Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

वैयक्तिक कर्जाची पात्रता वाढवायची आहे? या टिप्स फॉलो करा

Personal Loan

तुम्ही वैयक्तिक कर्ज (Personal Loan) घेण्याचा विचार करताय? पण तुम्हाला हवे तितके कर्ज मिळत नाहीये. तर आम्ही तुमच्यासाठी पर्सनल लोनची पात्रता वाढवण्याचे स्मार्ट पर्याय घेऊन आलो आहोत.

वैयक्तिक कर्ज (Personal Loan) हे आर्थिक गरज भागविण्यासाठी आणि आलेल्या आर्थिक संकटाला धैर्याने तोंड देण्यासाठी सर्वांत लोकप्रिय असलेल्या क्रेडिट प्रकारांपैकी एक आहे. वैयक्तिक कर्ज (पर्सनल लोन) हे इतर कर्जांच्या तुलनेत बॅंकेकडून लगेच वितरित केले जाते. तसेच याच्या वापरावर कोणतीही मर्यादा नाही. पर्सनल लोन हे असुरक्षित लोन मानले जाते. यामध्ये जोखीम अधिक असल्याने होमलोनसारख्या सुरक्षित कर्जाच्या तुलनेत पर्सनल लोनची प्रक्रिया खूप काटेकोरपणे पाळली जाते. यामुळे बऱ्याच जणांना पर्सनल लोन मिळवताना अडचणी येतात. तर आज आपण पर्सनल लोनची पात्रता वाढवण्यासाठी काही स्मार्ट पर्यायांची माहिती घेणार आहोत.

क्रेडिट स्कोअर सुधारा

कर्ज देणाऱ्या बॅंका सहसा 750 किंवा त्याहून अधिक क्रेडिट स्कोअर असलेल्या अर्जदारांना कर्ज देताना प्राधान्य देतात. कारण बॅंका अशा ग्राहकांना आर्थिकदृष्ट्या शिस्तबद्ध मानतात आणि त्यांच्याकडून पर्सनल लोनच्या परतफेडीमध्ये डिफॉल्ट होण्याची शक्यता फारच कमी असते. त्यामुळे बहुतांश कर्ज देणाऱ्या बॅंका कमी व्याजदराने पर्सनल लोन देऊन अशा अर्जदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असतात.

तर दुसरीकडे बॅंका कमी क्रेडिट स्कोअर असलेल्या ग्राहकांनाही पर्सनल लोन (Personal Loan) देतात. पण ते देताना बॅंका जोखीमचा विचार करून त्यांच्याकडून अधिक व्याज दर आकारतात. लोन घेणाऱ्या ग्राहकांना क्रेडिट स्कोअर चांगला ठेवणे खूप गरजेचं आहे. दरम्यान, चांगला क्रेडिट स्कोअर तयार करण्यासाठी पुरेसा वेळ लागू शकतो. पण कर्जाची गरज कधीही उद्भवू शकते. त्यामुळे भविष्यात कर्ज घेणाऱ्या ग्राहकांनी क्रेडिट स्कोअर चांगला ठेवणं गरजेचं आहे.

क्रेडिट स्कोअर रिपोर्ट पाहण्याची सवय

कर्जासाठी अर्ज करणारी व्यक्ती वेळोवेळी आपला क्रेडिट रिपोर्ट पाहून त्यात सुधारणा करू शकते किंवा तो चांगला ठेवण्यासाठी प्रयत्न करू शकते. ग्राहकांना प्रत्येक क्रेडिट ब्युरोकडून वर्षातून एकदा मोफत क्रेडिट रिपोर्ट मिळतो. क्रेडिट स्कोअर चांगला ठेवण्यासाठी या रिपोर्टची मदत होऊ  शकते. याशिवाय, ईएमआय आणि क्रेडिट कार्डची बिलं वेळेवर भरणं, तसेच कोणासाठी गॅरन्टर म्हणून राहिला असाल तर त्या कर्जाची स्थिती तपासणं आणि क्रेडिट युटिलायझेशन रेशो 30 टक्क्यांच्या आत ठेवणं. यासारख्या निरोगी आर्थिक सवयींचे नियमित पालन केल्यास तुमचा क्रेडिट स्कोअर सुधारण्यास मदत होऊ शकते.

EMI परवडू शकतो का?

बॅंका अर्जदाराला पर्सनल लोन देताना त्याच्या मासिक उत्पन्नाच्या 60 टक्क्यांपर्यंत कर्ज देण्यास तयार असतात. यापेक्षा जास्त पर्सनल लोन मिळण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे कर्जाचा कालावधी आणि EMI सेट करण्यापूर्वी अर्जदाराने त्याला परवडणाऱ्या ईएमआयचे मूल्यांकन केले पाहिजे. तसेच पर्सनल लोन घेणाऱ्यांनी त्यांचे प्रत्येक महिन्याचे ठरलेले खर्च, इन्श्युरन्सचा प्रीमियम, गुंतवणूक, घरभाडे इत्यादींचा खर्च विचारात घेऊन EMI परवडू शकतो का याचे मूल्यांकन करायला पाहिजे.

कर्जासाठी सतत अर्ज करू नका

तुम्ही जेव्हा कर्जासाठी बॅंकेकड अर्ज करता, तेव्हा बॅंका तुमचा क्रेडिट रिपोर्ट मागवून घेतात. अशा क्रेडिट ब्युरो बॅंकेने पाठवलेल्या विनंतीवर काम करताना ग्राहकांचा क्रेडिट स्कोअरची खूप चिकित्सेने विश्लेषण करतात. त्यात काहीवेळेस ग्राहकांचा क्रेडिट स्कोअर कमी होतो. त्यामुळे ग्राहकाने एखाद्या ठराविक कालावधीत एकापेक्षा अधिक अर्ज केले असतील क्रेडिट ब्युरो कंपनींकडून क्रेडिट स्कोअरमध्ये लक्षणीय घट होऊ शकते. यामुळे ग्राहकाच्या पर्सनल लोनच्या पात्रतेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

कर्जाच्या फॉर्ममध्ये सह-अर्जदाराचे नाव जोडा

पर्सनल लोन घेताना अर्जामध्ये सह-अर्जदाराचे नाव जोडल्याने कर्जदात्याची क्रेडिट जोखीम कमी होते. कारण सह-अर्जदारदेखील हे कर्ज फेडण्यासाठी जबाबदार राहतो. अशाप्रकारे, कमी उत्पन्न असलेले, कमी क्रेडिट स्कोअर असलेले किंवा कर्ज परतफेड करण्याची क्षमता नसल्यामुळे पर्सनल लोन मिळण्याची शक्यता कमी असलेले अर्जदार चांगल्या क्रेडिट प्रोफाईलसह सह-अर्जदाराचे नाव जोडून स्वत:ची पात्रता सुधारू शकतात.

कर्ज घेताना सह-अर्जदाराचे नाव जोडल्यामुळे अर्जदाराला कर्जाची रक्कम जास्त मिळू शकते किंवा कर्जाचा व्याजदर कमी होऊ शकतो. याचं कारण असं की, कर्ज परतफेडीच्या क्षमतेचे मूल्यांकन करताना अर्जदाराबरोबर सह-अर्जदाराच्या उत्पन्नाचा देखील विचार केला जातो. पण त्याचबरोबर पर्सनल लोन फेडताना त्यात काही चूक झाली तर अर्जदारासोबत सह-अर्जदाराच्या  क्रेडिट स्कोअरवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.