ट्विटर (Twitter Inc) या सोशल मीडिया साईटवर (Social Media Site) कुठलेही नियम बदलायचे झाले तर आधी पोल घेऊ, नियम सगळ्यांना मान्य आहेत का ते पाहू आणि मगच ते नियम लागू करू असं वचनच ट्विटरचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटर वापरणाऱ्यांना दिलंय.
आणि याचं प्रात्यक्षिक म्हणून पहिला पोल (Twitter Poll) त्यांनी सुरू केलाय, ‘ट्विटरचे सीईओ म्हणून एलॉन मस्क (Elon Musk) यांनी राहावं की जावं, तुम्हाला काय वाटतं?’ या पोलला लोकांचं जे उत्तर येईल, तो निर्णय आपल्यासाठी बंधनकारक असेल असं त्यांनी जाहीर केलंय. थोडक्यात मस्क यांनी ट्विटर ताब्यात घेतल्यानंतरचा त्यांचा काळ खूपच वादळी ठरतोय.
मागच्याच आठवड्यात ट्विटरचे मालक एलॉन मस्क यांनी त्यांच्या विरोधक पत्रकारांची ट्विटर खाती एकतर्फी बंद केली होती. त्यानंतर रविवारी 18 डिसेंबरला त्यांनी या सोशल मीडिया साईटवर कुठल्या प्रकारचा मजकूर किंवा संदेश टाकता येईल यासाठी नवीन नियमावली लागू केली. पण, यावेळी ट्विटर वापरणारे त्यांचे समर्थकही त्यांच्या विरोधात गेले.
नवीन नियम असं सांगत होते की, ट्विटरवर तुम्ही लिहिलेला कुठलाही मजकूर तुम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, मास्टोडन अशा इतर प्लॅटफॉर्म लिंक करता येणार नाही. या सोशल मीडिया साईट ट्विटरशी स्पर्धा करत असल्यामुळे मस्क यांनी हा नियम आणल्याचं बोललं जातंय. पण, फासे उलटे पडले. आणि लोकांनी विरोध सुरू केला.
शेवटी मस्क यांना नवीन नियम मागे घ्यावे लागले. आणि लोकांची माफीही मागावी लागली.
‘माझी चूक झाली. असं पुन्हा होणार नाही!’ असं एक ट्विट त्यांनी लोकांसाठी केलं. त्यानंतर 12 तासांचा एक पोलही जाहीर केला.
आपल्या ट्विटरच्या प्रोफाईलमध्येही प्रतिस्पर्धी साईट्सचा उल्लेख असेल तर ट्विटर त्यावर कारवाई करणार असा प्रस्ताव नवीन नियमांमध्ये होता. आणि अशी ट्विटर खाती तात्पुरती बंद करण्याचे अधिकार ट्विटरला मिळणार होते.
यापूर्वी, एलॉन मस्क यांचं खाजगी विमान कुठून कुठे प्रवास करतं याची नोंद ठेवल्याबद्दल मस्क यांनी पत्रकारांना सुनावलं होतं. आणि अशा पत्रकारांची तसंच ही बातमी छापणाऱ्या साईट्सचंही ट्विटर खातं एकतर्फी बंद करून टाकलं. ट्विटरवर उघडपणे मस्क यांना विरोध करणाऱ्या पत्रकारांचीही त्यांनी अशीच अवस्था केली.
आता मस्क यांनी सुरू केलेल्या पोलचे निकाल आपल्याला दिसू शकत नाहीत. पण, मतदानाची मुदत संपण्यासाठी जेमतेम काही तास उरलेत. आणि 3 लाखांपेक्षा जास्त लोकांनी हे ट्विट लाईक केलंय. तर जवळ जवळ 2 लाखांनी यावर प्रतिक्रिया दिल्याचं दिसतंय.