येणाऱ्या काळात शेअर बाजारात तुम्ही रात्री देखील ट्रेडिंग करू शकणार आहात. होय, याबाबत सध्या SEBI आणि NES यांच्यात चर्चा सुरु असून लवकरच यावर निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. भारतीय शेअर मार्केटमध्ये कोट्यावधींची उलाढाल होत असून जागतिक पातळीवर कंपन्या देखील भारतीय अर्थव्यवस्थेकडे आशेने बघत आहेत.
Table of contents [Show]
रात्री 3 तासांसाठी ट्रेडिंग सत्र
भारतीय शेअर मार्केटमध्ये होत असलेली गुंतवणूक लक्षात घेऊन नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) संध्याकाळी 3 तासांसाठी ट्रेडिंग सत्र सुरू करण्याच्या तयारीत आहे. असे झाल्यास गुंतवणूकदारांना गुंतवणुकीसाठी अधिक कालावधी मिळू शकतो आणि त्याचा परिणाम थेट भारतीय अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो.
संध्याकाळी 6 ते 9 या कालावधीत NSE वर ट्रेडिंगचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी सध्या विचार विनिमय सुरु आहे. हा निर्णय लागू झाल्यास तो राबवताना कसे नियोजन आणि नियमावली केली पाहिजे यावर SEBI आणि NSE चर्चा करत आहे. दोन्ही संस्था या निर्णयाबाबत सकारात्मक असून त्यावर लवकरच निर्णय घेतला जाईल असे जाणकारांचे म्हणणे आहे.
रिअल टाईम होतात व्यवहार
NSE आणि SEBI ने ट्रेडिंगचा वेळ वाढवल्यास ट्रेडिंग कंपन्या, ब्रोकर्स आणि वेगवगेळ्या एक्सचेंजेसला देखील त्यांचा वेळ वाढवावा लागणार आहे. ट्रेडिंग क्षेत्रात विविध कंपन्या देखील कार्यरत असून त्या देखील SEBI च्या नियमांचे पालन करून सामान्य ग्राहकांना, गुंतवणूकदारांना ट्रेडिंग प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देत असतात. ट्रेडिंगचा वेळ वाढल्यानंतर या सगळ्याच कंपन्यांना आपले कामकाजाची वेळ वाढवावे लागणार आहेत.
NSE ला याआधी देखील ट्रेडिंग तास वाढवण्यासाठी नागरिकांच्या सूचना प्राप्त झाल्या होत्या. या सूचनांवर SEBI आणि NSE आता सकारात्मक निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.
ट्रेडिंग कालावधी आणखी वाढण्याची अपेक्षा
ट्रेडिंग जाणकारांनी आणि गुंतवणूकदारांनी NSE आणि SEBI च्या होऊ घातलेल्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. तसेच सध्या संध्याकाळी 6 ते 9 या कालावधीत ट्रेडिंग उपलब्ध करून दिले जाईल आणि येणाऱ्या काळात रात्री 11.30 वाजेपर्यंत हा ट्रेडिंग टाईम वाढवला जाईल असेही काहींनी म्हटले आहे. सध्या सकाळी 9.15 ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत ट्रेडिंग करता येते.
अमेरिकन शेअर मार्केटचा परिणाम
अमेरिकन शेअर बाजाराचा परिणाम भारतीय बाजारावर पाहायला मिळत असतो. अमेरिका आणि भारत यांच्यात असलेली वेळेची तफावत अर्थव्यवस्थेवर देखील भलाबुरा परिणाम करत असते. भारतात रात्र असताना अमेरिकेत सकाळ असते, तेथे घडलेल्या आर्थिक घडामोडी भारतीयांना सकाळी समजतात आणि अमेरिकन शेअर बाजारात होणाऱ्या नुकसानीचा परिणाम भारतीय गुंतवणूकदारांना सहन करावा लागतो. ही अडचण टाळण्यासाठी सुरुवातीला संध्याकाळी 6 ते 9 आणि नंतर रात्री 11.30 पर्यंत ट्रेडिंगची वेळ वाढवल्यास भारतीय गुंतवणूकदारांना अमेरिकन शेयर मार्केटवर नजर ठेवता येणार आहे आणि ट्रेडिंगबाबत निर्णय घेता येणार आहे.