प्रत्येकाला हक्काचे घर असावे असे वाटत असते. प्रत्येक जण आपल्या बजेटनुसार घर खरेदीचा विचार करत असतो. काहीवेळा घराची रक्कम ही आटोक्याबाहेर असते आणि अशावेळी गृहकर्जाची मदत घेतली जाते. बँका आपल्याला खरेदीच्या 75 ते 90 टक्क्यांपर्यंत कर्ज देतात. उर्वरित रक्कम आपल्याला खिशातून भरावे लागते. त्याला डाऊन पेमेंट म्हणतात.
उदाहरणार्थ, आपण 30 लाख रुपयांचे घर खरेदी करत असाल तर बँक आपल्याला 27 लाखांपेक्षा अधिक गृहकर्ज देणार नाही. उर्वरित रक्कम तीन लाख रुपये खिशातून भरावे लागतील. आपण चांगल्या रितीने गुंतवणूक केली असेल आणि पैसा गोळा केला असेल तर या पैशातून डाउनपेमेंटची व्यवस्था करता येईल. परंतु अशा प्रकारचे नियोजन नसेल तर त्यांच्यासाठी पुढीलप्रमाणे काही पर्याय आहेत.
- मित्रांकडून आणि कुटुंबाकडून उधार म्हणून पैसे घेऊ शकता.
- आपण कंपनीकडून देखील कर्ज घेऊ शकता.
- आपल्या पगारातून पीएफ कापला जात असेल तर पीएफवरही कर्ज काढू शकता किंवा त्यातील काही रक्कम काढू शकता.
- गोल्ड लोन, प्रॉपर्टी लोन, म्युच्युअल फंड लोनचा ही विचार करता येऊ शकतो.
जर एखाद्याकडे यापैकी कोणताच पर्याय नसेल तर ती व्यक्ती घर खरेदीच करू शकत नाही का? असा विचार येऊ शकतो. पण आपल्याकडे आणखी एक पर्याय शिल्लक राहतो. तो म्हणजे पर्सनल लोनचा. पर्सनल लोन हे असुरक्षित श्रेणीत येते आणि यासाठी आपल्याला कोणत्याही तारणाची गरज नाही. पर्सनल लोन सहजपणे मिळू शकते. परंतु डाउन पेमेंटसाठी पर्सनल लोन घेणे कितपत संयुक्तिक ठरेल. याचा तुम्ही सारासार विचार करायला हवा.
डाउन पेमेंटसाठी पर्सनल लोन घेत असाल. तर गृह कर्ज आणि पर्सनल लोन अशी दोन कर्ज फेडावी लागतील. अशा स्थितीत आपण दोन्ही कर्ज फेडण्यास सक्षम आहोत की नाही, हे तपासणे आवश्यक आहे. होम लोनची कमाल मर्यादा ही घराची किंमत आणि कर्ज फेडण्याची क्षमता या दोन गोष्टींवर अवलंबून असते.
उदाहरणार्थ, तुम्ही 50 लाखांचे कर्ज फेडू शकता, परंतु घराची किंमत 30 लाख रुपये असेल तर तुम्हाला 27 लाखांपेक्षा अधिक कर्ज मिळणार नाही. अशा वेळी तुम्हाला पर्सनल लोन सहज मिळेल. पण तुमची कर्ज फेडण्याची क्षमता कमी असेल तर थोडी अडचण निर्माण होऊ शकते. जसे की, घराची किंमत 40 लाख रुपये असेल आणि कर्ज फेडण्याची क्षमता 30 लाख असेल तर तुम्हाला 30 लाखांपेक्षा अधिक कर्ज मिळणार नाही. यानुसार तुम्ही 5 ते 10 लाखांपर्यंतचे पर्सनल लोन घेत असाल तर त्याची परतफेड कशी करणार? असा प्रश्न उपस्थित होतो.
पर्सनल लोनचे व्याजदर अधिक असते आणि त्यामुळे हप्ता वाढेल. गृहकर्जावर करसवलतीचा लाभ मिळतो. पण पर्सनल लोनवर कर सवलतीचा लाभ मिळत नाही. तात्पर्य, डाउनपेमेंट करण्यासाठी पर्सनल लोन न घेतलेलेच बरे. कारण कालांतराने कर्जाचा हप्ता भरण्यासाठी अडचणी येऊ शकतात. तसेच मासिक उत्पन्नावरही परिणाम होऊ शकतो. केवळ पर्सनल लोनच नाही तर गोल्ड लोन, प्रॉपर्टी लोनवर देखील व्याज भरावे लागेल.
सबब आपण घराचा विचार करत असाल तर आतापासूनच डाउनपेमेंटसाठी पैसे बाजुला काढून ठेवण्यास सुरूवात करा. दर महिन्याला काढलेले पैसे हे मुदत ठेवी, रिकरिंग डिपॉझिट किंवा लिक्विड फंडमध्ये टाकू शकता. पुढील एक दोन वर्षाचे नियोजन करून पैसे नियमितपणे बाजूला काढल्यास डाउनपेमेंटसाठी चांगली रक्कम उभा राहू शकते.