जास्तीत जास्त नफा कमवण्याच्या विचारानंच अनेकजण शेअर बाजारात (Share market) येतात. दीर्घकालीन गुंतवणुकीवर अधिक लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला या क्षेत्रातील तज्ज्ञ नवीन गुंतवणूकदारांना देत असतात. मात्र शक्य तितक्या लवकर पैसे कमवण्याच्या मागे लागत अनेक गुंतवणूकदार (Investors) पैसे गमावतात. खरं तर इंट्राडे ट्रेडिंग हा मार्केटमध्ये पैसे कमविण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. मात्र याच्या काही ट्रिक्स आहेत. यातले अनुभवी गुंतवणूकदार योग्य ट्रेडिंग करतात. त्यांना शेअर बाजारातले सर्व बारकावे माहीत असतात. जोखीम (Risk) घेण्याची, तोटा सहन करण्याची त्यांच्यात क्षमता असते, असेच लोक पैसे कमवतात.
Table of contents [Show]
किरकोळ गुंतवणूकदारांना दूर राहण्याचाच सल्ला
स्टॉक मार्केट ब्रोकर एंजेल वननं याबाबत काही माहिती दिली. त्यांच्या मते, इंट्राडे ट्रेडिंगच्या दरम्यान जवळपास 95 टक्के गुंतवणूकदारांना तोटाच सहन करावा लागतो. त्याचं महत्त्वाचं कारण यातले बारकावे त्यांना माहीत नसतात. एकूणच काय कारणं असावीत? इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे नेमकं काय, ते किती धोकादायक आहे, किरकोळ गुंतवणूकदारांना त्यापासून दूर राहण्याचा सल्ला का दिला जातो, असे विविध प्रश्न आहेत. फायनान्शिअल एक्स्प्रेसनं याविषयीचं सविस्तर वृत्त दिलंय. ट्रेडिंग करताना नेमक्या कोणत्या बाबी लक्षात ठेवल्या पाहिजेत, पाहूया...
स्टॉक मार्केटमधली गुंतवणूक ही इंट्राडे ट्रेंडिंगपेक्षा वेगळी
स्टॉक मार्केटमधली गुंतवणूक ही इंट्राडे ट्रेंडिंगपेक्षा वेगळी असते. दीर्घ मुदतीसाठी भांडवल गुंतवणं आणि त्या ठेवींवर निश्चित असा परतावा मिळवणं याला सामान्यपणे गुंतवणूक म्हटलं जातं. ही गुंतवणूक काही वर्षे असते. याउलट इंट्राडे ट्रेडिंग ही एका दिवसासाठीच असते. काही मिनिटांत किंवा काही तासांमध्ये तुम्ही एकतर नफा कमावता किंवा फार मोठं नुकसान सोसता. या क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी यावर महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत.
कमी मुदतीचा नफा
आयसीआयसीआय सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष सौरव सुलतानिया यांनी सांगितलं, की इंट्राडे ट्रेडिंग आणि दीर्घकालीन गुंतवणूक ही वेगवेगळी उद्दिष्टे, वेळेचं गणित आणि जोखीम घेण्याची क्षमता असलेल्या वेगवेगळ्या गुंतवणुकीच्या पद्धती आहेत. इंट्राडे ट्रेडर्स स्टॉकच्या हालचालींमधून कमी मुदतीचा नफा कमावतात. तर दुसरीकडे दीर्घकालीन गुंतवणूकदार मजबूत फंडामेंटल्स असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून काही कालावधीनंतर नफा कमावतात.
'...तर चांगला नफा'
प्रभुदास लिल्लाधरमध्ये टेक्निकल रिसर्चच्या व्हाइस प्रेसिडेंट वैशावी पारेख यांच्या मते, संपत्तीची निर्मिती गुंतवणुकीच्या माध्यमातून होत असते. इंट्राडे ट्रेडिंगमधून नाही. कंपनीच्या फंडामेंटल्सवर रिसर्च केल्यानंतर काही काळासाठी चांगल्या गुणवत्तेच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यानंतर खूप चांगला नफा मिळू शकतो. मात्र बहुतांशी असं होत नाही. इंट्राडे ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केली जाते. ज्याचा परिणाम तोट्यात होतो. शेअर बाजारात जवळपास 90-95 टक्के गुंतवणूकदारांचं इंट्राडे ट्रेडिंगमध्ये नुकसान होतं. वेल्थडेस्कचे वेल्थबास्केट क्युरेटर निराकर प्रधान यांनी याची काही कारणं सांगितली आहेत.
- बहुतेक गुंतवणूकदारांना पास मार्केट बिहेवियरच्या मागच्या कारणाची समज नसते.
- गुंतवणूकदाराकडे जोखीम व्यवस्थापनाचा (Risk management) अभाव असतो. 'कट लॉस' आणि 'बुक-प्रॉफिट' यातल्या बारकाव्यांविषयी अनेकांना माहितीच नसते.
- ट्रेडिंगमध्ये ट्रान्झॅक्शन कॉस्ट खूप जास्त असते.
- इंट्राडे ट्रेडिंग ही साधारणपणे इमोशन, अफवा आणि हार्ड मेंटॅलिटीवर आधारित असते.
बहुतांश गुंतवणूकदार का ठरतात अपयशी?
सौरव सुलतानिया सांगतात, की हा एक इमोशनल बिझनेस आहे. लोकांच्या निर्णयावर भावनेचं अधिक वर्चस्व असतं. इंट्राडे ट्रेडिंग खूप मोठ्या प्रमाणावर भावनात्मक असू शकते. त्यामुळे अशा परिस्थितीत वेगळे निर्णय होतात. त्यामुळे तोटा सहन करावा लागतो. त्यासोबतच त्यातली माहिती नसणं, नियमांचं पालन न करणं आणि ओव्हर ट्रेडिंग अशा काही कारणांमुळेही नुकसान सोसावं लागतं.
किरकोळ गुंतवणूकदारांनी 'या' गोष्टी लक्षात ठेवा...
जोखीम असतानाही तुम्हाला इंट्राडे ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करायची असेल, तर काही गोष्टी आहेत, ज्याचा तुम्ही विचार करायला हवा. मात्र त्यानंतही तुम्ही नफा मिळवू शकाल, असं नाही. प्रयोग मायक्रो फायनान्सच्या सीईओ सौम्या श्रीवास्तव याविषयी सांगतात, की ज्या गुंतवणूकदारांना इंट्राडे ट्रेडिंगमध्ये यशस्वी व्हायचंय, त्यांनी रिस्क मॅनेजमेंट, मार्केट रिसर्च, अचूक ट्रेडिंग ट्रॅटेजी, कॅपिटल मॅनेजमेंट या गोष्टींकडे अधिक लक्ष केंद्रित करायला हवं. याशिवाय स्टॉप-लॉस ऑर्डर लावणं, संशोधन करणं, योग्य प्लॅनिंग, भावनात्मक ट्रे़डिंग न करणं यामुळेही धोका कमी होतो. वैशाली पारेख यांच्या मते, इंट्राडे ट्रेडिंगमधला एक वाईट ट्रेडही एका झटक्यात कष्टानं कमवलेला नफा नष्ट करू शकतो.
इंट्राडे ट्रेडिंग जुगार?
स्टॉक्सचे बिग बुल दिवंगत राकेश झुनझुनवाला यांनीदेखील इंट्राडे ट्रेडिंगपासून सावध राहण्याचा सल्ला दिला होता. यावरून इंट्राडे किती जोखीम असलेला व्यवहार आहे, याची कल्पना येईल. सौरव सुलतानिया याविषयी म्हणतात, की इंट्राडे ट्रेडिंग कसं चालतं याचं मर्यादित ज्ञान ज्यांना आहे, त्यांना हा प्रकार जुगारसारखा वाटू शकतो. मात्र यातही चार्ट आणि ट्रेंडचं एक शास्त्र आहे. ज्यांना अशाप्रकारचं ट्रेडिंग करायचंय, त्यांनी अनुभवी आणि सेबी नोंदणीकृत विश्लेषकांचा सल्ला घ्यायला हवा. तर सौम्या श्रीवास्तव म्हणतात, की ही सर्व प्रक्रिया पूर्णपणे भावनांवर आधारित आहे. तांत्रिक किंवा मूलभूत विश्लेषणाशिवाय ट्रेडिंग केलं तर ते जुगारासमान वाटू शकतं.