दर्जामुळे प्रचंड नफा कमावतात. केंद्र सरकारने पहिल्यांदाच 1 जुलै 2022 पासून पेट्रोलियम पदार्थांवर विंडफॉल टॅक्स लागू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी सरकारने पेट्रोलबरोबरच डिझेल, एटीएफवरही हा कर लावण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. पेट्रोल आणि एटीएफवर प्रतिलिटर 6 रुपये आणि डिझेलवर 13 रुपये प्रतिलिटर निर्यात शुल्क लावण्यात आले होते. क्रूड ऑईच्या देशांतर्गत उत्पादनावर प्रति टन 23,250 रुपये विंडफॉल प्रॉफिट टॅक्स लावण्यात आला आहे.
सरकारला 25,000 कोटी रुपयांची कमाई
सोमवारी संसदेत याबाबत माहिती देताना सरकारने सांगितले की, विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क (SAED) लागू केल्यानंतर या आर्थिक वर्षात सरकारने एकूण 25,000 कोटी रुपयांची कमाई केली आहे. ही कमाई क्रूड ऑईल, पेट्रोल, डिझेल आणि एटीएफवरच्या निर्यातीतून मिळाली आहे.