अब्जाधीश एलॉन मस्क यांनी अलीकडे आपला सगळा संवाद त्यांनीच अलीकडे विकत घेतलेली सोशल मीडिया कंपनी ट्विटरच्या माध्यमातून सुरू ठेवला आहे. ‘अध्यक्षपदावर मी राहू की नको’ असा पोल घेतल्यानंतर आणि 57% लोकांनी त्यांच्या विरोधात कौल दिल्यानंतर आता ट्विट करून मस्क यांनी आपला निर्णय लोकांना कळवलाय.
ते म्हणतात, ‘मी ट्विटरच्या सीईओ पदावरून लगेच पायउतार होईन. फक्त या पदासाठी एखादा ‘मूर्ख’ उमेदवार मिळायला हवा! एकदा असा उमेदवार मिळाला की, माझ्या हातात फक्त काही महत्त्वाचे निर्णय असतील. आणि काही विभागांमध्ये मी कार्यरत असेन. बाकी कारभार नवीन उमेदवार सांभाळेल.’
ट्विटर पोलनंतर पहिल्यांदा मस्क यांनी सीईओ पदावरून पायउतार होण्याची प्रत्यक्ष तयारी दाखवलीय. कारण, या आधी त्यांनी केलेली ट्विट्स ही ट्विटर पोलची विश्वासार्हता कमी आहे, असं म्हणणारी होती. तसंच या पोलनंतर त्यांनी ट्विटर पोल फक्त ब्लू ट्विटरच्या सदस्यांनाच खुला असेल असंही जाहीर केलं.
एकूणच ट्विटर खरेदीचा सौदा ऑक्टोबर 2022 मध्ये पार पडल्यानंतरचा काळ मस्क आणि त्यांच्या कंपन्या तसंच गुंतवणूकदारांना गोंधळाचा आणि वादांचाच गेला आहे . गुंतवणूकदारांनी, मस्क यांचं मूळ उद्योग टेस्ला कंपनीकडे, दुर्लक्ष होत असल्याची भीतीही व्यक्त केली आहे.
गेल्या आठवड्यात मस्क यांनी ट्विटर वापरणाऱ्यांसाठी नियमांमध्ये बदल केले. नेमके बदल काय होते त्या बातमीची लिंक इथं दिली आहे.
या नियमांना ट्विटर वापरणाऱ्या अनेकांनी विरोध केल्यावर मस्क यांनी माघार घेतली. आणि इथून पुढे ट्विटरमधले महत्त्वाचे निर्णय ट्विटर पोलवर घेतले जातील असं सांगितलं. आणि रविवारी (18 डिसेंबर) एक ट्विटर पोल सुरू करून प्रश्नच असा विचारला की, ‘ट्विटरच्या सीईओपदी मी राहू की नको?’ आणि विशेष म्हणजे कोट्यवधी लोकांनी या पोलमध्ये भाग घेतला. आणि 57% लोकांनी मस्क यांच्या विरोधात कौल दिला.
त्यानंतर मस्क यांनी नेमका काय निर्णय घेतलाय हे मधल्या तीन दिवसांत कळवलंच नव्हतं. पण, आता या ट्विटने त्यांची भूमिका स्पष्ट झालीय.
आपण नवीन सीईओची वाट बघत आहोत. पण, तो ट्विटरला जिवंत ठेवू शकेल असा हवा, असं मस्क यांचं म्हणणं आहे. वॉलस्ट्रीट जर्नलनेही मस्क यांनी ट्विटरची जबाबदारी सोडावी असा कौल दिला आहे. टेस्लाच्या इन्व्हेस्टर फोरमचं म्हणणं त्यांनी आपल्या लेखात मांडलं आहे.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            