भारतातील वेगवेगळ्या गुंतवणुकीवर नियंत्रण ठेवणाऱ्या भारतीय बाजार नियामक मंडळाने म्हणजेच सेबीने (Securities and Exchange Board of India) आरबीआयच्या लक्षात आणून दिले होते की, काही नॉन-बॅंकिंग संस्था अल्टरनेट इन्व्हेस्टमेंट फंडच्या माध्यमातून सातत्याने कर्जाचा पुरवठा करत आहे. पण Alternative Investment Fund म्हणजे नेमके काय? हे समजून घेऊ.
पर्यायी गुंतवणूक निधी म्हणजेच अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड (AIF) हा भारतात स्थापन करण्यात आलेला असा एक फंड आहे; जो भारतातील आणि भारताबाहेरील वैयक्तिक गुंतवणूकदार किंवा संस्थांकडून गुंतवणुकीसाठी खाजगीरीत्या निधी उभारला जातो. हा फंड गुंतवणूकदारांच्या धोरणांनुसार त्यांच्या फायद्यासाठी वापरला जातो.
Alternative Investment Fund मधील निधी हा सेबीच्या अंतर्गत येणाऱ्या म्युच्युअल फंड (Mutual Fund)च्या नियमांतर्गत येत नाही. पर्यायी गुंतवणूक निधी हा अधिकृतरीत्या तीन प्रकारच्या कॅटेगिरीद्वारे नोंदवता येतो.
पहिली कॅटेगरी
पर्यायी गंतवणूक निधी हा स्टार्ट-अप्स, सुरुवातीच्या टप्प्यातील उपक्रम, सामाजिक उपक्रम, SME आणि सरकार किंवा नियामक मंडळाच्या दृष्टीने जी क्षेत्रे सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या गरजेची असणारी क्षेत्रे आहेत; तिथे खर्च करू शकतात. यामध्ये एंजल फंड, एसएमई फंड, सोशल व्हेंचर फंड, इन्फ्रास्ट्रक्चर फंड आणि अशा इतर पर्यायी फंडांचा समावेश होतो.
दुसरी कॅटेगरी
या प्रकारामध्ये अशा घटकांचा समावेश होतो. जे पहिल्या आणि तिसऱ्या कॅटेगरीमध्ये समाविष्ट नाहीत. म्हणजेच त्यांना नियमानुसार परवानगी मिळूनही ते त्यांचा गैरफायदा घेत नाहीत किंवा त्यावर कर्जाची मागणी ही करत नाहीत. यामध्ये रिअल इस्टेट फंड, डेब्ट फंड, प्रायव्हेट इक्विटी फंड, मालमत्तेवर येणाऱ्या आपत्कालीन संकटासाठी फंड यांची नोंद दुसऱ्या कॅटेगरीत होते.
तिसरी कॅटेगरी
हे असे फंड आहेत जे गुंतागुंतीची किंवा वैविध्यपूर्ण व्यावसायिक धोरणांचा वापर करतात. यामध्ये लिस्टेड किंवा अनलिस्टेड डेरिव्हेटिव्ह हेज फंड्स, पीआयपीई फंड (Private Investment in Public Equity – PIPE) यामध्ये गुंतवणूक करून लाभ मिळवतात. ते तिसऱ्या कॅटेगरीत नोंद करतात.
अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंडमधील पहिल्या आणि तिसऱ्या कॅटेगरीसाठी हा फंड क्लोज फंड असणे आणि यासाठी किमान 3 वर्षांचा कालावधी असणे आवश्यक आहे. तर तिसऱ्या कॅटेगरीतील फंड हा क्लोज एंडेड किंवा ओपन एंडेड (Closed Ended & Open Ended) असा दोन्हीप्रकारे असू शकतो. सेबीच्या गाईडलाईननुसार, अल्टरनेटीव्ह इन्व्हेस्टमेंट फंड (AIF) ट्रस्ट किंवा कंपनी किंवा भागीदारी किंवा कॉर्पोरेट प्रकारांतर्गत येऊ शकतो. सेबीकडे बहुतांश Alternative Investment Fund हे ट्रस्टच्या स्वरूपात नोंदणी झालेले आहेत.
Angel Fundचा अपवाद वगळता एआयएफच्या कोणत्याही स्कीममध्ये 1000 पेक्षा जास्त गुंतवणूकदार नसतात. Angel Fundचा विचार केला तर या स्कीममध्ये 49 पेक्षा जास्त गुंतवणूकदार नसतात. Alternative Investment Fund मध्ये सहभागी करून घेण्यासाठी मोठ्या संख्येने लोकांना बोलावू शकत नाही. इथे खाजगी पातळीवर निधी गोळा करता येतो.
पर्यायी गुंतवणूक निधीच्या प्रत्येक स्कीमध्ये किमान 20 कोटी रुपयांचा निधी असावा लागतो. त्यात Angel Fundसाठी किमान 10 कोटी रुपयांच्या निधीची अट आहे.
Alternative Investment Fund एंजेल फंडाव्यतिरिक्त, गुंतवणूकदाराकडून एक कोटी रुपयांपेक्षा कमी गुंतवणूक स्वीकारू शकत नाही. तसेच एआयएफचे कर्मचारी किंवा संचालक मंडळातील गुंतवणूकदारांना कमीतकमी 25 लाख रुपये यात गुंतवता येतात.