आज देश स्वातंत्र्याची पंचाहत्तरी अभिमानाने साजरी करत आहे. आज जागतीक फार्मा दिवस. भारत आणि औषधं यांचा संबंध पुरणकाळातला. मात्र स्वातंत्र्यानंतर औषधं निर्माण करणं ही भारतापुढची एक मोठी समस्या होती. सर्वसामान्य लोकांना रोगराईपासून दिलासा देणं हे भारतासमोरचं एक मोठं आव्हान होतं. हे शिवधनुष्य देशाने मोठ्या कष्टाने पेललं. स्वातंत्र्यानंतर भारत दोन दशकं इतर देशांवर अवलंबुन होता. मात्र गेल्या काही वर्षात भारताने याही क्षेत्रात कात टाकली आणि आज भारत आपल्या नागरिकांच्या गरजा पूर्ण होतील याच्या 85 टक्के औषधं बनवण्यात सक्षम झाला आहे हे अभिमानाने नमूद करावसं वाटतं.
गेल्या दोन दशकांमध्ये भारत औषध निर्माणाच्या बाबतीत स्वावलंबी बनला आहे. जेनेरिक औषधं आणि लशींचा जागतिक स्तरावर एक प्रमुख निर्यातदार बनला आहे. परकीय चलनाच्या कमाईत योगदान देणाऱ्या पाच अव्वल क्षेत्रांपैकी भारतीय औषध क्षेत्र एक बनलं आहे यावरून भारताच्या औषध बनवण्याच्या क्षेत्रातली यशस्वीता पाहायला मिळते. भारतीय औषध उद्योग अडीच दशलक्षापेक्षा अधिक व्यक्तींना रोजगार मिळवून देते ही भारताने गेल्या दोन दशकात मारलेली मोठी झेप म्हणावी लागेल. औषध उद्योग हा भारतीय अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका अदा करते हेही मुद्दाम सांगावसं वाटतं.
भारतीय औषध उद्योगाचा आकार 2021 पर्यंत पाच हजार कोटी होता जो आज 50 अब्ज युएसडीवर पोहोचला आहे. भारत जगातला सर्वात मोठा जेनेरिक औषधांचा निर्माता आहे. भारतीय फार्मा कंपन्या आज 200 पेक्षा जास्त देशांमध्ये औषधांची निर्यात करत आहेत. साल 2024 पर्यंत भारतीय औषध उद्योग 65 अब्ज युएस डॉलर्स तर साल 2030 मध्ये भारतीय औषध उद्योग 130 अब्ज युएस डॉलर्स पर्यंत पोहोचण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
भारत हा जागतिक स्तरावर सामान्य औषधांचा सर्वात मोठा निर्माता आहे. याशिवाय भारताने अमेरिकेबाहेर यूएसएफडीएद्वारे दोन्ही एपीआय आणि फॉर्म्युलेशनच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे.करोनाच्या काळातही भारताने इतर देशांना कोरोना लस पुरवण्याच्याबाबतीत मोठा प्लेअर म्हणून पुढे आला होता. आजही भारतीय करोना लशींची जागतिक स्तरावर मागणी एकूण बाजाराच्या 62 टक्के इतकी आहे यावरून भारताची औषध निर्मितीची झेप काय आहे याचा अंदाज बांधला जाऊ शकतो.