Educational Loan: चांगले दर्जेदार शिक्षण घेण्यासाठी पैशांची गरज लागते. शैक्षणिक शुल्क, होस्टेल, परीक्षा शुल्क, लॅपटॉप, स्टेशनरी, युनिफॉर्मसह इतरही अनेक प्रकारच्या खर्चांचा समावेश यात होतो. विविध कोर्सेससाठी लाखो रुपयांचा हा खर्च प्रत्येक कुटुंबाला परवडेलच असे नाही. त्यामुळे शैक्षणिक कर्जाचा पर्याय अनेकजण स्वीकारतात.
भारतामध्ये इंजिनिअरिंग, एमबीए, टेक्निकल, मेडिकल कोर्सेससाठी शैक्षणिक कर्जाची जास्त मागणी आहे. देशातील आघाडीच्या शैक्षणिक संस्थांबरोबरच परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे. मात्र, हे लाखो रुपयांचे कर्ज बँक सहज देते का? तर नक्कीच नाही. कर्ज परतफेड करण्यापासून ते तुम्ही कोणत्या कोर्ससाठी कर्ज घेताय याची पडताळणी बँक करते.
शैक्षणिक पडताळणी
विद्यार्थी ज्या कोर्ससाठी लोन घेऊ इच्छित आहे, त्याआधी त्याने काय शिक्षण घेतले आहे. त्यामध्ये किती मार्क मिळाले, याचा ट्रॅक रेकॉर्ड बँकेकडून पाहिला जातो. तसेच तुम्ही ज्या संस्थेत प्रवेश घेऊ इच्छिता त्या संस्थेची विश्वासहर्तादेखील तपासली जाते. नामांकित कॉलेज असेल तर कर्ज मंजूर होण्याची शक्यता वाढते.
कर्ज फेडण्याची क्षमता
शैक्षणिक कर्ज देताना तारण आणि विना तारण अशा दोन प्रकारे कर्ज मिळू शकते. तारण ठेवून कर्ज मिळवण्यासाठी तुमच्याकडे काय मालमत्ता आहे. तिचे मूल्य किती? हे बँकेकडून पाहिले जाते.
जर कर्ज घेताना कोणी कुटुंबीय किंवा त्रयस्थ व्यक्ती सह-कर्जदार असेल तर त्या व्यक्तीचे आर्थिक व्यवहार, क्रेडिट स्कोअर देखील तपासला जातो. पालकांचा क्रेडिट स्कोअर 750 पेक्षा कमी असेल तर कर्ज मिळण्यात अडथळे येऊ शकतात. सर्वकाही ठीक असेल तरच बँक कर्ज मंजूर करते. त्यामुळे आधीचे आर्थिक व्यवहार चोख असणं अत्यंत गरजेचे आहे.
पालकांचे उत्पन्न कमीतकमी 30 हजार रुपये असायला हवे. मात्र, काही बँका उत्पन्न 30 हजार रुपयांपेक्षा कमी असेल तरी अर्ज मंजूर करू शकतात. मालमत्ता तारण ठेवण्यासाठी असेल तर कर्ज मिळण्यास अधिक सोपे होऊ शकते.
कोणत्या कोर्सेससाठी शैक्षणिक कर्ज मिळू शकते?
सहसा उच्च शिक्षणासाठी विद्यार्थी शैक्षणिक कर्ज घेतात. मात्र, पदवी, व्यावसायिक कोर्सेस, पीएचडी, डॉक्टरेट प्रोग्राम्स, सर्टिफिकेट कोर्सेस, डिप्लोमासाठीही कर्ज मिळते. मात्र, ती संस्था मान्यताप्राप्त असावी.
विद्यापीठ अनुदान आयोगाची (UGC) मान्यताप्राप्त विद्यापीठे, ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (AICTE), AIBMS, IMCR मान्यताप्राप्त कॉलेजमध्ये प्रवेश घेत असाल तर शैक्षणिक कर्ज मिळू शकते. परदेशातील विद्यापीठात प्रवेश घेत असतानाही बँक विद्यापीठाची मान्यता तपासते.
शैक्षणिक कर्ज मिळण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात?
शैक्षणिक कर्जाचा अर्ज
पासपोर्ट साइज फोटो
सर्व शैक्षणिक निकाल आणि कागदपत्रे लागू शकतात.
KYC साठी पत्ता, वय असलेला अधिकृत पुरावा
सहीचा नमुना
कुटुंबाचे उत्पन्न प्रमाणपत्र
तारण कर्ज असेल तर मालमत्तेची कागदपत्रे
मागील सहा महिन्यांचे बँक स्टेटमेंट
परदेशात शिक्षण घेणार असाल तर फॉरेन एक्सचेंज परमिट आणि इतरही कागदपत्रे लागू शकतात. या व्यतिरिक्त बँक जी कागदपत्रे मागेल ती सादर करावी लागतील.