Education Loan: प्रत्येक पालक आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी आग्रही असतात. त्यासाठी मूल लहान असल्यापासून आर्थिक नियोजनही अनेक पालक करतात. मात्र, शिक्षणाचा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. उच्च शिक्षणासाठी किंवा परदेशात पाल्याला शिक्षणासाठी जायचे असेल तर शैक्षणिक कर्ज घेण्याशिवाय पर्याय राहत नाही. कमी व्याजदर आणि कर्ज फेडण्याच्या कालावधीत सूट मिळत असल्याने हा पर्याय योग्य ठरतो.
मात्र, मुलासाठी शैक्षणिक कर्ज घेत असताना पालकांनी काही गोष्टी ध्यानात ठेवल्या पाहिजे. मागील काही वर्षांचा विचार करता शैक्षणिक कर्ज घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. तुम्ही तुमच्या पाल्याच्या शिक्षणासाठी कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर कोणत्या गोष्टींवर लक्ष द्यायला हवे ते पाहूया.
व्याजदर आणि कर्ज योजनांची तुलना करा
शैक्षणिक कर्ज घेण्यापूर्वी अनेक बँकांकडे चौकशी करायला हवी. जी बँक कमीत कमी व्याजदर आणि सुविधा देत असले त्या बँकेला प्राधान्य द्या. बऱ्याच वेळा अॅडमिशनची वेळ जवळ आल्यानंतर कर्ज घेण्यासाठी अप्लाय केल्याने वेळही कमी मिळतो. त्यामुळे आधीपासून नियोजन करा. बँकांच्या वेबसाइटवर तुम्हाला व्याजदर आणि सुविधांची माहिती मिळू शकते. तसेच लोन अॅग्रिगेटर वेबसाइटवरही तुम्ही एज्युकेशन लोनची तुलना करू शकता. Vidya Lakshmi पोर्टलद्वारेही तुम्ही एकापेक्षा जास्त बँकांकडे शैक्षणिक कर्जासाठी अर्ज करू शकता.
कर्ज तारण आहे की नाही ते तपासा?
बँका आणि वित्तसंस्था शिक्षणासाठी कर्ज देताना दोन प्रकारे कर्ज देतात. एक सुरक्षित कर्ज आणि दुसरे असुरक्षित कर्ज. असुरक्षित कर्ज म्हणजे कर्ज देताना काहीही तारण ठेवले जात नाही. मात्र, सुरक्षित कर्ज देताना बँक तारण म्हणून, घर, बंगलो स्थावर मालमत्ता, विमा योजना, मुदत ठेव योजना, फ्लॅट ठेवू शकते. म्हणजेच जर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्याने कर्ज फेडले नाही तर बँक तारण ठेवलेली मालमत्तेची विक्री करून कर्ज वसूल करू शकते. तारण ठेवताना सार्वजनिक बँकांना प्राधान्य द्यायला हवे.
काही बँका 100 टक्के कर्ज देतात. मात्र, काही बँका शैक्षणिक कर्ज देताना "मार्जिन मनी" ठेवतात. म्हणजेच पूर्ण कर्जाची रक्कम मंजूर करत नाहीत. काही टक्के खर्च तुम्हाला करावा लागू शकतो. परदेशात शिक्षणासाठी जात असाल तर ही टक्केवारी 15 टक्क्यांपेक्षा जास्त असू शकते. तसेच कर्जाची रक्कमही मोठी असते. त्यामुळे प्रवेश घेताना काही पैशांची व्यवस्था आधीच करून ठेवा.
चांगला क्रेडिट स्कोअर ठेवा
तुमच्या पाल्यासाठी शैक्षणिक कर्ज घेत असताना guarantor (हमीदार) ची गरज लागेल. पाल्याचे नावे शैक्षणिक कर्ज घेत असताना आई-वडील किंवा कुटुंबातील इतर सदस्याला हमीदार व्हावे लागेल. मात्र, जर हमीदार व्यक्तीचा क्रेडिट स्कोअर चांगला नसेल तर बँक कर्ज देणार नाही. त्यामुळे पालकांनीही चांगला क्रेडिट स्कोअर ठेवायला हवा. त्यामुळे मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज घेताना अडचण येणार नाही. 750 पेक्षा जास्त क्रेडिट स्कोअर ठेवण्याचा प्रयत्न करा.
कर्ज फेडण्याचे नियोजन करा
शैक्षणिक कर्जाचे अनेक प्रकार असतात. काही कर्जाचे हफ्ते (Loan EMI) शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ठराविक कालावधीनंतर फेडता येते. त्यास "मोरोटोरियम पिरियड" असेही म्हणतात. मात्र, जर पाल्याला शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कर्ज फेडता आले नाही तर अडचणी वाढू शकतात. त्यामुळे पालकही मुलाला कर्जाचे हफ्ते फेडण्यास मदत करू शकतात. लवकर कर्जाचे हफ्ते फेडण्यास सुरूवात केली तर कर्जाचा बोजा कमी होईल. कर्जाचे प्रिपेमेटंही करता येऊ शकते. म्हणजे कर्ज मुदतपूर्व फेडता येऊ शकते. प्रत्येक कर्जाच्या हफ्त्यातून अधिकची रक्कमही तुम्ही भरू शकता. अशा प्रकारे व्याज वाचवता येईल आणि कर्जाचा कालावधीही कमी होईल.
इतर फायदे
जर पाल्यासाठी शैक्षणिक कर्ज घेत असाल तर पालकांना आयकरात सूट मिळू शकते. आयकर कायद्यातील 80E कलमानुसार कर वजावट मिळते.शैक्षणिक कर्जाचे इएमआयवरील एक वर्षातील व्याजावर करसूट मिळते. पाल्याचे शिक्षण सुरू असताना जास्तीत जास्त आठ वर्ष करलाभ मिळवता येईल. या सुविधेचा नक्की फायद्या घ्या.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            